‘सशस्त्र सेना ध्वजदिन निधी’ संकलनाचे मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

0
8

मुंबई, दि. 11 : भूदल, नौदल, हवाई दलातील वीरगती लाभलेल्या जवानांचे स्मरण करण्यासाठी आणि माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणकारी योजनांसाठी निधी उभारण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन समारंभ 7 डिसेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी निधी संकलन करण्याचे मुंबई शहर जिल्हाधिकारी व सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन समितीचे अध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांनी आवाहन केले आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे आपण ऋणी आहोतच, सैनिकांचे कर्तव्य फक्त सीमेपुरतेच मर्यादित नसून देशातील नैसर्गिक आपत्ती जसे पूर, भूकंप, आग तसेच अंतर्गत दहशतवाद, दंगल घातपात, अपघात इत्यादींमध्ये मदत करण्याचे सुद्धा असते. सैनिक हा देशातील सर्व जनतेला स्वतःचे कुटुंब समजून देशाचे संरक्षण करतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या स्वातंत्र्याला सतत अबाधित ठेवणाऱ्या सैनिकांचे/त्यांच्या विधवांचेसुद्धा आपण ऋणी आहोत. माजी सैनिकांचे किंवा त्यांच्या विधवांचे अल्प प्रमाणात का होईना ऋण फेडण्यासाठी दरवर्षी ७ डिसेंबर रोजी ध्वजदिन निधी संकलन समारंभाचे आयोजन करण्यात येते.

ध्वजदिन २०२२ चा निधी संकलित करण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यास चार कोटी एवढे उद्दिष्ट दिलेले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही  सहकार्य करून उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, संस्था, कारखाने, सरकारी / निमसरकारी कार्यालये यांनी या कल्याणकारी निधीस सढळ हातभार लावावा. शासकीय, अर्धशासकीय कर्मचारी यांनी किमान वर्ग-१ – रु.२,५००/-, वर्ग-२ – रु.१,०००/-, वर्ग-३ – रु. ५००/- व इतर वर्ग – रु.३००/- इतके योगदान निधी संकलनात द्यावे. संकलित केलेला निधी रोखीने / धनाकर्ष / धनादेश स्वरुपात Collector and President City Sainik Welfare Office Mumbai Flag Day Fund यांच्या नावाने जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे जमा करावा, असेही श्री. क्षीरसागर यांनी म्हटले आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी करिता दिलेली संपूर्ण रक्कम आयकर कायदा १९६१ कलम ८० जी (५) (vi) नुसार १०० टक्के करमुक्त आहे.

०००

राजू धोत्रे/विसंअ/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here