बुधवार, जुलै 23, 2025
Home Blog Page 415

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मदत करणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. २६ (जिमाका): असंख्य उच्चशिक्षित महिला लग्नानंतर आपली ओळख गृहिणी अशी करुन देतात. मात्र, हीच गृहिणी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर तिची समाजात स्वतंत्र ओळख निर्माण होते. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी नेहमीच आग्रही असून, आगामी काळात महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली.

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी; यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयोजित ‘मिनी सरस २०२५’ प्रदर्शन व विक्री केंद्रास आज पालकमंत्री श्री. पाटील यांनी भेट दिली यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, आजची महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. देशाच्या प्रगतीमध्ये सर्वात जास्त योगदान महिलांचे आहे. महिलांच्या सक्षमीकरणास राज्य शासनाचे प्राधान्य आहे. गेल्या वर्षभरात अनेक उद्योजकांना भेटून महिलांच्या कौशल्यानुसार त्यांना अर्धवेळ रोजगार उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरत होतो. टाटा उद्योग समूहाने याला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे महिलांना आपलं घर चालवण्यात हातभार लावता येईल व त्या आत्मनिर्भर होण्याची सुरवात होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

पालकमंत्र्यांचे बचतगटांना प्रोत्साहन…

या प्रदर्शनात महिलांनी उत्पादित केलेल्या विविध स्टॉलवर पालकमंत्री श्री. पाटील यांनी भेट देऊन विविध वस्तूंची प्रत्यक्ष खरेदी केली. त्याचबरोबर बचतगटांना प्रोत्साहन म्हणून त्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे रोख रक्कम 75 हजार रूपये दिले. प्रदर्शनात एकूण 75 स्टॉलधारक आहेत. प्रत्येकी रू. एक हजार याप्रमाणे खरेदीसाठी वैयक्तिक रू. 75000/- रोख त्यांनी दिले. या रकमेतून विविध वस्तुंची खरेदी करून ते साहित्य विविध बालनिरीक्षण गृहामध्ये देण्यात येणार असल्याचे श्रीमती धोडमिसे यांनी सांगितले.

केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 जानेवारीपासून बचत गट वस्तू विक्री प्रदर्शन मिनी सरस सुरू असून, दि. 27 रोजी त्याची सांगता होणार आहे. उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत स्वयंसहाय्यता समुहांनी व समुहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये बचत गटांनी उत्पादित केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे 54 स्टॉल व खाद्यपदार्थांचे 21 स्टॉल सहभागी झाले आहेत.

०००

 

‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.26 : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस धरून नाहीत, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी केले आहे.

या योजनेमध्ये  काही लाभार्थी महिला योजनेच्या अटी शर्तीनुसार अपात्र ठरत असल्याने स्वेच्छेने लाभाची रक्कम परत करत आहेत. तसेच ज्या महिलांकडून पुढील कालावधीतील लाभ नको असल्याबाबत स्वेच्छेने कळविण्यात येत आहे, अशा महिलांना त्यांची विनंती विचारात घेऊन लाभ देण्यात येत नाही. लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास सचिव श्री. यादव यांनी केले आहे.

0000

पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न

नंदुरबार, दिनांक २६ जानेवारी, २०२५ (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२५-२६ साठी जिल्ह्याच्या नियमित योजनांसाठी सुत्रानुसार १५२ कोटी, जिल्हा विकास आराखडा रुपये ४० कोटी व मुख्यमंत्री ग्राम सडक साठी ६ कोटी याप्रमाणे एकूण रुपये १६० कोटी ४ लक्ष इतकी तात्पुरती कमाल वित्तीय मर्यादा देण्यात आली आहे. आदिवासी उपयोजनेअंतर्गत रुपये ४१५ कोटी ४१ लाख इतकी नियतव्यय मर्यादा देण्यात आली आहे. तसेच अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत रुपये १४ कोटी मर्यादा देण्यात आली आहे.अशी तीनही वार्षिक योजनांसाठी एकूण रुपये ५८९ कोटी ४५ लाख ०९ हजार जिल्हा वार्षिक योजनांच्या प्रारुप आराखड्यास पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा वार्षिक समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस खासदार ॲङ गोवाल पाडवी, माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार सर्वश्री आमशा पाडवी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदाचे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, विशेष निमंत्रित सदस्य  डॉ. अभिजित मोरे, मधुकर पाटील, निखीलकुमार तुरखिया, निलेश माळी, मकरंद पाटील, सत्यानंद गावीत, किरसिंग वसावे, विजयसिंग पराडके, ॲङ राम रघुवंशी हे उपस्थित होते.

या बैठकीत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री पुढे म्हणाले की, नंदुरबार जिल्हा हा कृषी प्रधान जिल्हा आहे. जिल्हा विकास आराखडा च्या माध्यमातून पिकांची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने सर्व प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी माती परीक्षण प्रयोगशाळा पुढील १० दिवसात कार्यान्वित होईल. आणि दरवर्षी २५ हजार शेतकऱ्यांचे मोफत माती परीक्षण करून दिले जाईल. मायक्रो इरिगेशनसाठी  वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येईल. शेतकऱ्याच्या शेतमालाला रास्त भाव देणेसाठी प्रयत्न करण्यात येतील. आरोग्य सुविधा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी दुर्गम भागात साकव तयार करण्याची मोहीम आपण घेत आहोत. आगामी काळात सर्व आरोग्य केंद्र हे पायाभूत  सुविधायुक्त असतील, याची काळजी घेतली जाईल. सिकलसेल ही आदिवासी जनतेला भेडसावणारी मोठी आरोग्याची समस्या आहे. त्यासाठी सर्व नागरिकांचे सर्वेक्षण करुन त्यांना हेल्थ कार्ड दिले जाईल. प्रत्येक गरोदर माता व बालके यांचे  आरोग्य तपासणीकडे विशेष लक्ष देण्यात येईल. जिल्हा परिषद शाळा व आश्रम शाळा येथे दर्जेदार शिक्षण व पायाभूत सुविधा  पुरविणेसाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एक महिन्यात विशेष आराखडा करण्यात येईल. तोरणमाळ व प्रकाशा (दक्षिण काशी) येथे पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यांचे विकास आराखडे तयार करून शासनाकडे निधीसाठी प्रयन्त केले जातील.

यावेळी वर्ष २०२४-२५ मध्ये ३१ डिसेंबर, २०२४ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात आला तसेच वर्ष २०२५-२६ च्या शासनाकडील सिलींग बाबत आढावा घेण्यात आला.

यावेळी खासदार ॲङ गोवाल पाडवी, माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार सर्वश्री आमशा पाडवी, शिरीष नाईक, राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तळोदाचे प्रकल्प अधिकारी अनय नावंदर, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, विशेष निमंत्रित सदस्य  डॉ. अभिजित मोरे, मधुकर पाटील, निखीलकुमार तुरखिया, निलेश माळी, मकरंद पाटील, सत्यानंद गावीत, किरसिंग वसावे, विजयसिंग पराडके, ॲङ राम रघुवंशी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

0000

बचतगट उत्पादीत वस्तूंच्या मार्केटिंगसाठी प्रयत्नांची गरज -पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले

  • बचतगटांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री व प्रदर्शन

लातूर, दि. २६ : महिला बचतगटाची चळवळ राज्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रुजली आहे. या बचतगटांच्या माध्यमातून अनेक चांगल्या वस्तूंची निर्मिती केली जात आहे. या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी योग्य प्रकारे मार्केटिंग करण्याची आवश्यकता असल्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी आज येथे सांगितले.

जिल्हा क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत २६ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या काळात आयोजित मिनी सरस व जिल्हास्तरीय ‘हिरकणी हाट-२०२५’ प्रदर्शन व विक्री महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. भोसले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर, जिल्हा व्यवस्थापक देवकुमार कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

ग्रामीण भागातील पारंपारिक कलाकुसर, खाद्यपदार्थ, वस्तू यांचे उत्पादन बचतगटांच्या माध्यमातून घेतले जाते. या वस्तूंची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचल्यास त्यांची मागणी वाढेल. आज काही बचतगट चांगले पॅकेजिंग, मार्केटिंग करीत आहेत. जिल्ह्यातील सर्वच बचतगटांच्या दर्जेदार वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करावेत. यासोबतच ई-कॉमर्स संकेतस्थळावर जिल्ह्यातील बचतगटांची उत्पादने विक्रीला ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.भोसले यांनी दिल्या. आज बाजारपेठेत गुणवत्ता आणि पॅकेजिंगला अधिक महत्त्व असल्याने बचतगटांनी याबाबत सजग राहावे, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्री श्री. भोसले यांच्या हस्ते फीत कापून ‘हिरकणी हाट २०२५’ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी विविध बचतगटांच्या स्टॉलला भेटी देवून त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची माहिती घेतली. प्रास्ताविकात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती क्षीरसागर यांनी महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती दिली.

महोत्सवात ७५ स्टॉलचा समावेश

मिनी सरस व हिरकणी हाट महोत्सवात लातूर जिल्ह्यातून ६५ व राज्यातील इतर जिल्ह्यातून १० स्टॉल असे एकूण ७५ स्टॉल लावण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना अस्सल ग्रामीण स्वादिष्ट पदार्थ चाखण्याची आणि खरेदी करण्याची संधी मिळत आहे. भजी-भाकरी, पिठल-भाकरी, बासुंदी, मांडे, पुरणपोळी, दही धपाटे, तीळ-गुळाची पोळी, निलंगा राईस, बोरसुरी वरण व चाट आदी पदार्थांची चव याठिकाणी चाखायला मिळेल. तसेच सोलापूर जिल्ह्यातील उजनी स्पेशल खेकडा, मच्छी थाळी, चिकन, खानदेशी मांडे, मटन, ज्वारी व बाजरी भाकरी या ग्रामीण भागातील मुख्य आकर्षण असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

०००

वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या ६३ दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव दि.२६ (जिमाका): जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीतून जळगाव जिल्ह्यातील पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिल्ह्यातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.

वन्यजीव पर्यटनाला चालना

पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांच्या सोयीसाठी पाच नवीन पर्यटक गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या सहाय्याने २७ किलोमीटर परिसरातील वाघ, बिबट, अस्वल आणि अन्य वन्यजीवांचे दर्शन घेता येणार आहे. या नवीन उपक्रमामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, १२ स्थानिक आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या गाड्यांचे व्यवस्थापन स्थानिक वन व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आले आहे, ज्यामुळे पर्यावरणीय संवेदनशीलतेचा विचार केला जाणार आहे.

पोलीस दलाचे आधुनिकीकरण

जिल्ह्यातील पोलीस दलासाठी ६३ दुचाकी वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वाहनांचा उपयोग आपले पोलीस संकल्पना, डायल ११२ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि बीट पेट्रोलिंगसाठी होणार आहे. या वाहनांमुळे पोलीस दलाची गती, प्रतिसाद क्षमता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.

लोकार्पण समारंभ

या दोन्ही उपक्रमांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वन्यजीव संवर्धन आणि पोलीस दलाचे आधुनिकीकरण या दउद्दिष्टांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.

पर्यटन आणि सुरक्षा क्षेत्रात नवा अध्याय

या लोकार्पणामुळे जळगाव जिल्ह्यातील पर्यटन आणि सुरक्षेच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे. वन्यजीव अभयारण्यातील सुविधा मुळे पर्यटक वाढतील.

0 0 0 0

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव दि.२६ (जिमाका): ‘अग्रिस्टेक’ च्या माध्यमातून मिळणाऱ्या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दृष्टीने ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांचे ओळखपत्र हे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांनी केले. मुसळी बु, तालुका धरणगाव येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलतं होते.

यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नितीन पाटील, मोहन मराठे, कमलाबाई पाटील, भगवान पाटील, सीताराम पाटील, हिरामण पाटील, प्रेमराज गुंजाळ, देविदास मराठे आणि वसंत पाटील या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी कार्यक्रमास प्रांताधिकरी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार, महेंद्र सूर्यवंशी, गट विकास अधिकारी अजितसिंग पवार, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले , कृषी अधिकारी देसले व कोळी, नायब तहसीलदार सातपुते साहेब व मोरे साहेब तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सौं. सुरेखा सुरेश गुंजाळ, उपसरपंच वसंत दादा भिल, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील व मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. के. पाटील यांनी मानले.

0 0 0 0

विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी,कृषी,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव

जळगाव दि.२६ (जिमाका): प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, शेतकरी, खेळाडू, उद्योजक, वीरपत्नी, शिक्षक, व शासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, व महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे उपस्थित होते

त्यात पोलीस विभागात गुणवत्तापूर्ण सेवा व १५ वर्षांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी अनेक पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तुकाराम शिवाजी निंबाळकर यांना राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पदक प्रदान करण्यात आले.

वन विभागातील मानव व वन्यजीव संघर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वनपाल व वनरक्षकांचा गौरव करण्यात आला. त्यात श्री. विपूल पाटील, श्री. अजय महिरे, व श्री. योगेश देशमुख यांचा उल्लेखनीय सहभाग होता. तर क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्वप्नील कैलास महाजन (आट्यापाट्या), उदय अनिल महाजन (वेटलिफ्टिंग), व रोशनी सलीम खान (आट्यापाट्या) यांना गुणवंत खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. प्रा. डॉ. जयंत भालचंद्र जाधव यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देण्यात आला.

उद्योग व कृषी विभागात श्री. चेतन रमेश चौधरी यांनी स्प्रिंग उत्पादनात आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले म्हणून गौरविण्यात आले तर श्री. अशोक गडे यांनी केळीपासून बिस्किटे बनविण्याचे बौद्धिक स्वामीत्व हक्क ( पेटेन्ट ) मिळविल्याबद्दल गौरव करण्यात आला.

सामाजिक कार्यात श्री. नरेंद्र पाटील यांच्या “मानव सेवा तीर्थ” संस्थेला भटकणाऱ्या अनाथ लोकांसाठी केलेल्या कार्याबद्दल गौरविण्यात आले.  तर शहीद सैनिक लान्सनायक कै. देविदास त्र्यंबक पाटील यांच्या पत्नी श्रीमती कल्पना देविदास पाटील यांना जमीन वाटपाचा सन्मान करण्यात आले.

0 0 0 0

भारतीय प्रजासत्ताकाच्या 75 व्या वर्धापन दिनी पालकमंत्री यांच्या हस्ते संविधान उद्देशिकेचे वितरण

जळगाव दि.२६ (जिमाका): भारतीय प्रजासत्ताकाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पाच निवडक प्रतिनिधींना संविधान उद्देशिका भेट देण्यात आल्या. या विशेष उपक्रमाचा उद्देश संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे हा होता.

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, तसेच सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील उपस्थित होते.

संविधान उद्देशिका प्रतिनिधिक स्वरूपात ज्यांना देण्यात आल्या त्यात तृतीयपंथीय समुदायाचे प्रतिनिधी म्हणून श्री.मानव सुरेश इंगळे, खडगाव, ता. जामनेर येथील वाघूर प्रकल्पामुळे घर संपादित झालेले प्रकल्पग्रस्त व्यक्ती म्हणून श्री.समाधान लोटू माळी, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील मौजे मेलाने, ता. चोपडा येथील सरपंच श्रीमती. लालबाई प्रताप पावरा, जि. प. शाळा  पिलखेडे ता जळगाव येथे शिक्षण घेत असलेली मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी कु. मेघना विक्रम भालेराव, सिंधी समाजातील विद्यार्थिनी डॉ. नान्सी मुकेश सदमानी हिला भारतीय नागरिकत्व प्राप्त झालेले आहे.

0 0 0 0

पालघर जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून आपली ओळख निर्माण करेल-पालकमंत्री गणेश नाईक

पालघर, दि. २६:- शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील होत असलेल्या विकास कामांच्या व विविध प्रकल्पांच्या संदर्भात विचार करता आगामी काळामध्ये पालघर जिल्हा प्रगतीशील जिल्हा म्हणून आपली ओळख निर्माण करेल असा विश्वास वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला.

स्वातंत्र्य भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज पालघर जिल्ह्याचा ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पोलीस परेड मैदान, कोळगाव, जैनेसिस औद्योगिक परिसराच्या मैदानात वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री गणेश नाईक यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, शासकीय अधिकारी, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, कर्मचारी यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

या समारंभास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या वैदेही वाढाण,निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच वरिष्ठ अधिकारी शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री नाईक म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पालघर जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला असून या योजनेच्या माध्यमातून तळागाळातील खऱ्या अर्थाने गरजवंत असणाऱ्या जवळपास सहा लाख माता भगिनींना लाभ देण्यात आलेला आहे व आत्तापर्यंत सहा हप्त्यांमध्ये ही रक्कम अदा करण्यात आलेली आहे.

राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ निःशुल्कपणे कार्यान्वित करण्यात आलेली असून जिल्हा प्रशासनामार्फत १५३३ उमेदवारांना प्रशिक्षण देऊन रुपये २ कोटी ८८ लाख इतके विद्यावेतन देखील अदा करण्यात आले असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) कायदा २००६ अन्वये जिल्ह्यामध्ये एकूण ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील ५० हजार ६८७ वनहक्क दावे मंजूर करण्यात आलेले असून संपूर्ण देशात सर्वात जास्त वैयक्तिक वनहक्क दावे मंजूर करण्यात पालघर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो.

देशाच्या व्यापार विकासात कच्च्या व पक्क्या मालाची आयात निर्यात करताना समुद्रकिनाऱ्यालगत मोठ्या बंदरांची निर्मिती व अन्य साठवण क्षमता असणारे लॉजिस्टिक पार्कची उभारणी आवश्यक ठरते. मुंबई व आसपासचे क्षेत्र भारताच्या उत्तर व दक्षिण भागाचा मध्यबिंदू असून आखाती व पश्चिमी देशांशी जोडले जाणारे महत्त्वाचे भौगोलिक केंद्र आहे. पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे किनाऱ्यालगत नैसर्गिक २२ मीटर खोली असल्याने जगातील दहा मुख्य पोर्ट इतकी १५ टीईओ (तसेच वाढीव २३ टीईओ) कंटेनर क्षमतेचे बंदर विकसित करता येणार आहे. सदर बंदराला वाढवण तवा हा NH08 ला जोडणारा ३४ किलोमीटर लांबीचा रस्ता बांधणे प्रस्तावित आहे. सदर रस्त्यासाठी भू-संपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पामुळे राज्याचा आणि देशाच्या विकासाला हातभार लागणार असून लाखो स्थानिकांना व युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

दरवर्षी २५ डिसेंबर हा ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा केला जातो.या कालावधीमध्ये केंद्र शासनामार्फत १९ ते २४ डिसेंबर २०२४ या कालावधीत ‘सुशासन सप्ताह- गांव की ओर’ (Good Governance Week) साजरा करण्यात आला. केंद्र शासनाच्या DARPG विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या पोर्टलवर स्पेशल कॅम्प CPGRAM (सी पी ग्राम स्टेट पोर्टल मधील निकाली काढलेल्या तक्रारी, नव्याने ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या सेवा, तक्रारी निकाली काढण्याबाबतच्या यशोगाथा ( सक्सेस स्टोरीज) प्रसारमाध्यमाद्वारे विविध कार्यशाळांमधून तक्रार निवारण्यासाठी केलेले प्रयत्न, यांच्या एकूण मूल्यमापनानुसार उपक्रम कालावधीत, पालघर जिल्ह्याने महाराष्ट्रात ८ वा क्रमांक प्राप्त केलेला आहे. ही बाब जिल्ह्यासाठी निश्चितच गौरवास्पद आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ‘सुशासन सप्ताहा’मध्ये नागरिकांच्या तक्रारींचे ज्या पद्धतीने निवारण केले होते तसेच या कार्यक्रमात देखील विविध पोर्टलद्वारे नागरिकांच्या दाखल तक्रारींचे निरंतर निराकरण करण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्याचे अंतिम ध्येय आहे. कार्यालयीन कर्मचारी, भेट देणारे अभ्यागत यांना कार्यालयात वावरताना आवश्यक त्या सोयी सुविधांचे, जसे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, प्रतिक्षागृह बैठकव्यवस्था, मार्गदर्शक बोर्ड  याबाबत सर्व जिल्ह्यांतील क्षेत्रीय कार्यालयात आवश्यक ती उपाययोजना करणे प्रस्तावित आहे. १०० दिवसांच्या कार्यक्रमातील पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे नवगुंतवणूकदारांकरिता गुंतवणूक प्रोत्साहन हा असून स्थानिक व नवउद्योजकांना येणाऱ्या सर्वच अडचणींचे निराकरण करून उद्योगक्षेत्रात सुलभता येण्याकरिता आवश्यक त्या सर्वसोयीसुविधा ‘एक खिडकी योजने’ सारख्या योजनांद्वारे त्यांच्या प्रशासकीय अडचणी कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.

0000

‘युवा उमेद’ने युवकांना रोजगाराची संधी मिळेल – मंत्री अतुल सावे

नांदेड, दि. २६ : भोकर मतदार संघातील युवकांसाठी आमदार श्रीजया चव्हाण यांनी सुरू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. युवा उमेदच्या माध्यमातून प्रशिक्षित होऊन युवकांना रोजगाराची संधी मिळेल अशी आशा, इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केली आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियलमध्ये आयोजित युवा उमेदवार या फेसबुक पेज व इन्स्टाग्रामच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. अजित गोपछडे,  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपाचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, कौशल्य विकास विभागाच्या रेणुका तम्मलवार, आदी मान्यवर उपस्थित होते.

‘युवा उमेद’च्यावतीने शनिवार २२ फेब्रुवारी २०२५ रोजी शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा रोजगार मेळावा आणि मेळावापूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन देखील पालकमंत्री व इतर मान्यवरांनी याप्रसंगी केले. मराठवाड्यात अनेक उद्योग येत असून, ती संधी साधण्यासाठी आपल्या भागातील तरुणांनी सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री श्री. सावे यांनी केले. विशेष म्हणजे त्यांच्या ओबीसी विकास खात्यांतर्गत असलेली संस्था ‘महाज्योती’चा स्टॉल अर्धापूरच्या रोजगार मेळाव्यात उपलब्ध असेल, असेही त्यांनी घोषित केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणली. मराठवाड्यासारख्या भागात देखील ही गुंतवणूक व्हावी, यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार अभिनंदनीय असल्याचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले.

आमदार श्रीजया चव्हाण यांनी रोजगार व स्वयंरोजगाराच्या शोधात असलेल्या युवा वर्गाला माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण देऊन मदत करावी, यासाठी आम्ही ‘युवा उमेद’ उपक्रम सुरु केला. या माध्यमातून रोजगाराची संधी व तरुणांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमात यशवंत महाविद्यालयाच्या अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. विश्वाधार देशमुख यांनी केले.

०००

 

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष अनेकांसाठी ‘जीवनदायी’….

0
आपल्या समाजात अनेक कुटुंबे अशी आहेत, ज्यांना अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारामुळे किंवा अपघातामुळे मोठे वैद्यकीय खर्च करावे लागतात. अशा वेळी आर्थिक अडचणींमुळे अनेकांना योग्य...

वाढदिवशी मुख्यमंत्र्यांना गडचिरोली विकासाचा टिळा…

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस संपूर्णपणे गडचिरोली विकासासाठी समर्पित केला. तेथे विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन केले. वृक्षारोपणाच्या मोहीमेचा शुभारंभही केला. दरम्यान, दिवसभरात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात रक्तदान शिबिर; ८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य रक्त...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर ‘कृषी समृद्धी योजना’ राबविणार – कृषी मंत्री ॲड....

0
मुंबई, दि. २२ : कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी, “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर, “कृषि समृद्धी योजना”...

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

0
मुंबई दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार...