बुलडाणा, दि 22 : जिल्ह्यात येत्या दोन दिवसात सर्वत्र अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या इशाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळत आहे. नागरिकांनीही सहकार्य करीत सुरक्षितता बाळगावी, तसेच घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.
जिल्ह्यात पुढील दोन दिवस चांगल्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर, सोनाळा, बाबनबीर या महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. तसेच संग्रामपूर तालुक्यातील नदीनाल्यांना पूर आला आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी पाऊस सुरू असताना नदीनाल्यांमध्ये पुराचे पाणी असताना जाऊ नये. नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी-नाल्याच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे.तसेच पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडून जाण्याचा प्रयत्न करू नये. तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ टाळावे. पाऊस सुरू असताना घराबाहेर पडू नये. जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास पावसाचा अंदाज घेऊनच कामकाजाचे नियोजन करावे.
नागरिकांनी वीज पडण्यापासून संरक्षणासाठी दामिनी ॲपचा उपयोग करावा. तसेच सुरक्षितस्थळी आश्रय घ्यावा. आपत्तीच्या काळात नागरिकांनी पोलीस विभाग व स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पूर परिस्थितीमध्ये काय करावे
पूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी उंच ठिकाणी जावे. विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा. गाव, घरात जंतुनाशके असल्यास ते पाण्यात विरघळणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. पूरासंदर्भात पूर्वकल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान व महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी घेवून जावी.
परिस्थितीमध्ये काय करु नये
पूर असलेल्या भागात विनाकारण भटकू नये. पुराच्या पाण्यात चूकुनही जावू नये. दुषित व उघड्यावरचे अन्न व पाण्याचे सेवन करणे टाळावे. पुलावरुन पाणी वाहत असताना पूल ओलांडू नये. पाऊस सुरू असताना घराबाहेर पडू नये.