आदिवासी संस्कृती, इतिहास जोपासण्यासाठी वास्तूसंग्रहालय उभारणार – पालकमंत्री संजय राठोड

आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांकडून सत्कार

यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण आणि एमपीएससी परिक्षेत यश मिळविणाऱ्या नवनियुक्त अधिकाऱ्यांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आदिवासी संस्कृती, गौरवशाली इतिहास जोपासण्यासाठी राज्य शासन यवतमाळ येथे शंभर कोटींचे वास्तूसंग्रहालय बांधणार असल्याची माहिती पालकमंत्री श्री. राठोड यांनी दिली.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय पुसद यांच्यावतीने येथील अग्रवाल मंगल कार्यालयात आयोजित जागतिक आदिवासी गौरव दिन समारंभात पालकमंत्री श्री. राठोड बोलत होते. या समारंभाला विधानपरिषदेचे आमदार ॲड. निलय नाईक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आरती फुपाटे, उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, उपवनसंरक्षक डॅा. नरसिम्हा स्वामी, प्रकल्प संचालक डॅा. आत्माराम धाबे आदी वरिष्ठ अधिकारी, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री संजय राठोड मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,  देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे योगदान हे अतिशय महत्वाचे आहे. यवतमाळ हा आदिवासीबहुल जिल्हा आहे. शासनाच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आदिवासी बांधवाच्या आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न केला पाहिजेत. आदिवासींच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून समाजामध्ये बदल होत आहे. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आदिवासींचा दर्जेदार सुविधा देण्यासाठी निधी वाढविण्याचा जिल्हास्तरावर सातत्याने प्रयत्न केला जात आहे. आदिवासी विकास योजनांमध्ये काळानुरुप बदल करण्याची गरज आहे. त्यानुसार नवीन योजना आणण्यासाठी समाजातील नागरिकांच्या सूचनांचे स्वागत करुन त्याप्रमाणे शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे पालकमंत्री श्री.राठोड यांनी यावेळी सांगितले.

आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती जोपसण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे. त्यासाठी यवतमाळमध्ये वास्तूसंग्रहालय उभारण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० कोटींची तरतूद केली असून आवश्यकता असल्यास अधिकच्या ५० कोटींची तरतूद केली जाईल. आगामी काळात यवतमाळमध्ये शंभर कोटींचे वास्तूसंग्रहालय बांधण्यात येणार आहे. यातून अनेकांना प्रेरणा मिळणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी सांगितले.

विविध आदिवासी विकास योजनेतील लाभार्थ्यांना निवडपत्र, धनादेशाचे वाटप

आदिवासी समाजाच्या विकासासाठीच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना निवडपत्राचे वाटप पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध कर्ज योजनांचा लाभ घेवून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.

या समारंभात विधानपरिषदेचे आमदार ॲड. निलय नाईक, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आरती फुपाटे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रकल्प संचालक डॅा. आत्माराम धाबे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी शाळेतील लहान मुलांनी मल्लखांब खेळाच्या प्रात्यक्षिकातून लक्ष वेधले होते.

०००