दुर्गम भागातील पावसाळी आपत्तीचे समन्वयाने नियोजन करा – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

0
10

नंदुरबार दि २३ जुलै २०२३ (जिमाका वृत्त) : नंदुरबार जिल्ह्याचे बहुतांश क्षेत्र हे डोंगरी व दुर्गम असून पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे आरोग्य,दळणवळणासह दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेवून सर्व विभागांनी पावसाळी आपत्तीचे समन्वयाने नियोजन करावे. तसेच अत्यावश्यक सेवांसह सर्व विभागांनी सतर्कता बाळगण्याच्या सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिल्या आहेत.

ते जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘दिशा’ समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ.हिना गावित होत्या. जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, सहाय्यक जिल्हाधिकारी मंदार पत्की, पदाधिकारी व विविध यंत्रणांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, खतांचा पुरवठा, गरज यांचा वेळोवेळी आढावा घेवून कुठेही खत टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी.धरणांमधील पाणी साठा व विसर्गाचे नियोजन करून नदी व धरण काठावरील गावे, नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना देण्यात याव्यात. कुठेही जीवित व वित्त हानी होणार नाही याची काळजी घ्यावी. पूलांची डागडूजी व दुरूस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावित. रूग्णवाहिका सुस्थितीत ठेवण्यासह वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविक,शिक्षक तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी मुख्यालयीच थांबवे. जलजीवन मिशनच्या लाभापासून एकही पाडा आणि गाव वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. जलयुक्त शिवाराची कामे करताना ग्रामसभा घ्याव्यात असेही यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करावी

केंद्र सरकार पुरस्कृत योजनांचा सर्व्हे करताना एकही गाव, नागरिक सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याच्या सूचना देताना कुठल्याही योजनेचा लाभ देताना स्थानिक ग्रामसभा व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचाही आदर करण्याच्या सूचना यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी दिल्या आहेत.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here