बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी घेतली इरशाळवाडीतील अनाथ बालकांची भेट

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष ॲड.सुशिबेन शहा यांनी आज रायगड जिल्ह्यातील इरशाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबातील अनाथ बालक व त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली.

या  दुर्घटनेमध्ये शून्य ते 18 वर्षे वयोगटातील 22 बालके अनाथ झालेली आहेत. ही बालके व त्यांचे कुटुंबीय सद्यस्थितीत चौक ग्रामपंचायत अंतर्गत उभारण्यात आलेल्या निवास व्यवस्थेमध्ये राहात आहेत. या बालकांमध्ये बहुतांश बालके ही आदिवासी विभागाअंतर्गत चिखले, माणगाव, डोलवली येथील  निवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ही बालके आश्रमशाळेत शिक्षण घेत असली तरी त्यांना विशेष बाब म्हणून महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजना लागू करण्याबाबत आयोगामार्फत पाठपुरावा करण्यात येणार आहे. तसेच जी बालके शिक्षण घेत नाहीत, किंवा त्यांनी काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडलेले आहे, अशा शाळाबाह्य बालकांसाठी व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाची सोय खासगी स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयाने करण्यासाठी बाल हक्क आयोग प्रयत्नशील असणार आहे.

आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट अंतर्गत एम्पॉवर माईंडस् या विशेष उपक्रमांतर्गत या बालकांसाठी समुपदेशन तसेच इतर सामाजिक, मानसिक घटकांच्या अनुषंगाने प्रथमतः सहा महिन्यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात येणार आहे. सदर भेटी दरम्यान बालकांचे लसीकरण, त्यांना आवश्यक असणाऱ्या इतर बाबी याबाबतही माहिती घेण्यात आली.

या   भेटीच्या वेळी आयोगातील सदस्य ॲड. नीलिमा चव्हाण, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे, अध्यक्ष तथा सदस्य महिला बालकल्याण समिती रायगड, पोलीस निरीक्षक, तहसीलदार, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग, एकात्मिक बालविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

****

संध्या गरवारे/विसंअ/