अंबड येथील जागेचा झोन बदल प्रस्ताव द्यावा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. 5 : मौजे अंबड येथील गुरेचरण असलेली जागा मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेस देण्याविषयी मागणी करण्यात आली आहे. ही जागा महानगर पालिका क्षेत्रात येत असून या जागेवरील ग्रीन झोन आहे. नाशिक महानगरपालिकेने झोन बदल प्रस्ताव द्यावा, असे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिले.

मंत्रालयातील दालनात मौजे अंबड ता. जि. नाशिक येथील गट क्रमांक 43 गुरेचरण असलेली जागा गौतम नगर / साठे मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेस कायमस्वरूपी मिळणेबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महसूल मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक जिल्हाधिकारी गंगाधरन डी., सहसचिव संजय बनकर आदी अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेने दिलेल्या घरकुलांचे बांधकाम निकृष्ट असल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात यावी. तत्कालीन जबाबदारीची चौकशी करावी. तसेच संबंधित यंत्रणेने घरकुलांची दुरुस्ती करून द्यावी, असे निर्देशही मंत्री श्री. विखे पाटील यांनी दिले.

००००

वर्षा आंधळे/विसंअ/