शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 1818

पत्रलेखनाची जुनी संस्कृती जपणे काळाची गरज – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 6 : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात पत्रलेखनाची जुनी संस्कृती जपून भविष्याकडे वाटचाल करणे काळाची गरज असल्याची भावना राज्यपालभगत सिंह कोश्यारी यांनी आज व्यक्त केली.

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त भारतीय डाक विभागाच्यावतीने आयोजित मुंबई जिल्हास्तरीय दोन दिवसीय दुर्मिळ टपाल तिकीट प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

प्रदर्शनाचे कौतुक करीत राज्यपाल म्हणाले, टपाल तिकीट लावून पत्र लिहिण्याची संस्कृती दुर्मिळ होत चालली आहे. अशातच इतिहासाची जाण ठेवून जुन्या संस्कृती जपण्यासाठी डाक विभाग राबवित असलेल्या नवनव्या संकल्पना प्रेरणादायी आणि दिशादर्शक आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचे एकविसाव्या शतकात दुर्मिळ टपाल तिकीटे आणि पत्रांच्या संग्रहातून पूर्वजांच्या संस्कृतीची जपणूक करणे काळाची गरज बनली आहे. देशाला लाभलेल्या अनेक महापुरुषांनी इतिहासाची कास धरुन भविष्याकडे वाटचाल केल्यामुळे आज त्यांना ख्याती प्राप्त आहे आणि आजही त्या व्यक्ती सर्वांच्या स्मरणात आहेत. त्यामुळे इतिहासाला स्मरणात ठेवून वर्तमानकाळात जगणे इतकेच महत्त्वाचे आहे. पूर्वजांचा इतिहास स्मरणात ठेवून प्रत्येकाने आदर्श जीवन जगण्याची आवश्यकता आहे.

जुन्या वस्तू स्मरणात राहाव्या यासाठी टपाल तिकीट प्रदर्शनासारख्या नव्या संकल्पनांच्या माध्यमातून संस्कृती जपण्यात भारतीय डाक विभाग मोलाचे योगदान देत आहे. ही अभिमानाची आणि कौतुकास्पद  बाब असल्याचेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

यावेळी देशातील विविध टपाल तिकिटांचा संग्रह असलेल्या प्रदर्शनाची राज्यपालांनी पाहणी केली. तसेच महात्मा गांधी यांच्या पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनेवर आधारित आणि महाराष्ट्रातील पारंपरिक खाद्य संस्कृतीचा उल्लेख असलेल्या कव्हरचे अनावरण करण्यात आले.

या मुंबईपेक्स टपाल तिकीट प्रदर्शनात 192 दुर्मिळ टपाल तिकिटांचे प्रदर्शन करण्यात आले आहे.  टपाल तिकिटांच्या संवर्धनाबाबत नवयुवकांना प्रोत्साहित करणे आणि जनजागृती करणे असा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

राज्यपालांचे पहिले पत्र

पत्रलेखनाची संस्कृती जपण्याची गरज सांगून डाक विभागाने आयोजित केलेल्या ‘ढाई अकर’ या पत्रलेखन स्पर्धेसाठी पहिले पत्र राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी टपालातून पाठवले.

या कार्यक्रमाला मणिभवनच्या सचिव गांधीवादी उषा ठक्कर, मुख्य पोस्ट मास्तर जनरल हरिषचंद्र अग्रवाल, शेफ संजीव कपूर, पोस्ट मास्तर जनरल स्वाती पांडे आदी उपस्थित होते.

सोशल मीडियाच्या प्रभावी वापरासाठी महाराष्ट्र परिचय केंद्राला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार

नवी दिल्ली, दि.6 : लोकसभा निवडणूक काळात महाराष्ट्र परिचय केंद्राने सोशल मीडियाच्या माध्यमातून  दिलेल्या प्रभावी व योग्य अपडेट्सची  दखल देशातील आघाडीचे  हिंदी न्यूज पोर्टल‘प्रभासाक्षी’ने घेतली असून8नोव्हेंबर रोजी प्रभासाक्षीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात परिचय केंद्राला सन्मानित करण्यात येणार आहे.

‘प्रभासाक्षी’पोर्टलद्वारे समाजमाध्यमांचा प्रभावी व योग्य वापर करणाऱ्या  देशातील संस्थांचा दरवर्षी सन्मान करण्यात येतो.यावर्षी  भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,भारतीय जनता पार्टी(भाजपा)या राजकीय पक्षांसह महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिल्लीस्थित महाराष्ट्र परिचय केंद्राची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. 8नाव्हेंबर रोजी येथील कॉन्स्टिट्यूशन  क्लबमध्ये  ‘प्रभासाक्षी’च्या18व्या वर्धापन दिन कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यावर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत’प्रभासाक्षी’द्वारे सर्वेक्षण करण्यात आले. यात दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयांच्या समाजमाध्यमांद्वारे देण्यात येणाऱ्या अपडेटचेही सर्वेक्षण करण्यात आले.या सर्वेक्षणात योग्य व प्रभावीरित्या समाजमाध्यमांद्वारे अपडेट्स देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने बाजी मारली आहे.मराठी,हिंदी आणि इंग्रजी भाषेतील अधिकृत(प्रमाणित)ट्विटर हँडल असणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे राजधानीत एकमेव कार्यालय असून फक्त याच कार्यालयाने लोकसभा निवडणूक कालावधीत राज्यातील लोकसभा मतदारसंघनिहाय अचूक व प्रभावी माहितीचे अपडेट दिले आहेत.ट्विटरद्वारे1952पासून ते2014पर्यंत राज्यातील लोकसभा निवडणुकीची वैविध्यपूर्ण आकडेवारी देण्यात आली तसेच या कालावधीतील संबंधित अपडेट वृत्तही देण्यात आले.त्यासाठी इन्फोग्राफिक्स,व्हिडिओ आदींचा प्रभावी वापर करण्यात आला.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिन्ही  ट्विटर हँडलवरुन दररोज महत्त्वाच्या माहितीचे अपडेट्स देण्यात येत असून देशातील तीन हजारांहून अधिक पत्रकार कार्यालयाच्या सोशल मीडियाशी जोडले गेले आहेत.ट्विटरसोबतच कार्यालयाचे फेसबुक पेज(तीन),ब्लॉग,यूट्यूब चॅनेल,वॉटस् ॲप ग्रुप आणि एसएमएस सेवेच्या माध्यमातून प्रसार माध्यम आणि जनतेला वेळोवेळी माहिती देण्यात येते.समाजमाध्यमांद्वारे अचूक,योग्य व वेगवान माहिती देण्यात महाराष्ट्र परिचय केंद्राने आघाडी  घेतली असून यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक श्री.ब्रिजेश सिंह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

वैविध्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागाची पताका राजधानी दिल्लीत मानाने उंचविण्याचे काम करणारे महाराष्ट्र परिचय केंद्र हे आधुनिक युगाची पावले ओळखून समाजमाध्यमांचा प्रभावी  व योग्य वापर करीत आहे. ‘प्रभासाक्षी’या आघाडीच्या न्यूज पोर्टलने परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांद्वारे केल्या जाणाऱ्या जनसंपर्काची घेतलेली दखल कार्यालयाच्या कार्याचा विशेष बहुमान आहे.

येत्या8नोव्हेंबर2019रोजी दुपारी4वाजता येथील कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या डेप्युटी स्पीकर हॉलमध्ये’प्रभासाक्षी’च्या18व्या वर्धापनदिन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र परिचय केंद्राला सन्मानित करण्यात येणार आहे.कार्यालयाचे उपसंचालक दयानंद कांबळे पुरस्कार स्वीकारणार आहेत. ‘हिंदी और क्षेत्रीय भाषाओं की डिजिटल मीडिया पर बढती भूमिका’या विषयावर यावेळी परिसंवाद होणार आहे.  

०००००

रितेश भुयार/वृ.वि.क्र. 243 /दि.06.11.2019

आपत्तीतून सावरण्यासाठी शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा

पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. 6 : राज्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना उभे करणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीत ज्या सवलती दिल्या जातात, त्या ओल्या दुष्काळातही द्याव्यात, रोजगार हमी योजनेद्वारे नुकसानग्रस्त शेताच्या सफाई कामाचा समावेश करून शेतमजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केल्या.

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचे दौरे राज्य मंत्रिमंडळातील सदस्यांनी केले, त्याचा अहवाल सादर करण्यासाठी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, परिवहनमंत्री दिवाकर रावते, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यावरणमंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील झालेले नुकसान, शेतकऱ्यांच्या मागण्या आदीबाबत या बैठकीत विविध मुद्दे मांडले. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात यावर्षी झालेला अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, पूर परिस्थिती ह्या घटना गेल्या 30 ते 40 वर्षांत प्रथमच इतक्या तीव्रतेने घडल्या आहेत. राज्यात सर्वच भागात पीक परिस्थिती चांगली असताना या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीची मदत त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी प्रयत्न करावेत. दुष्काळी परिस्थितीत ज्या सोयी-सवलती दिल्या जातात त्या ओल्या दुष्काळातही द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सावरण्यासाठी त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी शासन भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहे. पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी पंचनामे तातडीने होणे आवश्यक आहे. विमा कंपन्यांकडून जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी अचूक पंचनामे होणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून पंचनामे वेळेवर आणि अचूक होतील यासाठी क्षेत्रीयस्तरावर बैठका घ्याव्यात. तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी मदतीपासून बाधित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिल्या.

विमा कंपन्यांनी जास्तीत जास्त भरपाई द्यावी यासाठी राज्यस्तरावर बैठका झाल्या आहेत. केंद्रीय गृह तसेच कृषिमंत्री देखील विमा कंपन्यांची लवकरच बैठक घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांना सावरण्यासाठी रोजगार, अन्नसुरक्षा यासारख्या उपाययोजनांनी दिलासा देण्यासाठी यंत्रणांनी कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह वित्त, महसूल, पदुम, कृषी, मदत व पुनर्वसन या विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते.

००००

अजय जाधव/विसंअ/6.11.2019

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी व मच्छिमारांच्या नुकसानीची पालकमंत्री केसरकर यांनी मंत्रिमंडळात मांडली वस्तुस्थिती

सकारात्मक दृष्टीकोनातून तात्काळ कार्यवाहीबाबत मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई,दि. 6 : मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी,मच्छिमार,तसेच पर्यटन व्यवसायाच्या नुकसानीची वस्तुस्थिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मांडली. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातील नुकसानभरपाईबाबत सकारात्मक दृष्टीकोनातून कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या अनुषंगाने शेतकरी आणि मच्छिमारांना नुकसानभरपाईसंदर्भात मागणी श्री. केसरकर यांनी मांडली. ते म्हणाले,पूर्वी झालेल्या पुरातील नुकसानभरपाई येत्या दोन-तीन दिवसात देण्यात यावी. सध्याच्या पावसामुळे नुकसानीबाबतचे पंचनामे करण्याचे निर्देश क्षेत्रीय स्तरावर देण्यात आले आहेत. तथापि,इतर शेतकऱ्यांच्या जमिनी भाडेपट्ट्याने कसण्यास घेतलेल्या शेतकऱ्यांनाही नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. कबुलायतदार गावकर,सरकारी आकारपड तसेच वनसदृश जमिनी अशा राज्य शासनाच्या मालकीच्या जमिनी कसत असलेल्या शेतकऱ्यांनाही नुकसानीचा मोबदला मिळावा. सातबारावर अनेक नावे आहेत अशा प्रकरणात कसणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रतिज्ञापत्र घेऊन त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी.

कोकणातील भात हे प्रमुख पीक असून संपूर्ण भातशेतीच या पावसात नष्ट झाली आहे. त्यामुळे पुढील किमान तीन ते चार महिने शिधापत्रिकेवर कमी दराने तांदूळ उपलब्ध करुन द्यावा. अतिपावसामुळे आंबा व काजूच्या मोहोराच्या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानभरपाई देण्यात यावी.

मच्छिमारांच्या बोटींचे झालेले नुकसान,वाहून गेलेली जाळी,सुके मासे,मीठ आदींची नुकसानभरपाई देण्याची गरजही श्री. केसरकर यांनी यावेळी मांडली. वादळी पावसामुळे मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाता आले नाही. त्यामुळे त्या काळातील निर्वाह भत्ता देण्यात यावा;किंवा होडीच्या आकारानुसार मच्छीमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावून त्याप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात यावी.

वादळामुळे पर्यटन व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले आहे. पुरामुळे व्यापाऱ्यांना दिलेल्या नुकसानभरपाईच्या धर्तीवर पर्यटन व्यावसायिकांनाही नुकसानभरपाई देण्यात यावी. धूपप्रतिबंधक व खारभूमी बंधाऱ्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी,आदी मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या.

श्री. केसरकर यांच्याबरोबरच शिक्षणमंत्री आशिष शेलार आणि पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनीही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकसानीची वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.

0000

सचिन गाढवे/वि.सं.अ/दि.6.11.2019

माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई, दि. 5  राज्याचे माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांच्या निधनाने सहकार आणि ग्रामविकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले  एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, श्री. धाबेकर यांचा ग्रामपंचात सदस्य ते राज्याचे जलसंधारणमंत्री असा प्रवास निश्चितच प्रशंसनीय आहे.  ग्रामविकास, सहकार, जलसंधारण आदी क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. अकोला जिल्हा परिषदेचे दीर्घ काळ नेतृत्व करताना त्यांनी या जिल्हा परिषदेला राज्यातील एक अग्रणी संस्था म्हणून ओळख प्राप्त करून दिली होती.  कापूस उत्पादकांच्या उन्नतीसाठी कॉटन फेडरेशनच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य महत्त्वपूर्ण होते. त्यांच्या निधनाने ग्रामविकासाची बांधिलकी जोपासणारा एक महत्त्वाचा नेता आपण गमावला आहे. ०००००

Chief Minister paid tribute to Babasaheb Dhabekar

Mumbai, date. 5th: CM Devendra Fadnavis paid tribute to the former Minister Babasaheb Dhabekar saying that with his death, we have lost an important personality that constantly endeavored cooperation and rural development.

CM says in his message, Shri. Dhabekar’s journey from Gram Panchayat member to the Water Conservation Minister is an estimable one. He has given important contribution to the field of rural development, cooperation, water conservation, etc. He led Akola Zilla Parishad for a long period and it became a leading Zilla Parishad in the state in his tenure. He made efforts for the growth of cotton producers through Cotton Federation and it is important work. With his death, we have lost an important leader committed to the rural development.

0000

लंडनमधील ‘वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट’ प्रदर्शनात राज्याच्या पर्यटन विभागाचा सहभाग

महाराष्ट्रातील पर्यटनामध्ये जगभरातील पर्यटकांनी दाखविला रस

मुंबई, दि. 5 : इंग्लंडची राजधानी असलेल्या लंडन शहरात आजपासून सुरु झालेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट’ प्रदर्शनामध्ये सहभागी होत महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाने राज्यातील विविध पर्यटन संधींची माहिती जगभरातील पर्यटन व्यावसायिकांना उपलब्ध करुन दिली. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलला जगभरातील पर्यटन व्यावसायिकांसह हौशी पर्यटक, पत्रकार, अभ्यासक, अधिकारी आदींनी भेट देऊन राज्यातील ताडोबा अभयारण्यापासून विविध समुद्रकिनारे, गुंफा, किल्ले, जंगले आदींची माहिती घेतली. राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल यांनी या सर्वांशी संवाद साधत महाराष्ट्राच्या पर्यटन वैभवाची त्यांना माहिती दिली. तसेच महाराष्ट्राला भेट देण्यासाठी निश्चित यावे, असे आग्रहाचे निमंत्रणही त्यांना देण्यात आले.

वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट प्रदर्शनात जगभरातील बहुतांश सर्व देशांनी सहभाग घेतला आहे. आपापल्या देशातील पर्यटनस्थळांची माहिती देऊन जगभरातील पर्यटक, अभ्यासक, व्यावसायिक आदींना आपल्या देशांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न यातून केला जातो. महाराष्ट्रानेही यात सहभागी होत राज्यातील पर्यटन वैभवाचे द्वार जगभरातील पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिकांसमोर खुले केले आहे. आज केंद्रीय पर्यटन सचिव योगेंद्र त्रिपाठी यांच्या हस्ते महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले. राज्याच्या पर्यटन सचिव विनिता वेद-सिंगल, पर्यटन उपसंचालक रामदास खेडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

विविध पर्यटन संस्थांबरोबर बी टू बी बैठका

आइसलँड ट्रॅव्हलरच्या व्होन पीच, स्नॅप प्रॉडक्शनच्या साशा आरु, आय अॅम्बेसिडर ट्रॅव्हल नेटवर्कचे निकोलस मोन्टमागी, केथ जेनकिन्स, वर्ल्ड शो मीडियाचे अलेक्झांडर कोलीस, पुरातत्वशास्त्रविषयातील पत्रकार डेव्हीड कीज, ट्विटरचे रुचित उप्पल आदी विविध संस्था, पर्यटन कंपन्यांबरोबर आज बी टू बी बैठका घेण्यात आल्या. ओरिसाचे पर्यटन मंत्री जोतीप्रकाश प्रजापती, सचिव विशालकुमार देव, पर्यटन संचालक सचिन जाधव, दिल्लीच्या पर्यटन सचिव रश्मी वर्मा यांच्यासह भारतातील विविध राज्यांच्या अधिकाऱ्यांनीही महाराष्ट्र पर्यटनच्या स्टॉलला भेट दिली.

महाराष्ट्र पर्यटनच्या स्‍टॉलमध्ये राज्याचा ऐतिहासिक वारसा सांगणारे गडकिल्ले, अजिंठा, वेरुळ, एलिफंटा आदी विविध ऐतिहासिक गुंफांचे वैभव, व्याघ्र पर्यटन, समुद्रकिनारे, जंगले, कास पठारसारखी जागतिक वारसास्थळे, तीर्थक्षेत्रे, लोणावळा, महाबळेश्वर, चिखलदरा, माथेरान आदी थंड हवेची ठिकाणे अशा विविध पर्यटनस्थळांची माहिती प्रदर्शित करण्यात आली. याशिवाय महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव, खाद्यसंस्कृती, बॉलिवूड चित्रनगरी, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पर्यटन वैभव आदींची माहितीही देण्यात आली. महाराष्ट्र पर्यटनचा आकर्षक स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. मेराकी कम्युनिकेशन्स यांनी या स्टॉलची संकल्पना आणि बांधणी केली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या, परवा ‘महाराष्ट्राची समृद्ध रंगभूमी’ या विषयावर मुलाखत

मुंबई, दि. ५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलासकार्यक्रमात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांची महाराष्ट्राची समृद्ध रंगभूमी या विषयावर विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि.०६ आणि गुरुवार दि. ०७ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. दिलखुलासहा कार्यक्रम  प्रसारभारतीच्या न्यूज ऑन एअरया ॲपवरही बुधवार दि.०६ आणि गुरुवार दि. ०७ नोव्हेंबर २०१९ रोजी  सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत  ऐकता येईल. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्रात दि. ५नोव्हेंबर या दिवशी विष्णूदास भावे यांच्या जयंतीनिमित्त रंगभूमी दिवस साजरा केला जातो. याचे महत्त्व, संगीत नाटकांचा सुवर्णकाळ, प्रायोगिक रंगभूमीपुढील आव्हाने, नव्याने नाटकाकडे वळणाऱ्या युवा वर्गाला करिअर म्हणून असलेली संधी, नाटक अधिक समृद्ध व्हावे म्हणून आजच्या काळात करावे लागणारे प्रयत्न, नाट्यसंमेलनाचे फायदे या विषयांची माहिती श्री. प्रसाद कांबळी  यांनी जय महाराष्ट्रआणि  दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

००००

रब्बीच्या क्षेत्रात २२ टक्के वाढ; ७० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 5 : राज्यात रब्बीच्या क्षेत्रामध्ये 22 टक्के वाढ अपेक्षित असून सुमारे 69.72 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. 2 लाख 3 हजार 772 क्विंटल अनुदानित बियाणे या हंगामासाठी वाटप करण्यात येणार आहे. कृषी विभागामार्फत बियाणे आणि खतांची उपलब्धता करण्यात आली असून रब्बी हंगामात त्याची टंचाई जाणवणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याच्या रब्बी हंगामाच्या नियोजनाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, जलसंधारणमंत्री प्रा.राम शिंदे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, मुख्य सचिव अजोय मेहता आदी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, राज्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तेथे पंचनामे तात्काळ पूर्ण करुन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई वेळेवर देण्यासाठी प्रशासनाने मिशन मोडवर काम करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र 56.93 लाख हेक्टर असून यावर्षी त्यामध्ये 22 टक्क्याने अपेक्षित वाढ होणार असून हे प्रमाण 69.72 टक्के एवढे होणार आहे. नाशिक, नागपूर, औरंगाबाद, लातूर या विभागांमध्ये रब्बीच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ होणार आहे.

रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई व अन्य रब्बी पिकांसाठी 10 लाख 92 हजार 763 क्विंटल बियाणे उपलब्ध असून वाढीव क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या बियाणांच्या उपलब्धतेसाठी महाबीजमार्फत खरेदी केली जाईल. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत 2 लाख 3 हजार 772 क्विंटल अनुदानित बियाणे या वर्षी वाटप केले जाणार आहे. राज्यात या रब्बी हंगामासाठी 34.10 लाख मेट्रीक टन खताची मागणी असून त्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. रब्बी हंगामासाठी क्रॉपसॅप संलग्न विविध योजनांतर्गत 6 हजार 347 शेतीशाळांचे नियोजन करण्यात आले आहे.

अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले असले तरी शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे ज्या भागात शेतीचे जास्त नुकसान झाले आहे तेथे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बि-बियाणे व खते यांचा वेळेवर पुरवठा होईल, टंचाई जाणवणार नाही याची खबरदारी कृषी विभागाने घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी रब्बी हंगामासाठी कृषी विभागाने केलेल्या नियोजनाबाबत सचिव एकनाथ डवले यांनी सादरीकरण केले. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, कृषी आयुक्त सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

००००

अजय जाधव/विसंअ/5.11.19

राज भवन येथे स्वयंचिकित्सा शिबीर संपन्न

मुंबई, दि. 5 – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन येथे‘स्वयंचिकित्सेतून विकारांचे व्यवस्थापनया विषयावरील प्रशिक्षण व आरोग्य शिबिर संपन्न झाले.

लायन्स क्लब ऑफ ॲक्शन संस्थेचे अध्यक्ष गिरधारीलाल लुथरिया यांनी स्वयंचिकित्सेच्या माध्यमातून अशक्तपणा, वेदना तसेच विकार यांमधुन मुक्ती या विषयावर प्रात्यक्षिकांसह विवेचन केले.

कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय लायन्स क्लब तथा विश्व सिंधी सेवा संगमचे अध्यक्ष डॉ राजू मनवाणी, डॉ जिगर चावडा, डॉ जेनिथ तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

०००००

Govenror inaugurates workshop on Self-Healing

Mumbai,०५ -The Governor of Maharashtra Bhagat Singh Koshyari  today inaugurated a workshop on ‘the Art of Self-Healing’ at Raj Bhavan, Mumbai.

President of Lion Club of Action Mumbai Girdharilal Luthria gave a scientific presentation of effective management of pain and weakness  throuth self healing techniques.

President of Vishwa Sindhi Seva Sangam Dr. Raju Manwani and the staff and officers of Raj Bhavan were present.   

अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये – मुख्य सचिवांचे आवाहन

केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा

मुंबई, दि. 4 : अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उद्‌भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. महाराष्ट्र, गुजरात, दमण-दीवच्या मुख्य सचिवांशी कॅबिनेट सचिवांनी संवाद साधला.

अरबी समुद्रामध्ये हे चक्रीवादळ आले असून राज्यात विशेषत: ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पुढील तीन दिवस (दि.8 नोव्हेंबर पर्यंत) मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत, त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे.

चक्रीवादळामुळे पालघर, ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.

          

बैठकीस पदुम विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, आपत्ती निवारण कक्षाचे संचालक अभय यावलकर उपस्थित होते.

000

अजय जाधव/वि.सं.अ./4.11.2019

Anglers should avoid going to sea

due to the danger of cyclone in Arabian Sea

– Chief Secretary appeals

Situation reviewed by Central Cabinet Secretary

Mumbai, date.4th: Central Cabinet Secretary Rajiv Gauba communicated with the Chief Secretary of the states- Maharashtra, Gujrat, and Daman-Diu through video conferencing. He reviewed the preparations of administration to face the natural calamity likely to be appear due to the cyclone Maha in Arabian Sea.

Cyclone Maha has intensified in the Arabian Sea and alert is issued in the state. A Special alert for Thane and Palghar district is issued. Ajoy Mehta, Chief Secretary of the state has appealed anglers not to go to the sea for next three days (till 8th Nov.)  The anglers who are already gone to sea are also advised to return immediately and take shelter at nearest port.

Rainfall is predicted due to the cyclone in Palghar, Thane, and central Maharashtra. Therefore, the district administration is directed to be on alert mode, told the Chief Secretary.

Teams of the National Disaster Response Force are deployed at Pune to provide help in the natural calamity.  Their help will be taken if needed. He also told that districts nearby coastal areas are instructed to be more alert as a precautionary measure.

Principal Secretary of Animal Husbandry, Dairying & Fisheries Department Anupkumar, Secretary of Relief and Rehabilitation Department Kishorraje Nimbalkar, Information and Public Relations Department’s Secretary Brijesh Singh, Director of Disaster Management Unit Abhay Yawalkar were present in the meeting.

0000

ताज्या बातम्या

स्वच्छता अभियानात पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींना दहा लाखांचे इनाम – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

0
अमरावती, दि. 19 : ग्रामपंचायतींच्या सक्रिय सहभागाने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यशस्वी झाले आहे. या अभियानात पुरस्कार पटकाविणाऱ्या 18 ग्रामपंचायतींना प्रत्येकी दहा लाख रुपयांचा...

जिल्ह्यातील सर्व विभागात १ ऑगस्टपासून बायोमेट्रिकचा वापर आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती, दि. १९ (जिमाका ) : जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय विभागांमध्ये येता एक ऑगस्टपासून बायोमेट्रिक यंत्रणा अथवा फेसॲपचा प्राधान्याने वापर करावा. बायोमेट्रिक अहवाल सादर केल्यानंतरच...

सक्षम युवा संसाधन निर्मिती करणे ही सामाजिक जबाबदारी – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
अमरावती ' दि. १९ (जिमाका ) : भारत देश हा युवा संसाधनाने समृद्ध आहे. भारतासारख्या संस्कारित युवकांची जगाला गरज आहे. सक्षम युवा संसाधन निर्मिती...

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

0
सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे....

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

0
बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे,...