मुंबई, दि. २४ : औरंगाबाद जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबत विरोधी पक्षनेते यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली असून चौकशीत पोलीस प्रशासनाकडून बेकायदेशीर वसुली करण्यात येत असल्याबाबत निष्पन्न झाले नाही. तथापि, सभागृहात दिलेल्या माहितीची शहानिशा करून अवैध व्यवसाय चालवणारे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठिशी घालणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, अवैध व्यवसाय सुरू असून व्यावसायिकांकडून वसुली करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून दलालांची नेमणूक केली आहे. याबाबत शासनाने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबतची मागणी विरोधी पक्षनेते यांनी पोलीस महासंचालक तसेच पोलीस आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे केली होती. त्या चौकशीत असे निष्पन्न झाले नाही. राज्यात ऑनलाईन गॅम्बलिंग होत असल्यास त्यावर निश्चित कारवाई केली जाईल. तथापि, जे ऑनलाईन खेळ खेळले जातात ते ‘गेम ऑफ स्कील’ स्वरूपात असल्यास त्यांना परवानगी असते. त्यावर कारवाई करता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. ज्या खेळांमुळे तरूण पिढी वाईट मार्गाला जाऊ शकते अशा खेळांची अथवा गुटख्यासारख्या पदार्थांची जाहिरात करावी का याबाबत प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले. हिंगोली जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्याबाबत मोहीम हाती घेऊन कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी एका उपप्रश्नाच्या उत्तरात सांगितले. यासाठी ‘मकोका’ अथवा ‘एमपीडीए’ कायद्यांतर्गत कारवाई करणार, असे त्यांनी सांगितले. अशा गुन्ह्यांमध्ये पोलिसांचा सहभाग आढळून आल्यास कलम 311 अन्वये कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री भाई जगताप, अभिजित वंजारी, ॲड.अनिल परब, श्रीमती प्रज्ञा सातव यांनी सहभाग घेतला.
0000
जनजाती सल्लागार परिषदेची बैठक पुढील महिन्यात प्रस्तावित – आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित
मुंबई, दि. २४ : अनुसूचित जमातीच्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या योजना व सुविधा यांच्याकरिता सल्ला देण्यासाठी जनजाती सल्लागार परिषद कार्यरत असून या समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. या समितीची बैठक ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित करण्यात आली असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य आमश्या पाडवी यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री डॉ.गावित म्हणाले की, या परिषदेची 5 जानेवारी 2023 रोजी पुनर्रचना करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये याची बैठक प्रस्तावित असून सर्व संबंधित आमदार आणि निमंत्रितांना बैठकीसाठी विषय सूचविण्यासाठी पत्र पाठविण्यात आले आहे. ज्या सदस्यांना अद्याप पत्र प्राप्त झाले नसेल त्यांना ते तातडीने पोहोचविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
0000
त्र्यंबकेश्वर येथील शिवमंदिरात प्रवेशप्रकरणी ‘एसआयटी’चा अहवाल एका महिन्यात मागविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २४ : त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथील संदल मिरवणुकीच्या वेळी काही युवकांनी शिवमंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी मनाई केल्यामुळे वाद निर्माण झाल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमण्यात आली असून त्याचा अहवाल एक महिन्यात मागविण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य शशिकांत शिंदे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, श्रद्धा अथवा परंपरा यामुळे समाज एकत्र येणार असेल, तर त्यास कुणाची हरकत असणार नाही. तथापि, खोडसाळपणा अथवा समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे वर्तन झाल्यास त्यावर कारवाई होईल. त्र्यंबकेश्वर प्रकरणी तक्रार दाखल झाल्याने त्याची दखल घेणे भाग आहे. याप्रकरणी ज्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल आहे त्याबाबतची कार्यवाही सुरू असून याबाबतचा अहवाल एक महिन्यात मागविण्यात येईल.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य कपिल पाटील, नरेंद्र दराडे, अब्दुल्ला खान दुर्राणी, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
00000
बनावट बांधकाम परवानगी प्रकरणी स्थापन ‘एसआयटी’चे काम तीन महिन्यात पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. २४ : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील 66 बांधकाम परवानगी पत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले आहेत. या प्रकरणी पोलीस विभागामार्फत विशेष चौकशी समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. येत्या तीन महिन्यात एसआयटीचे काम पूर्ण केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. मानपाडा आणि रामनगर पोलीस स्टेशन डोंबिवली येथे महानगरपालिकेच्या वतीने विकासक व वास्तूविशारद यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी यावेळी सांगितले.
सदस्य निरंजन डावखरे यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाची (महारेरा) स्थापना झाल्यानंतर अवैध बांधकामांवर आळा बसला असून नागरिकांमध्ये जागृती निर्माण झाली आहे. नुकतीच ‘रेरा’च्या देशभरातील रेग्यूलेटरची बैठक झाली असून त्यात प्राधिकरणासमोरील अडचणी आणि कार्यपद्धतीमधील बदलांबाबत चर्चा झाली आहे. याअनुषंगाने ज्या सूचना येतील त्यापैकी राज्य शासनाच्या अखत्यारीतील सुधारणा शासन करेल, तसेच ज्या सूचना केंद्राकडे पाठवायच्या असतील त्या केंद्र सरकारकडे पाठविल्या जातील. प्राधिकरणावरील रिक्त पदांवरील नियुक्त्यांबाबत बोलताना त्याबाबतची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील प्रकरणी मानपाडा येथील दाखल गुन्ह्यांमध्ये 25 आरोपींना, तर रामनगर येथे 42 आरोपींना अटक करण्यात आली असून 25 जानेवारी रोजी दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती मंत्री श्री.सावे यांनी दिली. संबंधित दुय्यम निबंधकावर कारवाई सुरू असल्याचे सांगून यापुढे ऑनलाईन परवानगीशिवाय नोंदणी होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहीर, अभिजित वंजारी, जयंत पाटील, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
00000