रंगभूमी उपसमितीची शनिवारी नागपूर येथे बैठक

मुंबई, दि. 19 : ‘राज्याचे सांस्कृतिक धोरण 2010’ चा फेरआढावा घेण्यासाठी शासनाने गठित केलेल्या रंगभूमी उपसमितीची बैठक शनिवार, 22 जुलै रोजी नागपूर येथे होणार आहे. या बैठकीत नागपूर शहरातील सर्व नाट्यकर्मींनी उपस्थित राहून रंगभूमीशी संबंधित काही अडचणी – सूचना असल्यास त्या उपसमितीसमोर मांडाव्यात, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

ही बैठक श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृह, व्होकार्ट हॉस्पिटल मागे, साई सभागृहाच्यावर, शंकर नगर येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये काळाच्या ओघात बदलणारे सांस्कृतिक बाबींचे स्वरूप, नाट्य क्षेत्रातील बदल नाट्यकर्मींच्या अडचणी, त्यांच्या सूचना इत्यादी विचारात घेण्यात येणार आहेत. नागपूर शहरातील सर्व रंगकर्मीनी (नाट्य निर्माता, लेखक, कलाकार, तंत्रज्ञ, नाट्य संस्था इत्यादी) या बैठकीस उपस्थित राहून रंगभूमीशी संबंधित काही अडचणी सूचना असल्यास त्या उपसमितीसमोर मांडाव्यात, असे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

000

दीपक चव्हाण/विसंअ/