नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय व मेयो रूग्णालयातील रिक्त पदे
भरण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो रूग्णालय येथे परिचारिकांची 145 व चतुर्थ श्रेणी संवर्गातील 160 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य प्रवीण दटके यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, परिचारिकांची रिक्त पदे टीसीएस या कंपनीमार्फत भरण्याची कार्यवाही सुरू असून स्पर्धा परीक्षाही घेण्यात आली आहे. ही कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. तर संस्थेतील वर्ग चार ची सरळसेवेची पदे जिल्हास्तरीय समितीमार्फत भरण्याबाबत कळविण्यात आले आहे. ही पदे उपलब्ध होईपर्यंत संस्थेने बाह्यस्त्रोतामार्फत पदे भरण्यासाठी केलेल्या करारास मुदतवाढ देण्यात आली आहे. पदभरती करताना प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घेणार असल्याचे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याबाबत तत्कालिन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कार्यवाही होईल, असेही त्यांनी अन्य एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
सदस्य सर्वश्री अभिजित वंजारी, एकनाथ खडसे, वजाहत मिर्झा, सतेज पाटील, निलय नाईक, सचिन अहिर यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
000
देवठाण सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी महिनाभरात
कार्यादेश देणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. 20 – अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील देवठाण येथील तीन गावांसाठी असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित प्रस्तावाची निविदा प्रक्रिया सुरू असून महिनाभरात कार्यादेश देण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य प्रा.राम शिंदे यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
देवठाण पाणी पुरवठा योजनेच्या सद्यस्थितीबाबत अधिक माहिती देताना मंत्री श्री.पाटील म्हणाले, ही योजना जिल्हा परिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आली आहे. याअंतर्गत समाविष्ट गावे व वाड्यासाठी सर्वेक्षण करून 24.93 कोटी रूपयांची मूळ योजना तयार करण्यात आली होती. यापूर्वीचे योजनेचे सर्वेक्षण योग्य असून ग्रामस्थांनी वाढीव टाक्या, वितरण व्यवस्था व दूरच्या चार वाड्यापर्यंत पाईपलाईनची मागणी केली आहे. पुनर्सर्वेक्षण करून सुधारित प्रस्तावात या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. सुधारित अंदाजपत्रक अंतिम करण्याची कार्यवाही प्रगतीत असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. येत्या महिनाभरात याबाबतचे कार्यादेश देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. याकामाच्या सर्वेक्षणामध्ये त्रुटी आढळल्यास त्याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले. पुरेशा पाण्याच्या उद्भवाशिवाय पाणी योजनांची पुढील कामे होऊ नयेत, याबाबतची अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
सदस्य एकनाथ खडसे यांनी याअनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
000
किनवट तालुक्यामध्ये स्वतंत्र स्त्री रूग्णालय आणि गोकुंदा उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देणार – डॉ.तानाजी सावंत
नांदेड जिल्ह्यातील किनवट हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील स्वतंत्र स्त्री रूग्णालय तसेच गोकुंदा उपजिल्हा रूग्णालयाच्या श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य राजेश राठोड यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
डॉ.सावंत म्हणाले, गोकुंदा हे गाव किनवट पासून चार किमी अंतरावर आहे. येथील उपजिल्हा रूग्णालयाचे 100 खाटांच्या रूग्णालयात श्रेणीवर्धन करण्यासाठी लोकसंख्येचा असणारा निकष पूर्ण होत नसल्याने हा प्रस्ताव अमान्य करण्यात आला आहे. तथापि किनवट हा दुर्गम, आदिवासी भाग असल्याने येथे स्वतंत्र स्त्री रूग्णालय तसेच गोकुंदा येथील उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याबाबत बैठक घेऊन विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. राज्यात आवश्यक असणारी डॉक्टर आणि नर्सेसची पदे लवकरच भरली जातील, असेही त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
सदस्य सर्वश्री भाई जगताप, प्रवीण दरेकर, श्रीमती प्रज्ञा सातव यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.
000
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिले जाणारे क्रीडा पुरस्कार वितरण पुढील वर्षापासून १९ फेब्रुवारी रोजीच – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे
क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल देण्यात येणारे पुरस्कार कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे प्रलंबित होते. जाहीर झालेले पुरस्कार यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी देण्याचा शासनाचा विचार आहे. पुढील वर्षापासून हे प्रस्ताव जानेवारी महिन्यात अंतिम करून शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी म्हणजेच 19 फेब्रुवारी रोजी देण्यात येतील, असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य अभिजित वंजारी यांनी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केला होता.
क्रीडा मंत्री श्री.बनसोडे म्हणाले, कोणत्याही पात्र खेळाडूवर अन्याय होऊ नये तसेच पात्र खेळाडू पुरस्कारापासून वंचित राहू नये, याकरीता शासनाने प्रस्तावित पुरस्कार यादीबाबत हरकती व सूचना करण्यासाठी तरतूद केली आहे. तथापि यासंदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, विविध मान्यताप्राप्त खेळाडूंच्या संघटना तसेच विधिमंडळाचे संबंधित सदस्य यांची एक बैठक आयोजित करण्यात येईल. थेट नियुक्तीच्या धोरणात सुधारणा करून पात्र खेळाडूंना नियुक्ती देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. योगासनाचा समावेश शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये करण्याबाबत तपासून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी अन्य एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतेज पाटील, गोपीचंद पडळकर, सत्यजित तांबे यांनी सहभाग घेतला.
000
बी.सी.झंवर/विसंअ/