घनकचऱ्याच्या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

0
3

मुंबई, दि. ११ : आज ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये अधिक लोक राहत आहेत. वाढत्या नागरीकरणामुळे निवारा, पाणी, सांडपाणी व घनकचरा या समस्या गंभीर रूप धारण करीत आहेत. डम्पिंग ग्राऊन्ड मधील घनकचऱ्यातून पर्यावरणाला हानिकारक, आणि वातावरणातील उष्मा वाढवणाऱ्या अशा, मिथेन गॅसचे उत्सर्जन होते. घनकचऱ्याच्या आव्हानाला एकटे सरकार तोंड देऊ शकत नाही, तर त्यासाठी नागरिकांचा वैयक्तिक व सामूहिक सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

टाटा समाज विज्ञान संस्था व आयसीसीएसए फाऊंडेशन यांच्यावतीने ‘लँडफिल व घनकचरा यातून होणारे मिथेन उत्सर्जन’ या विषयावरील एका चर्चासत्राचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. ११) टाटा समाज विज्ञान संस्थेच्या देवनार, मुंबई येथील सभागृहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अगोदर प्रत्येकाने पर्यावरणपूरक जीवन शैलीचा अंगीकार करणे महत्त्वाचे आहे. कचऱ्याचे जैविक व अविघटनकारी असे विभाजन करणे, वनसंपदेचे रक्षण करणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करणे, अन्नाची नासाडी थांबवणे या दृष्टीने देखील नागरिकांनी जागरुक राहणे आवश्यक आहे, असे राज्यपालांनी सांगितले. मुंबई प्रमाणेच दिल्ली येथे देखील घनकचऱ्याचे व्यवस्थापन गंभीर समस्या झाली असून काही उद्योग दूषित पाणी थेट नदीत सोडत असल्यामुळे देखील समस्या निर्माण होत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

टाटा समाज विज्ञान संस्था तसेच आयसीसीएसए फाऊंडेशन सारख्या संस्थांनी विविध देशांमधील घनकचरा व्यवस्थापन, डम्पिंग ग्राउंड व मिथेन उत्सर्जन समस्येबाबत अध्ययन करावे. त्यानंतर देशातील शास्त्रज्ञ व संशोधकांनी घनकचरा व्यवस्थापनाचे स्वस्त आणि परवडणारे तंत्र शोधून काढावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

वाढते तापमान व हवामानातील बदल आपल्या दारापर्यंत आले आहेत, असे सांगून अलिकडच्या काळातील भूस्खलनाच्या घटना व पूरस्थिती हवामान बदलांचाच परिपाक आहे, असे राज्यपालांनी सांगितले. भारताने २०७० पर्यंत शून्य उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवले असून शासन वातावरण बदलाच्या एकूणच समस्येला गांभीर्याने घेत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

ग्रीनहाऊस गॅस व जागतिक तापमान वृद्धीमुळे पूरस्थिती, दुष्काळ, हिमवृष्टी आदी गोष्टींची वारंवारता वाढत आहे. मिथेनचे उत्सर्जन थांबविणे आपल्या भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठी देखील आवश्यक आहे. घनकचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनातून आपण मिथेन उत्सर्जन कमी करू शकतो व त्यातून ऊर्जा  निर्मिती देखील होऊ शकते, असे टाटा समाज विज्ञान संस्थेच्या कुलगुरु डॉ. शालिनी भारत यांनी यावेळी सांगितले. देशासाठी घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी रोडमॅप तयार करण्याच्या दृष्टीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

चर्चासत्राला टाटा समाज विज्ञान संस्थेचे प्रकुलगुरु प्रो. बिनो पॉल, आयसीसीएसए फाऊंडेशनचे महासंचालक डॉ.जे एस शर्मा, ओएनजीसीचे निवृत्त महाव्यवस्थापक डॉ. अनिल अग्निहोत्री, सीएसआयआरचे ओएसडी डॉ. राकेश कुमार, प्रा. कमल कुमार मुरारी, शिक्षक, संशोधक व विद्यार्थी उपस्थित होते.

००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here