महाराष्ट्रातील पहिला प्रयोग; लाभार्थ्यांच्या भरघोस उपस्थितीने यशस्वी
नागपूर, दि.29 : सामाजिक न्याय विभागाच्या पुढाकारात महाराष्ट्रामध्ये प्रथमच केवळ अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय घटकाच्या शेकडो लाभार्थ्यांना ‘शासन आपल्या दारी’ अभियानाअंतर्गत लाभ देण्याच्या कार्यक्रमाला नागपुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘शासन आपल्या दारी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित केले. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, खासदार कृपाल तुमाने, आमदार सर्वश्री सुनिल केदार, प्रविण दटके, कृष्णा खोपडे, आशिष जायस्वाल, जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड व उपायुक्त सुकेशीनी तेलगोटे, समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर, यांच्यासह विभागातील अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत सर्व विभागाच्या योजनांचे लाभार्थ्यांना थेट वाटप केले जाते. राज्यातील लक्षावधी लाभार्थ्यांना त्यांचा लाभ शासन स्वतःहून देत आहे. नागपूरमध्ये सामाजिक न्याय विभागाने वेगळ्या प्रयोग करत या विभागांतर्गत असणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, धनगर घटकांच्या अनेक योजनांच्या माध्यमातून शेकडो लाभार्थ्यांना हा लाभ आज प्रत्यक्ष दिला. या आयोजनाचे कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी यावेळी केले. यावेळी दूरदृष्य प्रणालीव्दारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केले.
‘शासन आपल्या दारी’तून वंचितांच्या जीवनात सकारात्मक बदल : उपमुख्यमंत्री
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून राज्यातील वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आतापर्यंत एक कोटी 10 लाख पेक्षा जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून यापुढेही विविध विभागाच्या योजना नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे काम अविरत सुरू राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
राज्यात नवीन शासन आल्यापासून शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या माध्यमातून नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे घालण्याऐवजी शासनाचे वेगवेगळे विभाग लोकांपर्यंत योजना घेवून जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. मात्र आता एकेका जिल्ह्यात 4 ते 5 लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शासन आपल्या दारी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.
पुढील तीन वर्षात राज्याला बेघरमुक्त करण्याचा संकल्प असल्याचे सांगतांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 5 लाख घरकुले, मोदी आवास योजनेंतर्गत इतर मागासवर्गीयांसाठी 3 लाख घरे तसेच विमुक्त व भटक्या जमाती व इतरासाठी 2 लाख घरकुलांचे नियोजन केले असल्याचे ते म्हणाले. तसेच सफाई कामगारांना जीव धोक्यात घालून सिव्हरेजमध्ये उतरण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारची सुविधा निर्माण करण्यात येइल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले
शासन आपल्या दारी योजनेतून सर्वच योजनांचे लाभ दिले जात आहे. मात्र नागपूर येथील सामाजिक न्याय विभागाने मोठ्या संख्येने एकाच विभागाच्या लाभार्थांना लाभ देण्यासाठी केलेल्या आयोजनबद्दल श्री.फडणवीस यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
आत्मनिर्भर समाज निर्मिती करा : नितीन गडकरी
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवीन कल्पना व नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून वंचितांच्या जीवनात विकासाचा नवीन मार्ग दाखवण्यासाठी त्यांना तंत्रशिक्षणासोबतच व्यावसायिक प्रशिक्षण देवून आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून महाराष्ट्र शासन करत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी श्री. गडकरी यांच्या हस्ते सावनेर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवनिर्मित इमारतीचे दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्यातील 26 वसतिगृह व निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पाहणी करण्याकरिता सर्वांना एकत्र जोडणाऱ्या सीसीटीव्ही प्रकल्पाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मान्यवरांच्या हस्ते कर्तव्य बजावतांना मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कामगारांच्या चार वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाईचे धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच मार्जिन मनी योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, रमाई आवास योजना, बचत गटांना मिनी ट्रॅक्टर वितरण, दिव्यांगांना सहाय्यक उपकरणे वितरण, यशवंतराव मुक्त वसाहत योजना, आश्रमशाळेच्या विद्यार्यिांना टॅब वितरण, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत 11 गावांना विकास कामांसाठी प्रत्येकी 20 लक्ष अनुदान, कन्यादान योजना, अनुसूचित जाती उपयोजना, निवासी शाळा व प्राविण्याप्राप्त विद्यार्थी तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव, आंतरजातीय विवाह योजनेंतर्गत 369 जोडप्यांना प्रोत्साहन रकमेचे वितरण, महात्मा फुले मागासवर्ग मंडळातर्फे व्यावसायिकांना अर्थसहाय्य, स्वाधार योजनेचा लाभ, दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्रांचे युडीआयडी वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.
आमदार सुनिल केदार यांनी ‘सामाजिक न्याय’ या संकल्पनेवर देश पुढे जावा असे मनोगत व्यक्त केले. सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान प्रास्ताविकेचे वाचन तसेच आभार प्रदर्शन सहाय्यक आयुक्त सुकेशीनी तेलगोटे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
0000