अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतले प्रा. हरी नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

0
6

पुणे, दि. ९ : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी वैकुंठ स्मशानभूमी येथे ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक प्रा.हरी नरके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेवून श्रद्धांजली वाहिली. यावेळी आमदार कपिल पाटील, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार उल्हास पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, हरी नरके हे समाजासाठी वैचारिक आधारस्तंभ होते. त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे कर्तृत्व, इतिहास अतिशय बारकाईने अभ्यास करुन समाजासमोर आणले.

सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेले नायगाव येथे त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीनुसार तत्कालिन दिसणाऱ्या घराची राज्य शासनाने बांधणी केली आहे. त्यांनी लिहिलेल्या विविध ग्रंथाचे आज हिंदी, इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत. देश विदेशात त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण त्यांनी भाषणे केली. त्यांच्या निधनाने महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात श्री. भुजबळ यांनी श्रद्धांजली वाहिली.

यावेळी श्री.भुजबळ यांनी नरके कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्नी संगिता नरके, कन्या कु.प्रमिती नरके, भाऊ सर्वश्री लक्ष्मण नरके, ईश्वर नरके, दत्तात्रय नरके, सुदाम नरके आणि पुतणे विष्णू नरके व अनिल नरके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here