जनतेला सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यास विभागाचे प्राधान्य – अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम

मुंबई, दि. 1 : अन्न व औषध प्रशासन विभाग हा राज्याचा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे.  या विभागावर भेसळमुक्त, आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आहे. राज्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित अन्न उपलब्ध करून देण्यास विभागाचे प्राधान्य असावे.  विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने विभागाचे नावलौकिक उंचावेल, असे काम करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आज दिले.

वांद्रे (पूर्व) येथील अन्न व औषध प्रशासन आयुक्तालयाच्या मुख्यालयात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री. आत्राम बोलत होते. बैठकीला आयुक्त अभिमन्यू काळे, उपसचिव वैशाली सुळे, सहआयुक्त (अन्न) शै. प्र. आढाव, सहआयुक्त (औषधे) भूषण पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. गायकवाड, श्री. राठोड आदींसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रिक्त पदांसोबतच अन्य अडचणीवर मात करत राहण्याचे सांगत मंत्री श्री. आत्राम म्हणाले की, प्रत्येक अडचणीवर मार्ग काढून विभागाचे काम गतिशील करण्याचा प्रयत्न असणार आहे. विभागात उत्पन्न वाढीसाठी विविध पर्याय आहेत.  या पर्यायांचा उपयोग करीत विभागाने उत्पन्न वाढविले पाहिजे. भेसळयुक्त व दूषित अन्नामुळे मानवी आरोग्याच्या समस्या उद्भवतात. हा विभाग मनुष्याला निरोगी आयुष्य देण्यासाठी काम करतो. त्यामुळे भेसळीच्या प्रकरणात तपासण्या वाढवाव्यात. धाडी टाकाव्यात, धाडीमध्ये विभागातील अधिकाऱ्यांनी सहभागी असू नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

आयुक्त श्री. काळे यांनी अन्न औषधे व प्रयोगशाळा या तीनही विभागांचे सादरीकरण केले विभागापुढील आव्हाने व शासनास सादर केलेल्या प्रस्तावांची माहिती दिली. बैठकीपूर्वी मंत्री श्री. आत्राम यांनी प्रयोगशाळा, नवनिर्मित सभागृह आदींची पाहणी केली.

००००

निलेश तायडे/विसंअ/