मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी सतर्कता बाळगावी – पालकमंत्री शंभुराज देसाई

सातारा, दि. 20 (जि.मा.का.) : हवामान विभागाने काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यालाही मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असून सर्व शासकीय यंत्रणांनी अत्यंत सतर्क रहावे. ज्या संवेदनशील ठिकाणी लोकांचे तातडीने स्थलांतर करणे आवश्यक आहे, अशा ठिकाणी कोणताही धोका न पत्करता तेथील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करावे, स्थलांतरीत केलेल्या नागरिकांना अन्न, शुध्द पेयजल, पांघरुण, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करुन देण्याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेला मुसळधार पाऊस व देण्यात आलेला इशारा या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभुराज देसाई  यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हा प्रशासनाशी संवाद साधला, यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधिक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसलिदार, गट विकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, आरोग्य अधिकारी आदी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला.

पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले दुथडी भरुन वाहत आहेत, काही ठिकाणी रस्ते खचत आहेत, पूल वाहून जात आहेत, दरडी कोसळत आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. ज्या संवेदनशील ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर आवश्यक आहे, अशा ठिकाणी मंगलकार्यालये, मोठी सभागृहे, शाळा, आदी सुरक्षित ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करावे. त्यांना निवारा अन्न, शुध्द पेयजल, अशा सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. नागरिकांनीही प्रशासनाच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद द्यावा, संवेदनशील भागात पोलीसांची गस्त वाढवावी. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी राहणे बंधनकारक आहे. लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरु नये यासाठी प्रशासकीय यंत्रणांची पथके तयार करावीत. या पथकांनी संवेदनशील ठिकाणी भेटी द्याव्यात. दरड कोसळण्याची ठिकाणे असणाऱ्या भागात यंत्रणांनी आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, दरडी कोसळण्याच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या 41 गावांतील लोकांचे त्वरीत स्थलांतर करावे, त्यांना अन्न, शुध्द पेयजल, औषधे, आदी आवश्यक सुविधा, उपलब्ध करुन द्याव्यात. स्थलांतरीत ठिकाणी आवश्यकतेनुसार जनावरांच्या चाऱ्याची तजवीज ठेवावी. स्थलांतरीतांपैकी कोणीही रात्री घरी जावू नये याची बचाव यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. अन्नाची पाकीटे, कोरडे खाद्यपदार्थ उपलब्ध ठेवावेत. वैद्यकीय पथकांनी लोकांना स्वत: जावून भेटी द्याव्यात व भेटीचा अहवाल सादर करावा. आरोग्य यंत्रणेने जलजन्य आजार,   सर्पदंश यावरील आवश्यक पुरेसा औषध पुरवठा उपलब्ध ठेवावा. वादळवारे, पाऊस यासारख्या कारणांनी विद्युत पुरवठा खंडीत झाला असेल तेथील विद्युत प्रवाह विद्युत विभागाने लवकर सुरू करावा. कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी यंत्रणांनी अलर्ट मोडवर काम करावे. आपत्तीच्या काळात नागरिकांनी घाबरुन न जाता मदतीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.

नियंत्रण कक्ष

  • मान्सून कालावधीत सर्व संबंधित विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे जिल्हास्तरावर जिल्हा नियंत्रण कक्ष 24 x 7 या तत्वावर कार्यान्वित आहे.

फोन नं -02162-232349/232175.

  • तसेच जिल्हयातील पोलीस विभाग- फोन नं.02162-233833/231181 मो.नं.-9011181888, पाटबंधारे विभाग फोन नं -02162-244681/244654/244481, सार्वजनिक बांधकाम विभाग फोन नं-02162-234989, आरोग्य विभाग फोन नं- 02162-233025/238494, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मो.नं-9029168554 इत्यादी विभागांनी त्यांचे स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित केलेले आहेत.
  • मान्सून कालावधीत धरण क्षेत्रात होणारे पर्जन्यमान, धरणातील साठा, आणि पाण्याचा विसर्ग तसेच नदीपातळी इ. अदयावत माहिती ऑनलाईन प्राप्त करुन घेणेसाठी शासनाचे वेबसाईट
  1. www.Punefloodcontrol.com 2. http://210.212.172.117/rtdas

जिल्हा प्रशासनाकडून नागरीकांना आवाहन

  • अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे/भूस्खलनामूळे धोका निर्माण होणाऱ्या गावातील नागरिकांनी  अतिवृष्टीच्या कालावधीत सतर्क रहावे. धोकादायक स्थतीत अथवा मोडकळीस आलेल्या घरात राहू नये. स्वत:हून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.

  • धोकादायक ठिकाणी शक्यतो प्रवास टाळावा. कडा कोसळणे/दरडी कोसळण्याच्या ठिकाणी थांबू नये.
  • अतिवृष्टीचे काळात मोठया प्रमाणात डोंगरातून पाण्याचा प्रवाह सुरु असतो, ओढे-नाले पात्र भरुन वाहत असतात अशावेळी पूराच्या पाण्यात /ओढयातून प्रवास टाळावा. तसेच नदी, ओढ्यानाल्यावरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास धोकादायक स्थितीमध्ये पूल ओलांडू नये.
  • जिवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
  • पर्यटनाचे ठिकाणी उदा. धबधबे, तलाव इ. ठिकाणी धोकादायक ठिकाणी प्रवेश करु नये. त्याचप्रमाणे धोकादायक ठिकाणी फोटो काढण्याचे अथवा सेल्फी घेण्याचा मोह टाळावा.
  • नदी अथवा नाल्याची पाणी पातळी वाढल्यास कोणत्याही परिस्थितीत नदी पात्रात प्रवेश करु नये.
  • अतिवृष्टीच्या कालावधीत तात्काळ सुरक्षित जागेत (नातेवाईक,समाजमंदिर,शाळा इ.ठिकाणी)

स्वत: हून स्थलांतरित व्हावे.

  • मान्सून कालावधीत साथीच्या रोगांपासून वाचण्यासाठी शक्यतो पाणी उकळून गार करुन प्यावे.
  • विजा कडकडत असताना कोणत्याही परिस्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये. (पाण्यात असल्यास तात्काळ बाहेर पडावे.)

0000