विधानपरिषद लक्षवेधी सूचना

0
10

राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांतील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 18 : सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर  झालेला अत्याचार आणि हत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून जिथे त्रुटी आहेत त्याची पूर्तता करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.

मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे सावित्री बाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर झालेला अत्याचार  आणि हत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर कोणकोणत्या उपायोजना केल्या जात आहेत याबाबत विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीना शासकीय वसतिगृह वांद्रे येथे स्थलांतरित केले जाईल. राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व सदस्यांकडून आलेल्या सूचनांवर कार्यवाही केली जाईल. महिला वसतिगृहात महिला वॉर्डन नेमणे, सुरक्षा मंडळातील व सैन्यदलातील निवृत्त सैनिकांनादेखील सुरक्षा रक्षक म्हणून नियुक्त करणे याबाबत निर्णय घेण्यात येईल. सर्वत्र सीसीटीव्ही यंत्रणा सर्वत्र बसवण्यात येईल.

मरीन ड्राईव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात ही घटना घडली, तेथील वसतिगृह अधिक्षिका यांना कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी  निलंबित करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या घटनेची चौकशी करण्यासाठी समितीदेखील नेमण्यात आली आहे. महिला वसतिगृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने आलेल्या सर्व सूचनांवर कार्यवाही करून लवकरात लवकर त्रुटी दूर करण्यात येतील, असे मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले

या लक्षवेधीच्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री विक्रम काळे, सचिन अहिर, अनिकेत तटकरे, धीरज लिंगाडे, डॉ.मनीषा कांयदे यांनी सहभाग घेतला. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महिला दक्षता समिती स्थापन करण्याची सूचना केली.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here