अन्न व औषध विभागाने कायम सजग राहून जबाबदारीने काम करावे – मंत्री धर्मरावबाबा आत्राम

ठाणे, दि.31(जिमाका) :- अन्न व औषध प्रशासन विभाग हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. या विभागाचा थेट जनतेच्या जीविताशी संबंध आहे. त्यामुळे या विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कायम सजग राहून जबाबदारीने काम करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात आज अन्न व औषध प्रशासन विभागाची कोकण विभागीय आढावा बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त श्री.अभिमन्यू काळे यांच्यासह सहआयुक्त (अन्न) श्री.सुरेश देशमुख, सहआयुक्त (औषधे) श्री.दुष्यंत भामरे, विभागातील सर्व सहाय्यक आयुक्त व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.आत्राम पुढे म्हणाले, या विभागाची जबाबदारी आहे की, त्यांनी अन्न व औषध औषधे याचा दर्जा, मुदत स्वच्छता आदी बाबींची नियमितपणे तपासणी करावी. दूध व त्या व्यवसायाशी संबंधित स्वच्छतेबाबत अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणाने उत्तम काम करावे, यासाठी सर्व प्रकारची आवश्यक ती मदत शासनाकडून दिली जाईल.

बैठकीच्या सुरुवातीस निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी मंत्री श्री. आत्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या बैठकीत सहआयुक्त श्री.सुरेश देशमुख व दुष्यंत भामरे यांनी विभागातील पदांची सद्य:स्थिती, गेल्या सहा महिन्यातील कामकाजाची तसेच केलेल्या कारवायांची माहिती मंत्री महोदयांना सादर केली.

         उत्कृष्ट अधिकारी – कर्मचाऱ्यांचा सन्मान

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या ईट राईट चँलेंज स्पर्धेत मीरा-भाईंदर, वाशी नवी मुंबई व ठाणे या या शहरांनी अन्न सुरक्षा मध्ये उच्च गुणांकन मिळविल्यामुळे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते व अन्न सुरक्षा आयुक्त श्री.अभिमन्यू काळे (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत अन्न व औषध प्रशासनातील सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री.दिगंबर भोगावडे, परमेश्वर सिंगरवाड, व्यंकटेश वेदपाठक तसेच अन्न सुरक्षा अधिकारी उत्तरेश्वर बडे,अरविंद खडके, डॉ.राम मुंडे, संतोष शिरोशिया यांचा गौरव करण्यात आला.

बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दिप्ती राजे यांनी केले.

000000000