सातारा जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाचा विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
12

सातारा दि. १० (जि. मा.का.) सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या वाढीसाठी मोठा वाव आहे. जिल्ह्यात पर्यावरण पूरक पर्यटनाचा विकास करुन स्थानिकांच्या रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सातारा येथील शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य  कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

महाबळेश्वर सह तापोळा, बामणोली, कास, वासोटा या सर्व भागात पर्यटनाच्या विकासासाठी सर्व सुविधा उभरल्या जात असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडण्यासाठी पूल बांधण्यात येत असून तेथील नागरिकांचे दळवणवळ अधिक सोयीचे व्हावे यासाठी आणखीन दोन पुलांना मंजुरी देण्यात आली आहे.  स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. क्लस्टर शेतीमध्ये लोकांना एकत्र आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रशासने कामही सुरु केले आहे. त्याचबरोबर बांबू लागवड करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कंदाटी खोऱ्यामध्ये वन औषधी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात त्यावरही काम करण्यात येत असल्याचे, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सततच्या पावसामुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीसाठीचे निकष बदलण्यात आले आहेत. एनडीआरएफ चे निकषात दुपटीने वाढ केली असून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीपोटी  मोठ्या प्रमाणावर भरपाई देण्यात येत आहेत. यासाठी पंधराशे कोटी रुपये मदत वाटप केली आहे. पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान वाटप केले आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर आणखी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळणार आहेत. हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. त्यामुळे मायबाप असलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळासारख्या संकटात ही शासन वाऱ्यावर सोडणार नाही, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

०००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here