नवनवीन प्रयोगासाठी कृषी प्रदर्शन उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर, दि. 29 : पारंपरिक शेतीबरोबर अत्याधुनिक पद्धतीने शेतीतून उत्पादन घेतल्यास बळीराजा समृद्ध होईल. शेतकऱ्यांनी त्याच मेहनतीत दुप्पट उत्पादन देणाऱ्या प्रजातीची लागवड करावी. अशा नवनवीन प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला.

कृषी विभागाच्यावतीने आयोजित ‘कृषी पंढरी प्रदर्शन व तृणधान्य महोत्सव २०२३’ कार्यक्रमात ते बोलत होते. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आयोजित या कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे आदी उपस्थित होते.

शासकीय महापुजेवेळी आपण विठुरायाला बळीराजाच्या समृद्धीसाठी साकडे घातले असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शासनाने बळीराजाच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. शेती आणि शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार २.०, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, केवळ 1 रुपयांत पीकविमा, उत्पन्नवाढीसाठी महाकृषीविकास अभियान आदी योजना सुरू केल्या आहेत. एक रुपयात पीक विमा देण्यासाठी विमा हप्त्याची रक्कम शासन भरणार आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे प्रति वर्षी सहा हजार रूपये देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे, असे ते म्हणाले.

शेतकरी सुखी संपन्न व्हावा, त्याचे आरोग्य चांगले राहावे, अशी सदिच्छा व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आहे. यानिमित्ताने प्रदर्शनात तृणधान्य व त्याचे उप पदार्थ पाहावयास मिळाले. हे प्रदर्शन शेतकऱ्यांना समृद्ध करणारे ठरेल. त्यातून माहिती आणि प्रेरणा घेत शेतकऱ्यांनी प्रयोग केल्यास नवीन कृषि क्रांती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषी पंढरी प्रदर्शन व तृणधान्य महोत्सव 2023

कृषीविषयक आधुनिक विकसित तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करणे, शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी – शास्त्र विस्तार यंत्रणा साखळी सक्षमीकरण करणे, शेतकरी उत्पादक ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, बाजाराभिमुख कृषि उत्पादनास व विपणनास चालना देणे, आहारातील तृणधान्याचे महत्त्व पटवून देणे हा या महोत्सवाच्या आयोजनाचा हेतू आहे.

या प्रदर्शनात एकूण 125 स्टॉल्स उभारण्यात आले असून, शासकीय विभागाचे स्टॉल 29 आहेत. महामंडळ, शेतकरी उत्पादक कंपनी, मिलेट उत्पादने, प्रक्रियायुक्त पदार्थ, सेंद्रीय व औषधी पदार्थ, बियाणे खते औषधे कंपनी, ठिबक व तुषार सिंचन उत्पादक, कृषी यांत्रिकीकरण आणि गृहोपयोगी वस्तुचे स्टॉल्स आहेत.

000000