विधानपरिषद लक्षवेधी

0
9

सोलापूर जिल्ह्यातील पात्र चारा छावण्यांची प्रलंबित देयके अदा करण्यासाठी

लवकरच कार्यवाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. ३ : सोलापूर जिल्ह्यात सन २०१९-२० मध्ये चारा छावण्या उघडण्यात आल्या होत्या. यातील एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीतील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी सुधारित प्रस्ताव मुख्य सचिव यांना प्राप्त झाला आहे. अहवाल शासनास सादर झाल्यानंतर पात्र चारा छावणींची देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य जयंत पाटील यांनी याअनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती.

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचविण्यासाठी चारा छावणी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येतो. सन 2019-20 मध्ये सोलापूर जिल्ह्यातील 10 तालुक्यांत एकूण 299 चारा छावण्या उघडण्यात आल्या होत्या. त्याकरिता सन 2019-20 व सन 2020-21 मध्ये एकूण 245.23 कोटी इतके अनुदान जिल्हाधिकारी, सोलापूर यांना वितरित करण्यात आले होते. त्यापैकी 206.55 कोटी इतके अनुदान चारा छावणी चालकांना वितरीत करण्यात येऊन, उर्वरित 38.68 कोटी इतका निधी जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी समर्पित केला होता. सांगोला तालुक्याकरिता 146 चारा छावण्यांसाठी 131.77 कोटी इतका निधी वितरित केला होता. त्यापैकी 109.20 कोटी इतका निधी प्रत्यक्षात चारा छावणी चालकांना वितरित झाला व उर्वरित 22.56 कोटी इतका निधी समर्पित करण्यात आला. तसेच मंगळवेढा तालुक्याकरिता 61 चारा छावण्यांना 47.81 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला होता. त्यापैकी 33.17 कोटी इतका निधी प्रत्यक्षात चारा छावणी चालकांना वितरित करण्यात येऊन उर्वरित 14.64 कोटी इतका निधी समर्पित करण्यात आला.

एप्रिल ते ऑक्टोबर 2019 या कालावधीतील प्रलंबित देयके अदा करण्यासाठी विभागीय आयुक्त, पुणे यांनी शासनाकडे अनुदान मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. तथापि त्यात त्रुटी असल्याने सुधारित प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याकडील बैठकीमध्ये देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सुधारित प्रस्ताव 28 जुलै 2023 रोजीच्या पत्रानुसार शासनास प्राप्त झाला आहे. पात्र चारा छावणींची देयके अदा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत पुढील कार्यवाही लवकरच करण्यात येईल, असे मंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले. या अनुषंगाने संबंधित विधान परिषद सदस्यांच्या मागणीनुसार त्यांच्यासमवेत बैठक आयोजित केली जाईल, असेही ते म्हणाले.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य महादेव जानकर यांनी सहभाग घेतला.

000

बी.सी.झंवर/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here