उजनी धरणातून सीना-कोळेगाव धरणात पाणी आणणार – पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत

0
11

उस्मानाबाद,दि.9(जिमाका): उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास हाच माझा उद्देश आहे. आवश्यक आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देणे ही माझी जबाबदारी समजतो. त्यामुळेच 11 हजार कोटी रुपये खर्च करून उजनी धरणातून सात टीएमसी पाणी सीना – कोळेगाव या धरणात आणण्याची मंजुरी मिळालेली आहे. जून 2024 पर्यंत कोळेगाव धरणात हे पाणी येणार याचा मला विश्वास आहे.  या पाण्याचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. त्यामुळे जिल्हा सुजलाम सुफलाम होईल, असा मला विश्वास आहे असे पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत म्हणाले.

परंडा येथे 8 ऑगस्ट रोजी संजय गांधी निराधार योजना,अपंग लाभार्थी योजना आणि श्रावणबाळ लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप कार्यक्रमात पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत बोलत होते.यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी सभापती दत्ता साळुंके आणि सर्व विभागातील जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, यंत्रणांच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक द्यावी.त्यांच्यासाठी शासनाने आखलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न करावे.त्या योजनांची प्रचार प्रसिद्धी करावी. प्रत्येक योजनेचा शेवटच्या शेतकऱ्याला लाभ व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत,असे आवाहन करून ते पुढे म्हणाले, शेतकरी आणि जनतेला केंद्रबिंदू ठेवून काम करा आणि झिरो पेंडन्सीचा अवलंब करून सर्व प्रलंबित कामे निकाली काढा असेही ते यावेळी म्हणाले.

कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजना अपंग लाभार्थी योजना श्रावण बाळ योजना यांच्या लाभार्थ्यांना प्रतिनिधिक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते मंजुरी पत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार समितीचे सदस्य, महिला भगिनी व नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत पुढे म्हणाले, प्रत्येक शासकीय योजना ही लोकांच्या कल्याणासाठी आखली जाते.योजना ह्या नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या हेतूने कार्यान्वित केल्या जातात.त्यामुळे योजनांचा लाभ घेण्यासाठी कुणालाही पैसे देऊ नका. जर कोणी तशी मागणी करीत असेल तर त्याची तक्रार करा.आपल्याला मिळणारा लाभ हा आपला अधिकार आहे.आपल्यापर्यंत योजना पोहोचविण्यासाठी ” शासन आपल्या दारी ” या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना सर्व योजनांची माहिती देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here