‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

0
15

नाशिक, दिनांक : 30 जून, 2023 (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमाच्या अनुषंगाने 8 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हा पातळीवर ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

जिल्हा पातळीवर होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम नियोजनाबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार डॉ. राहूल आहेर, सिमा हिरे, देवयानी फरांदे, दिलीप बनकर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, नाशिक महानगरपालिका आयुक्त भाग्यश्री बानाईत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत आतापर्यंत तालुका पातळीवर 72 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून साधारण दोन लाख 50 हजार 569 लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जिल्हा पातळीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी अधिनस्त कार्यालयांकडून योजनानिहाय लाभार्थ्यांची यादी सादर करावी. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, जेवण अशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाच्या वेळी रोजगार मेळावे, महाआरोग्य शिबिर, कृषी विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल लावण्यात यावेत. तसेच कार्यक्रमाच्या वेळी लाभार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था महिला बचत गटांमार्फत करण्यात यावी. या बैठकीत कामगार विभाग, पशुसंवर्धन, कृषी, समाज कल्याण, विद्युत, आरोग्य विभाग, महिला व बाल विकास विभाग, कौशल्य विकास, महसूल विभाग यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने अनुकंपा भरतीच्या अनुषंगाने केलेल्या कामाचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. तसेच ज्या विभागांच्या अनुकंपा भरती संदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर योग्य कार्यवाही करून नियुक्ती आदेश तयार करण्यात यावेत, असे निर्देश ही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले.

शासन आपल्या दारीउपक्रमाचे तालुकानिहाय झालेले कार्यक्रम…. 

क्र. तालुका शिबिरांची संख्या लाभार्थीं संख्या
1 नाशिक 2 14003
2 निफाड 5 14263
3 सिन्नर 5 11978
4 मालेगांव 4 35480
5 कळवण 3 90833
6 सुरगाणा 5 5944
7 दिंडोरी 7 22210
8 पेठ 6 2672
9 येवला 5 11934
10 नांदगाव 8 9890
11 चांदवड 5 7358
12 देवळा 3 2790
13 बागलाण 6 9600
14 इगतपुरी 3 7656
15 त्र्यंबकेश्वर 5 3958
  एक 72 250569

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here