पालकमंत्र्यांकडून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी

0
12

बी-बियाणांसाठी तातडीने पाच हजाराची मदत

यवतमाळ,दि.13 (जिमाका) : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नेर तालुक्यातील शेतपिकांची पालकमंत्री संजय राठोड यांनी आज पाहणी केली. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाकडून नुकसानग्रस्तांना लवकरच मदत मिळवून देण्यात येईल, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतांना पालकमंत्र्यांनी सांगितले. प्राथमिक पाच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना तातडीने वितरीत करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी पालकमंत्र्यांसमवेत जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, सरपंच सिध्देश्वर काळे आदी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पालकमंत्र्यांनी नेर तालुक्यातील सिरसगाव मंडळमधील मोझर, सावरगाव काळे येथील नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पेरणी व इतर बाबींसाठी तातडीने पाच हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधतांना त्यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी यावेळी जाणून घेतल्या. शेत पिकांचे तातडीने सर्वेक्षण करण्याच्या सूचना यापूर्वीच केल्या आहे. नुकसानीसाठी शासनाच्यावतीने लवकरच सहाय्य केले जातील, असे ते म्हणाले.

अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांच्या विहीरी खचल्या तर काही शेतकऱ्यांच्या विहीरी बुजल्या आहे. अशा विहिरींचे पंचनामे देखील तातडीने केले जात आहे. विहीर नुकसानीची मदत तातडीने देण्यात येईल. अतिवृष्टीमुळे काही पुलांचे नुकसान झाले. त्या पुलांच्या दुरुस्तीसाठी बजेट मध्ये निधी मंजूर करून तातडीने दुरुस्ती करण्यात येतील.

पालकमंत्र्यांनी स्वत शेतात जावून पिकांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आत्मियतेने संवाद साधला. शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यात येईल, असे संवाद साधतांना ते म्हणाले. यावेळी काही शेतकऱ्यांनी नाल्यांचे खोलिकरण करणे गरजेचे असल्याची मागणी यावेळी केली. नेर तालुक्यातील सिरसगाव मंडळमध्ये दुरुस्ती होऊ शकतील असे 16 एकर क्षेत्र खरडून गेले आहे. यात एकट्या सावरगाव काळे येथील 10 हेक्टरचा समावेश आहे. तर या मंडळात एकून 114 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांनी दिलासा दिला.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here