विधानपरिषद लक्षवेधी

0
7

समाज माध्यमातून आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २४ : समाज माध्यमातून महामानवांबाबत आक्षेपार्ह लिखाण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कडक कारवाई होण्यासाठी राज्य शासन लवकरच उच्चस्तरीय समिती  नेमणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ व ‘हिंदू पोस्ट’ ही संकेतस्थळे तत्काळ बंद करून संकेतस्थळ चालविणाऱ्या व लिखाण प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याबाबत विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या कार्याविषयी खोट्या माहितीच्या आधारे चुकीची मांडणी करून  समाजाच्या भावना दुखावणारा अपमानास्पद लेख इंडिक टेल्स व ‘हिंदू पोस्ट’ या संकेतस्थळ आणि bhardwajspeaks या ट्व‍िटर अकाऊंटधारकाने प्रसारित केला असल्याची बाब ३१ मे २०२३ रोजी प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने निदर्शनास आली आहे. संबंधित पोस्ट व मजकूर लिहिणाऱ्या व प्रसारित करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, यातील आरोपीचा शोध घेण्याकरीता संबंधित संकेतस्थळ व ट्व‍िटरला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

कायद्यात असलेली जास्तीत जास्त शिक्षा आरोपीला होईल, अशी तरतूद करणार असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य प्रज्ञा सातव यांनी सहभाग घेतला.

*****

 आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे तातडीने भरणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई दि. २४ : आयुर्वेद क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी शासन सकारात्मक प्रयत्न करणार. शासकीय, शासन अनुदानित व खासगी विनाअनुदानित आयुर्वेद महाविद्यालयातील प्राध्यापकांची रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून तत्काळ भरणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत सदस्य सचिन अहीर यांनी लक्षवेधी मांडली.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, राज्यातील विविध आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर आयुर्वेद अभ्यासक्रमाचे प्रवेश हे अखिल भारतीयस्तरावर आयोजित  (AIAPGET) सामायिक प्रवेश परीक्षेच्या गुणवत्तेनुसार केले जातात.

इतर राज्यात पदवी पूर्ण केलेल्या मराठी विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात   आयुर्वेद पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (अखिल भारतीय कोटा)  15 टक्के जागा राखीव देण्यात आलेल्या आहेत. यात वाढ केल्यास राज्यात पदवी शिक्षण घेतलेल्या स्थानिक मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय होवू शकतो. त्यामुळे राज्यातून (बीएएमएस)पदवी पूर्ण केलेले विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या जनतेस आरोग्य सुविधा पुरविण्यास राज्यातच राहतील या उद्देशातून  या विद्यार्थ्यांनाच राज्य राखीव जागेतून प्रवेश दिला जातो. यामध्ये स्थानिक विद्यार्थ्यांचे हित असल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

महाराष्ट्रात शासकीय व शासन अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांत सन २०२२-२३ मध्ये एकूण ३०८ इतक्या जागा उपलब्ध होत्या. या पैकी ८५ टक्के जागा या राज्य कोट्याच्या असून, १५ टक्के जागा या अखिल भारतीय कोट्यासाठी दिल्या जातात. तसेच, खासगी विना अनुदानित महाविद्यालयांत  एकूण ८१३ इतक्या जागांपैकी,  खासगी महाविद्यालयातील ७० टक्के जागा राज्य कोट्यासाठी, १५ टक्के जागा अखिल भारतीय कोटा आणि १५ टक्के जागा संस्थात्मक कोट्यासाठी (व्यवस्थापन कोट्यासाठी) उपलब्ध असतात.

अखिल भारतीय कोट्यातील जागा या केंद्र सरकारस्तरावर भरण्यात येत असून या जागांवर देशातील कुठलाही पात्र उमेदवार प्रवेशासाठी अर्ज करू शकतो. उर्वरित जागांवरील प्रवेश हे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाद्वारे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमार्फत करण्यात येतात, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी यांनी सहभाग घेतला होता.

000

नोंदणी असलेल्या कामगारांनाच मोफत भोजन – कामगार मंत्री सुरेश खाडे

मुंबई, दि. 24 :  इमारत व इतर बांधकाम व्यवसायामधील  बांधकाम कामगारांसाठी, १ जुलै 2023 पासून नोंदणी असलेल्या कामगारांनाच मोफत जेवण वितरित करण्यात येते, असे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे इमारत व इतर बांधकाम व्यवसायामधील  बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेबाबत लक्षवेधी विधानपरिषद सदस्य एकनाथराव खडसे यांनी मांडली. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. खाडे बोलत होते.

कामगार मंत्री श्री. खाडे म्हणाले की, इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबविल्या जातात. या योजनेत बांधकाम कामगारांसाठी दोन वेळेचे जेवण पुरविण्यात येते. कोविड काळात बांधकाम कामगारांसोबत नाका कामगार आणि नोंद नसलेल्या कामगारांनाही या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. राज्यात संघटित २६ लाख ३८ हजार नोंदणी कामगार असून तीन कोटी ५४ लाख असंघटित कामगार आहेत. कामगाराची  नोंदणी करण्याचे काम अद्यापही सुरू असून याबाबत कोणाच्याही तक्रारी असतील, तर त्याची चौकशी  करू. यामध्ये दोषींवर कारवाई करू. विविध सदस्यांनी केलेल्या सूचनांसाठी लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, अभिजित वंजारी, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, सचिन अहीर यांनी सहभाग घेतला.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

 

उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील गणित, विज्ञान विषयासाठी

स्वतंत्र शिक्षकांची पदे निर्मितीचा प्रस्ताव वित्त विभागास सादर  मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. २४ : उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्थापत्य इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. यासाठी त्यांना गणित व विज्ञान अभ्यासक्रमावर आधारित नीट, जे ई ई, सीईटी सारख्या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. या स्पर्धात्मक परीक्षांसाठी गणित व विज्ञान विषयांचे सखोल ज्ञान आवश्यक असते.

यासाठी उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील २ विद्याशाखांसाठी गणित व विज्ञान विषयाचे स्वतंत्र शिक्षकांची २८२ (१४१x२) पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव  वित्त व नियोजन विभागास सादर केला असल्याचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानपरिषदेत  सांगितले.

सदस्य डॉ.वजाहत मिर्झा यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सावे बोलत होते.

सन २००८ मध्ये शासनाने माध्यमिक आश्रमशाळातील १४८ आश्रमशाळांना श्रेणीवाढ करून शासन निर्णयान्वये उच्च माध्यमिक आश्रमशाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. त्यापैकी १४१ उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील २ विद्याशाखा (कला/वाणिज्य व विज्ञान) साठी ६ शिक्षक व २ शिक्षकेतर असा ८ पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील १२ वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी वैद्यकीय, अभियांत्रिकी, स्थापत्य इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. यासाठी त्यांना गणित व विज्ञान अभ्यासक्रमावर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. या करीता, आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांच्या धर्तीवर गणित व विज्ञान विषयासाठी स्वतंत्र विषय शिक्षकाची पदे मंजूर करावीत अशी मागणी आश्रमशाळा चालकांकडून होत असल्याने उच्च माध्यमिक आश्रमशाळांतील २ विद्याशाखांसाठी गणित व विज्ञान विषयाच्या स्वतंत्र शिक्षकांच्या पदांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळा संस्था चालकांची विद्यार्थ्यांचे गणवेश, शैक्षणिक साहित्य, आगाऊ भोजन साहित्य व दैनंदिन वापरातील साहित्य खरेदीसाठी आगाऊ खर्चासाठी वेतनेतर अनुदानातील 60 टक्केच्या मर्यादेत परिपोषण अनुदानापोटी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आहे. ही बाब तपासून निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याची माहितीही मंत्री श्री. सावे यांनी दिली. आश्रमशाळेतील कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन रखडलेले अथवा थकलेले नाही, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

ते म्हणाले की, या विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या 977 विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गासाठीच्या निवासी, खासगी, अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळेतील वेतन 100 टक्के अनुदान तसेच निवासी आश्रशाळातील विद्यार्थ्यांचे निवास, भोजन व दैनंदिन वापरातील साहित्य इत्यादीसाठी परिपोषण अनुदान, अनुज्ञेय इमारत भाडे रकमेच्या 75 टक्के तसेच संस्थेच्या आकस्मिक खर्चासाठी निवासी आश्रमशाळेतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या प्राथमिक आश्रमशाळेसाठी 8 टक्के व माध्यमिक आश्रमशाळेसाठी 12 टक्के वेतनेतर अनुदान शासन देते.

सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये वेतनेतर अनुदानासाठी रु.225 कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे. निधी वितरित करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली  असून अलीकडेच प्राप्त 10 टक्के निधी वितरीत करण्यात येत असल्याची माहिती, मंत्री श्री. सावे यांनी यावेळी दिली.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here