विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

मुंबई, दि.१४ : देशाच्या फाळणीचा इतिहास, भारतीय नागरिकांचा संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ १४ ऑगस्ट हा विभाजन विभीषिका स्मृती दिन असावा, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते. त्या अनुषंगाने केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार इंडियन बँकतर्फे फाळणीच्या आठवणींचे आणि इतिहासाचे चित्रण एका छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडण्यात आले. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. काळा घोडा येथील इंडियन बँकच्या हेरिटेज इमारतीमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

“आपल्या देशाच्या विभाजनाचा इतिहास हा किती वेदनादायक होता, त्याचा नागरिकांवर काय परिणाम झाला, देशासाठी किती लोक शहीद झाले या सर्व गोष्टींची माहिती नवीन पिढीला व्हावी. म्हणून हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. विभाजनानंतर दहशतवादी हल्ले या सारख्या अनेक समस्यांशी आपण झुंजतो आहोत.” असे मंत्री श्री. लोढा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. हे प्रदर्शन १५ ऑगस्टपर्यंत खुले राहील.

 

इतिहासाच्या माहितीप्रमाणेच तरुणांचा कौशल्य विकाससुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे, त्या उद्देशाने युवा पिढीसाठी स्वातंत्र्य दिनाची भेट म्हणून शासकीय औद्येगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये १५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ७५ व्हर्च्युअल क्लासरूमचे उद्घाटन होणार असल्याचे मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी सांगितले. येत्या ३ महिन्यांत राज्यातील सर्वच आयटीआय व्हर्च्युअल क्लासरूम बनवू आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करू, असेदेखील त्यांनी सांगितले.

इंडियन बँकतर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनासाठी एसएसपी रॉय, फील्ड जनरल मॅनेजर, मुंबई, स्वातंत्र्यसैनिक गुणवंती जोशी उपस्थित होत्या.