आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ : नाचणीचे आहे आहारात महत्व!

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना एका तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. डिसेंबर महिना नाचणी या तृणधान्यासाठी समर्पित केला आहे. आरोग्यदृष्ट्याही नाचणी या तृणधान्याला महत्त्च आहे.

मानवी आहारात वापरल्या जाणाऱ्या तृणधान्य पिकामध्ये भात व गहू या प्रमुख धान्याचा समावेश होतो. इतर भरड धान्य पिकांमध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, कोडो, कुटकी, बरटी व वरई या पिकांचा समावेश होतो. राज्यात ज्वारी, बाजरी, नाचणी आणि वरई या पिकांची लागवड केली जाते. साधारणपणे 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात आणि पारंपरिक दृष्ट्या या पिकांची लागवड आणि उत्पादन आपल्या देशात घेतले जात होते आणि आपल्या दैनंदिन आहार पद्धतीत या धान्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत होता. कालांतराने भात आणि गहू या पिकांचे अधिक उत्पादन आणि उपलब्धता वाढल्याने व आहार पद्धतीत झालेल्या बदलामुळे आजच्या काळात या भरडधान्य पिकांखालील क्षेत्र कमी होत आहे.

राज्यात या खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या अन्नधान्य पिकांपैकी नाचणी महत्वाचे तृणधान्य पीक आहे. नाचणी/नागली (Finger millet) हे गवतवर्गीय कुळातील पीक असून याचे शास्त्रीय नाव (इलुसिन कोराकाना) Eleusine coracana असे आहे.

नाचणी पिकाची वाढ व सामान्य माहिती:

नाचणी हे गवतवर्गीय कुळातील (Poaceae) महत्वाचे पीक आहे. त्यामुळे या पिकाची वाढ होताना मुख्य खोडासोबत फुटवे येण्याचा गुणधर्म  आहे. या धान्याचा आकार लहान असून आकार हे एकदलवर्गीय पीक आहे. या पिकामध्ये स्वपरागीभवन प्रक्रियेदवारे बीज निर्मिती होते. सर्वच भरड धान्य पीके ही बदलत्या हवामानास अनुकूल पिके आहेत. या पिकांमध्ये सी4 पद्धतीने प्रकाश संश्लेषण (मका, ऊस, ज्वारी) होते. त्यामुळे पानाद्वारे अन्ननिर्मिती करताना प्रकाश, पाणी व कार्बन डायऑक्साइडचा सुयोग्य वापर या वनस्पतीमध्ये केला जातो. तसेच प्रतिकूल परिस्थितीत वाढीची उत्कृष्ठ वैशिष्ट्ये जसे की, कमी ऊंची, पानांचा लहान आकार, कणिस व पाने यामध्ये अन्नपदार्थ पुरविण्यासाठी योग्य पद्धत, तंतूमय मुळांची खोल वाढ व प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याचा गुणधर्म यामुळे या पिकांचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे.

नाचणी पिकाच्या कणसातील विविधता:

नाचणीच्या कणसामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. हाताच्या बोटाप्रमाणे असलेल्या अनेक पाकळ्यांचे नाचणीचे कणीस तयार होते. प्रत्येक पाकळीमध्ये समांतर पद्धतीने फुले येतात. त्यापासून धान्य निर्मिती होते. फुलांच्या एका गुच्छामध्ये असलेली लहान आकाराची फुले पहाटेच्या वेळी उमलतात, त्यामुळे प्रामुख्याने फक्त स्वपरागीभवन पद्धतीने बीज निर्मिती होते.

विविध स्थानिक भागात कणसामध्ये पाकळ्यांच्या रचनेनुसार विविधता आढळते. त्यामध्ये प्रामुख्याने बंद कणीस, थोडे उघडलेले, अर्धवट उघडे, पूर्ण उघडे असे प्रकार आढळतात. नाचणीच्या धान्याचा रंग हा प्रामुख्याने लालसर तपकिरी असतो. काही प्रमाणात पांढऱ्या रंगाच्या नाचणी वाणांची देखील लागवड केली जाते.

नाचणी: पौष्टिक गुणधर्म : अ) प्रथिने व खनिज पदार्थ:

नाचणी व तत्सम तृणधान्य वर्गातील पिकांमध्ये पुढील प्रमाणे पौष्टिक तत्वे असतात. त्यात मानवी आहाराच्या दृष्टीने नाचणी हे एक अत्यंत महत्वाचे पौष्टिक तृणधान्य आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम (364 मि.ग्रॅ./100 ग्रॅम) या खनिजाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे भात आणि गहू धान्याच्या तुलनते 10 पटीने अधिक आहे. त्याचबरोबर मॅग्नेशियम (१४६ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) व लोह (४.६२ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) या खनिजाचे प्रमाण भात आणि गहू या धान्यापेक्षा अधिक आहे.

ब) जीवनसत्वे:

या पिकाचे आणखी वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म म्हणजे या पिकांमध्ये मुबलक असलेले जीवनसत्वाचे प्रमाण. नाचणी धान्यामध्ये जीवनसत्व थायमिन बी-१ (०.३७ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम), रायबोफ्लेवीन बी-२ (०.१७ मि.ग्रॅ./१०० ग्रॅम) व फॉलिक असिड (३४.६६ µ.ग्रॅ./१०० ग्रॅम) याचे प्रमाण भात आणि गव्हापेक्षा पेक्षा जास्त आहे.

आहारातील महत्व: नाचणी- Finger millet (शास्त्रीय नाव: Eleusine coracana):

नाचणी हे एक पौष्टिक आणि आरोग्यदायी धान्य आहे. त्याचे काही पौष्टिक आणि आरोग्यदायी फायदे आहेत: पोषक तत्वांनी समृद्ध: नाचणी हे कार्बोहायड्रेट्स, आहारातील तंतूमय पदार्थ, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांसह आवश्यक पोषक तत्वांचा एक चांगला स्रोत आहे. त्यात कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरसचे प्रमाण विशेषतः जास्त असते. आहारातील तंतूमय पदार्थाचे उच्च प्रमाण: हे आहारातील तंतूमय पदार्थांचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, जे पाचन आरोग्यासाठी महत्वाचे आहे. तंतूमय पदार्थामुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करते, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिसऑर्डरचा धोका कमी करते आणि पोट भरून ठेवते. वजन व्यवस्थापन मदत करते. ग्लूटेन-मुक्त: नाचणी नैसर्गिकरित्या ग्लूटेन-मुक्त आहे, ज्यामुळे सेलिआक रोग किंवा ग्लूटेन संवेदनशीलता असलेल्या व्यक्तींसाठी एक आदर्श पर्याय बनतो.

अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध: यामध्ये फिनोलिक संयुगे आणि फ्लेव्होनॉइड्ससह विविध प्रकारचे अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास आणि जुनाट आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. रक्तातील साखर संतुलित करते: नाचणीचा ग्लायसेमिक निर्देशांक कमी असतो. याचा अर्थ रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकत नाही. हे मधुमेह असलेल्या लोकांसाठी किंवा रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेऊ पाहणाऱ्यांसाठी एक चांगली निवड बनवते. हृदयाचे आरोग्य: धान्यामध्ये तंतूमय पदार्थ, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून आणि हृदयविकाराचा धोका कमी करून हृदयाच्या आरोग्यासाठी योगदान देऊ शकते. हाडांचे आरोग्य: नाचणीमध्ये कॅल्शियम या खनिजाचे प्रमाण इतर भात, गहू, ज्वारी, बाजरी या सर्व तृण धान्यापेक्षा सर्वाधिक आहे. त्याच बरोबर फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे मजबूत आणि निरोगी हाडे राखण्यासाठी आवश्यक असतात. गर्भधारणेसाठी पौष्टिक: उच्च लोह सामग्रीमुळे, गर्भवती महिलांसाठी अशक्तपणा टाळण्यासाठी आणि गर्भाच्या निरोगी विकासास प्रोत्साहन देण्यासाठी फायदेशीर आहे. वजन व्यवस्थापन: नाचणीमधील उच्च फायबर सामग्रीमुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटू शकते, एकूण कॅलरीचे सेवन कमी होते आणि वजन व्यवस्थापनात मदत होते. रोगप्रतिकारशक्ती सुधारते: नाचणीतील पोषक तत्वे, विशेषत: अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि शरीराला संक्रमण आणि रोगांशी लढण्यास मदत करतात. आतड्यांचे आरोग्य: नाचणीतील आहारातील तंतुमय पदार्थ देखील निरोगी आतड्यांतील जीवाणूच्या वाढीस व कार्यक्षमतेस प्रोत्साहन देते, जे संपूर्ण आरोग्यासाठी आवश्यक आहे. पचण्यास सोपे: नाचणी धान्य सहज पचण्याजोगे आहे, ज्यामुळे पचन संवेदनशीलता असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय आहे.

(संदर्भ:- डॉ.योगेश बन व डॉ.अशोक पिसाळ, अखिल भारतीय समन्वीत नाचणी व तत्सम तृणधान्य संशोधन प्रकल्प, विभागीय कृषी संशोधन केंद्र, कोल्हापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

श्री.दत्तात्रय कोकरे, विभागीय संपर्क अधिकारी

0000

विशेष लेख (भाग-२) वाचा