महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा – मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 1 : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा असून या विभागातील अधिकारी-कर्मचारी शासनाचे प्रतिनिधी म्हणून काम करीत असतात. लोकांप्रति उत्तरदायित्व ठेवून, सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करावी, असे उद्गार मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगरतर्फे चेतना महाविद्यालय, वांद्रे (पू.) येथे मुंबई उपनगर जिल्ह्यात पालकमंत्री श्री. लोढा यांचे हस्ते महसूल सप्ताहाचा शुभारंभ  करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले की, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावा, यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने 1 ऑगस्ट या महसूल दिनापासून महसूल सप्ताह साजरा केला जात आहे.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाप्रित्यर्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन स्वातंत्र्यसैनिकांचा गौरव करण्यात आला. तसेच वर्षभरात उत्कृष्ट व नावीन्यपूर्ण कामगिरी केलेल्या 36 एकूण महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानपत्र पालकमंत्री  श्री. लोढा यांचे हस्ते देण्यात येऊन गौरविण्यात आले.

महसूल सप्ताहाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले. त्यांनी सांगितले की, मुंबई उपनगर जिल्ह्यात महसूल सप्ताह अंतर्गत दि. 01 ते 7 ऑगस्ट दरम्यान करण्यात येणार असून त्यामध्ये  महसूल दिन- महसूल अधिकारी व कर्मचारी गुणगौरव व MLRC-155 अंतर्गत प्रकरणे निकाली काढणे इ. उपक्रम, युवा  संवाद अंतर्गत- विद्यार्थ्यासोबत संवाद व ई सेवा केंद्राअंतर्गत दाखल्याचे वाटप करणे, एक हात मदतीचा- अंतर्गत- नैसर्गिक आपत्तीबाबत मॉक ड्रील, दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांशी चर्चा व नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत, महिला, तृतीय पंथीयांना समाज कल्याण विभागातर्फे लाभ वाटप इ., जनसंवाद-अंतर्गत- शासकीय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष/ सचिव यांच्यासोबत संवाद, आपले सरकार पोर्टवरील तक्रारींचा निपटारा करणे व शासकीय संदर्भ निकाली काढणे इ. , सैनिक हो तुमच्यासाठी- अंतर्गत- ध्वजनिधी संकलन, माजी सैनिक व जेष्ठ नागरिक संघटनासोबत चर्चा करणे व सैनिक, माजी सैनिक यांचे महसूल विभागातील कामाचा निपटारा करणे इ., महसूल संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी संवाद अंतर्गत निवृत्त अधिकारी/कर्मचारी संवाद व महसूल सप्ताह सांगता समारंभ, असे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

दत्ता देशमुख यांनी सूत्रसंचालन व निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी आभार मानले

या कार्यक्रमांकरीता जिल्ह्यातील अपर जिल्हाधिकारी  मनोज गोहाड, पंकज देवरे, तेजूसिंग पवार व जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****

संध्या गरवारे/विसंअ/