राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारण्याची तयारी – कृषी मंत्री धनंजय मुंडे
मुंबई दि. 28 : राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारण्यासाठी कृषी विभागाची तयारी असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तरांच्या वेळी दिली.
राज्यातील बियाणे उद्योग तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये स्थलांतरित होत असल्याबाबतचा प्रश्न सदस्य सचिन अहीर यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना कृषी मंत्री श्री.मुंडे बोलत होते.
कृषीमंत्री श्री. मुंडे म्हणाले की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सीड पार्क उभारण्यासाठी कृषी विभागाची तयारी आहे. याबाबत प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. राज्यात सन २०१९ मध्ये ६५४ बियाणे कंपन्या कार्यरत होत्या. सन २०२१ आपले सरकार पोर्टल व महापरवाना प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. तसेच सध्या १५८० कापूस व इतर बियाणे कंपन्या कार्यरत आहेत. तसेच बोगस बि-बियाणे यासंदर्भात विभागाने वेळोवेळी कारवाई केलेली आहे तसेच आपण लवकरच बोगस बी बियाणे यासंदर्भात आलेल्या तक्रारीसाठी शेतक-यांच्या हिताचा कायदा पावसाळी अधिवेशनात येणार आहे. ‘महाबीज’चे बळकटीकरण करणार असल्याचेही कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांनी सहभाग घेतला.
0000
संध्या गरवारे/स.सं
परदेशी शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढवणार – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
मुंबई, दि २८:- परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग विद्यार्थ्यांची संख्या ५० वरून ७५ करण्यात येत आहे. त्यात आणखी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकित घेण्यात येईल.त्याचबरोबर यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्याचा निर्णयही घेण्यात येईल अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधानभरिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य रमेश कराड यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. सावे पुढे म्हणाले की, ऑक्टोबर २०१८ मध्ये शासनाने परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली होती. पहिल्या वर्षी दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये ही संख्या वाढवून ५० करण्यात आली. २०२२-२३ मध्ये ४९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. यामध्ये अभियांत्रिकी व वास्तूशास्त्र, व्यवस्थापन, विज्ञान, कला, पीएचडी, वाणिज्य, औषध निर्माण इत्यादी शाखेतील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. तसेच वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा शासन विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार सर्वश्री अभिजित वंजारी, महादेव जानकर, कपिल पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला.
0000
संध्या गरवारे/स.सं
सारथी, बार्टीसह महाज्योतीच्या सर्व योजनांमध्ये सुसूत्रता आणणार – मंत्री अतुल सावे
मुंबई,दि.२८: ‘सारथी’ ‘बार्टी’ तसेच ‘महाज्योती’च्या सर्व योजनांमध्ये लवकरच सुसूत्रता आणणार आहोत, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानपरिषदेत दिली.
‘महाज्योती’ संस्थेने एमएचटी-सीईटी, जेईई व नीटच्या प्रशिक्षणार्थीची संख्या कमी केल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. सावे बोलत होते.
मंत्री श्री. सावे म्हणाले की, महाज्योती संस्थेमार्फत सन २०२२-२३ मध्ये एमएचटी-सीईटी, जेईई व नीटच्या प्रशिक्षणाकरिता ४,९६२ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ४,२११ विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पात्र होते. सन २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेवून सन २०२३-२४ करिता विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करून ६,५०० करण्यात आली आहे, असे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य अभिजित वंजारी, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
0000
संध्या गरवारे/स.सं