धुळे, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) :- धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील अपघात ही अतिशय दुदैवी घटना आहे. या अपघातात 10 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 15 जण येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तर 3 जण सिध्देश्वर हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या जखमींची आज सायंकाळी ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी रुग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली.
पळासनेर येथे कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्याने आज सकाळी हा अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये वाहन चालक, क्लिनरसह शाळकरी मुलांचाही समावेश असून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासनामार्फत उपचार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येणार आहे. या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अश्विनी पवार, महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते.