म्हाडा अंतर्गत इमारत पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करून देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 4 :- मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी निधीची कमतरता असल्यास त्याचा वित्त आणि गृहनिर्माण विभागाच्या मंत्री आणि सचिवांच्या स्तरावर बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल. त्यानंतर म्हाडा प्राधिकरण अन्यथा शासनामार्फत पुढील अधिवेशनात तरतूद करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत सांगितले.
सदस्य प्रवीण दरेकर यांनी म्हाडाच्या इमारतींच्या होणाऱ्या निकृष्ट कामाबाबत चौकशी करण्याबाबत तसेच संक्रमण शिबिरात राहणाऱ्या रहिवाशांना तातडीने त्यांची घरे मिळण्याकरिता कार्यवाही करण्यासंदर्भातील लक्षवेधी मांडली.
याबाबत अधिक माहिती देताना गृहनिर्माण मंत्री अतुल सावे म्हणाले की, दुर्गादेवी सहकारी गृहनिर्माण संस्था (नियोजित) येथील एकूण 44 भाडेकरू / रहिवाशांपैकी 35 भाडेकरूंनी मंडळाकडे कागदपत्रे जमा केली. यापैकी 34 भाडेकरू यांना देकारपत्र देण्यात आले आहेत. उर्वरित एक भाडेकरू यांचे नाव सोडतीमध्ये नसल्यामुळे त्यांना देकारपत्र देण्यात आले नाही. 34 भाडेकरूंपैकी सहा भाडेकरू यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यामुळे पुनर्रचित गाळ्यांचा ताबा देण्यात आला आहे. उर्वरित 28 पैकी 12 प्रकरणे ही खरेदी विक्रीची असून त्याबाबतचे नोंदणीकृत खरेदीखत सादर न केल्याने व उर्वरित 16 प्रकरणे ही वारसाहक्काची असल्याने वारसाहक्क प्रमाणपत्र / नोंदणीकृत हक्कसोड प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना ताबा देण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य सचिन अहिर, प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.
0000
बी.सी.झंवर/विसंअ
शिक्षण निरीक्षक, उत्तर मुंबई विभाग यांची प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 4 : शिक्षण निरीक्षक, उत्तर मुंबई विभाग यांच्याविरुद्धच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.
शिक्षण निरीक्षक उत्तर मुंबई विभाग यांच्या कार्यालयातील कारभाराबद्दल शासन कोणती कार्यवाही करणार अशी लक्षवेधी सदस्य कपिल पाटील यांनी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना राज्य उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई बोलत होते.
मंत्री श्री. देसाई म्हणाले की, विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्यामार्फत शिक्षण निरीक्षक, उत्तर मुंबई विभाग यांच्याविरुद्धच्या प्राप्त तक्रारी यांच्या अनुषंगाने 2 ऑगस्ट 2023 च्या आदेशाने शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांनी केलेल्या अनियमितेच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून शासकीय नियमानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, किरण सरनाईक, भाई जगताप, एकनाथ खडसे, उमा खापरे, अभिजित वंजारी आदींनी सहभाग घेतला.
००००
दत्तात्रय कोकरे/विसंअ
अकोला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांची अधिकाराच्या गैरवापराबाबत चौकशी – मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील
मुंबई, दि. 4 : तत्कालीन अकोला जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला असेल, तर त्याबाबत चौकशी करून दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करू, असे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. यासंदर्भात सदस्य अमोल मिटकरी यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
०००
संध्या गरवारे/विसंअ
‘महाडीबीटी’ मार्फत मिळणारे अनुदान नाकारू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ परत करण्याची व्यवस्था उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. 4: राज्य शासनामार्फत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना ‘महाडीबीटी’ पोर्टलमार्फत अनुदानाचे थेट हस्तांतरण करण्यात येते. मात्र एकदा मिळालेले अनुदान किंवा लाभ परत करण्यासंदर्भात व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे ज्यांना अनुदानाची आवश्यकता नाही, किंवा जे लाभार्थी मिळणारे अनुदान, लाभ नाकारू इच्छितात. त्यांना लाभ परत करण्यासाठी दोन महिन्यात व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली.
याबाबत सदस्य श्रीकांत भारतीय यांनी लक्षवेधी सूचना मांडली.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एलपीजी’ सिलेंडरचे अनुदान नाकारण्यासाठी ‘पहल’ सुविधा निर्माण केली होती. या अंतर्गत अनुदानाची आवश्यकता नसणाऱ्या महाराष्ट्रातील 16 लाख 52 हजार लाभार्थ्यांनी आपले अनुदान नाकारले. या योजनेचे सर्वत्र कौतुक झाले. यामुळे एक वेगळा, चांगला पायंडा पडला. या योजनेत नाकारलेले अनुदान इतर गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना मिळू शकते. राज्य शासनामार्फत विविध योजनांचे अनुदान ‘महाडीबीटी’ पोर्टलच्या माध्यमातून दिले जाते. मात्र ज्यांना अनुदानाची आवश्यकता नाही, त्यांना अनुदान नाकारण्यासाठी कोणतीही व्यवस्था पोर्टलमध्ये नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन वित्त विभाग व माहिती तंत्रज्ञान विभागाशी समन्वय साधून अनुदान नाकारण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिली.
०००००
‘समृद्धी’च्या कामावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे
मुंबई, दि. ४ : ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना गर्डर कोसळून झालेल्या दुर्घटनेचे विश्लेषण तांत्रिक तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गाच्या कामांमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्यात येत आहे. भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी दक्षता घेण्यात येत असून अधिक सुरक्षितता घेण्यासाठी आवश्यक ठोस उपाययोजना करण्यात येतील, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना गर्डर कोसळून झालेल्या अपघाताबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री. भुसे म्हणाले की, ही दुर्देवी घटना अपघाताने झाली आहे. या दुर्घटनेसंदर्भात पोलीस तपास सुरु आहे. राज्य शासनातर्फे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये व केंद्र शासनाने प्रत्येकी दोन लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे. मूळ कंत्राटदार यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत तसेच उपकंत्राटदार यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. या लक्षवेधीच्या चर्चेत सदस्य ॲड. अनिल परब, एकनाथ खडसे, भाई जगताप यांनी सहभाग घेतला.
0000
संध्या गरवारे/विसंअ
विश्वेश्वराय उड्डाणपुलाच्या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करणार – मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 4: माटुंगा रोड रेल्वे स्थानकाजवळ विश्वेश्वराय उड्डाणपुलाची डागडुजी करण्यात येत आहे. या पुलाच्या मध्यापासून धारावीच्या दिशेने जाणारा पूल हा धोकादायक वळणाचा असून या ठिकाणी अंधुक बिंदू असल्यामुळे यापूर्वी अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. त्यामुळे या विश्वेश्वराय पुलावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी या पुलालगत असलेल्या बाधित झोपड्यांचे निष्कासन करणे अत्यंत गरजेचे होते. याबाबत तेथील झोपडपट्टीधारक व गरीब नागरिकांवर अन्याय होत असल्यास उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
याबाबत सदस्य अनिल परब यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री श्री.सामंत म्हणाले, विश्वैश्वरैय्या पुलाजवळील 17 झोपड्यांचे निष्कासन करण्यात आले असून तेथे एकही झोपडी अस्तित्वात नाही. तरी लोकप्रतिनिधी यांच्या माहितीनुसार तेथे झोपड्या असल्यास व तेथील नागरिकांवर अन्याय होत असल्यास चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणात विकासकाला कुठलाही लाभ देण्यात आला नाही. झोपडपट्टी धारकांसाठी शासनाचे धोरण आहे, या धोरणापलीकडे जाऊन काम करीत असलेल्यांवर कारवाई होईल. या चर्चेत सदस्य विलास पोतनीस यांनी सहभाग घेतला.
००००
निलेश तायडे/विसंअ
ठाणे मेट्रो प्रकल्पाचे काम ‘एमएमआरडीए‘ कडे देण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार – उदय सामंत
मुंबई, दि. 4: ठाणे शहरामध्ये उभारावयाचा वर्तुळाकार मेट्रो लाईन प्रकल्प हा सर्व तांत्रिक बाबी तपासून तयार करण्यात आला आहे. या मार्गिकेच्या एकूण 29 किमी लांबी पैकी 3 किमी मार्ग हा भूमिगत आहे. या प्रस्तावाची मान्यता केंद्राकडे प्रलंबित आहे. सदर मेट्रो प्रकल्प महामेट्रो कंपनीकडून राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प एमएमआरडीए (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) मार्फत राबविण्याबाबत मागणी लक्षात घेता, या प्रकल्पाची उभारणी महामेट्रो ऐवजी ‘एमएमआरडीए’कडे देण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
याबाबतची लक्षवेधी सूचना सदस्य ॲड निरंजन डावखरे यांनी मांडली होती.
याबाबत मंत्री श्री. सामंत पुढे म्हणाले, प्रकल्पाच्या बाबत 2 जानेवारी 2023 रोजी ठाणे महापालिका आयुक्तांनी बैठक घेतली आहे. तसेच एमएमआरडीएकडे काम देण्याबाबत 24 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र शासनाकडे पत्र दिले आहे. या पत्राचा पाठपुरावा शासन करेल. या प्रकल्पात 18 इमारती येतात. यापैकी 3 इमारतींचे प्रस्ताव ठाणे महानगरपालिकेकडे प्राप्त झाले. याबाबत तेथील नागरिकांना न्याय द्यावयाचा आहे. असेच शासनाचे धोरण आहे, असेही त्यांनी सांगितले.
०००