मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेसाठी 749 एकर जागा
म्हैसाळ विस्तारीत योजनेच्या 1028 कोटींच्या कामांचा कार्यारंभ आदेश
43 हजार कामगारांना 66 कोटींच्या शिक्षणविषयक योजनांचा लाभ
सांगली, दि. 15, (जि. मा. का.) : विकास प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित, मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, तसेच जिल्ह्याचा सर्वंकष विकास व्हावा, यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन आराखड्यातून विकासकामांसाठी 405 कोटींची तरतूद केली असून या माध्यमातून जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिली.
भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी ही ग्वाही दिली. यावेळी महापौर दिग्विजय सुर्यवंशी, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, पद्मश्री विजयकुमार शहा, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल यांच्यासह विविध कार्यालय प्रमुख, स्वातंत्र्य सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, नागरिक उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या उपस्थितांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, शेतकरी, कष्टकरी या महत्त्वाच्या घटकांसाठी राज्य शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेसाठी जिल्ह्यात 28 ठिकाणी 749 एकर जागा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीस उपलब्ध करून दिली आहे. या योजनेतून शेतीपंपांना दिवसा अखंडित व शाश्वत वीज मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतून 436 प्रस्तावांना कर्ज मंजुरी देण्यात आली आहे. द्राक्षे, डाळिंब व भाजीपाला पिकांच्या निर्यातीसाठी जिल्ह्यातून 12 हजाराहून अधिक लाभार्थींची नोंदणी झाली आहे. तर 17 हजार मेट्रीक टन द्राक्ष पिकाची निर्यात झाली आहे. प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेतून पावणेपाच हजार लाभार्थींना 13 कोटीहून अधिक अनुदान वितरीत केले आहे.
जिल्ह्यातील गरजू, गरीब अन्नापासून वंचित राहणार नाही, यासाठी शासन – प्रशासन प्रयत्न करत असल्याचे सांगून डॉ. खाडे म्हणाले, जानेवारी 2023 पासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून लाभार्थींना प्रतिमाह नियत मोफत धान्य देण्यात येत आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतून जवळपास पावणे सतरा लाख लाभार्थींना तर अंत्योदय योजनेतून जवळपास 31 हजार कुटुंबांना लाभ देण्यात येत आहे. तसेच, जिल्ह्यात 57 शिवभोजन केंद्रांवरून आतापर्यंत जवळपास 56 लाख 33 हजार शिवभोजन थाळ्यांचे सवलतीच्या दरात वितरण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांचे काम पूर्ण झाले असून जिल्ह्याच्या दृष्टीने ही अभिमानास्पद व गौरवाची बाब आहे. या अमृत सरोवरांच्या ठिकाणी मेरी माटी मेरा देश या उपक्रमातून वृक्षारोपण करण्यात येत आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्ह्याच्या पूर्व भागातील विशेषत: जत तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणी देण्यासाठी 1930 कोटी पैकी 1028 कोटी रूपयांच्या म्हैसाळ विस्तारीत योजनेच्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला असून लवकरच हे काम सुरू होत आहे. यामुळे जत तालुक्यातील 65 गावांचा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल.
जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, असे सांगून डॉ. खाडे म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून यापूर्वी केशरी व पिवळ्या कार्डधारकांना दीड लाख रूपयांची मदत केली जात होती. आता सर्वच नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य कवच प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील39 रुग्णालयात ही योजना राबवण्यात येत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे वैद्यकीय शिक्षणाच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक देणारी शासकीय स्तरावरील राज्यातील पहिली वैद्यकीय स्किल लॅब उभी करण्यात आली. तसेच, एचआयव्ही बाधित रूग्णांसाठी स्वतंत्र डायलेसीस विभाग सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातून आत्तापर्यंत 1375 बालकांवर अत्यंत गुंतागुंतीच्या हृदय शस्त्रक्रिया तर 14,720 बालकांच्या इतर शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत.
बिट मार्शल पोलीस अंमलदारांना 41 दुचाकी व संपर्कासाठी मोबाईल फोन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. या माध्यमातून पोलीस दल अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, विकासाच्या प्रक्रियेमध्ये कामगारांचे स्थान महत्त्वाचे आहे. कामगार कल्याणाच्या अनेक योजना शासन राबवित आहे. जिल्ह्यात एकूण दोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षात जवळपास 44 हजार बांधकाम कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यांना शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक व सामाजिक लाभाचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये 43 हजारहून अधिक कामगारांना जवळपास 66 कोटी रूपयांचा शिक्षण विषयक योजनांचा लाभ, 163 कामगारांना जवळपास 32 लाख रूपयांचा आरोग्यविषयक योजनांचा लाभ, 332 कामगारांना जवळपास पावणे 2 कोटी रूपयांचा विविध आर्थिक योजनांचा लाभ, 82 कामगारांना 41 लाख 82 हजार रूपयांचा विविध सामाजिक योजनांचा लाभ देण्यात आला आहे. सन्मान धन योजना 2022 अंतर्गत 55 वर्ष पूर्ण केलेल्या 66 घरेलु महिला कामगारांना प्रत्येकी 10 हजार रूपये सानुग्रह अनुदान याप्रमाणे साडेसहा लाख रूपये इतका लाभ वितरीत करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या ई-श्रम कामगार नोंदणी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत जवळपास साडेतीन हजार कामगारांची नोंदणी झाली आहे. तर 3 हजार कामगार पाल्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना टप्पा 1 व 2 मधील सर्व कामे पूर्ण आहेत. टप्पा 3 मधील 14 कामांसाठी 69 कोटीहून अधिक रकमेस मंजुरी मिळाली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 1 मधील 256 पैकी 244 कामे पूर्ण झाली आहेत. टप्पा 2 मधील 58 कामांसाठी 210 कोटी 22 लाख रूपये रकमेस मान्यता प्राप्त आहे. ही सर्व कामे निविदा प्रक्रियेत असून येणाऱ्या काळात सर्व गावांना दर्जेदार रस्ते मिळतील. शासनाकडून कुपवाड ड्रेनेज योजना कामास मंजुरी देण्यात आली असून 253 कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यामुळे कुपवाड शहर तसेच मिरज व सांगली शहरातील ड्रेनेजचा प्रश्न सुटणार आहे, असे त्यांनी सांगितले.
ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते स्वातंत्र्य सैनिक सर्वश्री माधवराव माने, महादेव रंगनाथ दंडगे, भिमराव अण्णा गोडसे, सज्जनराव शामराव पाटील, ज्ञानू येसु सावंत, नबिलाल अमिन मुलाणी यांचा सत्कार करण्यात आला. सैन्य सेवेत जम्मू काश्मिर येथे सीमा नियंत्रण रेषेवर कार्यरत असताना केलेल्या साहसी पराक्रमासाठी हवालदार संदीप विश्वास जाधव (निवृत्त), लान्स नायक किसन बाबुराव आटुगडे (निवृत्त) यांचा ताम्रपट व सानुग्रह अनुदान देवून सन्मान करण्यात आला. याच पराक्रमासाठी शिपाई योगेश नागेश किर्ते यांचा सन्मान त्यांच्या कुटुबियांनी स्वीकारला. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल फायरमन कासाप्पा लक्ष्मण माने यांचा गौरव करण्यात आला.
गुंतागुंतीच्या न्युरोसर्जरी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल डॉ. संतोष भिमराव दळवी व डॉ. अभिनंदन पाटील, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमात उकृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप साळी, बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रिया प्रधान, महात्मा ज्योतिराव फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली यांचा सन्मान करण्यात आला.
यशस्वी लघुउद्योजक म्हणून मे. युनिव्हर्सल पॉवर कंट्रोल सांगलीच्या पूजा विजय भगत, मे. मास इंजिनिअर्सच्या अर्चना बळीराम पवार (दास), क्षारपड जमिनीमध्ये बांबूची लागवड करून जमिनीची सुपिकता वाढविल्याबद्दल डॉ. दीपक येरटे यांचा सन्मान करण्यात आला. एक्स्ट्रा ऑर्डीनरी ग्रास्पिंग पॉवर जिनिअस किडमध्ये वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल दीड वर्षाची अर्शित राजेश शिंदे आणि शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या 22 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली. यावेळी पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत धून वादन केले. तद्नंतर डॉ. खाडे यांनी उपस्थितांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. कार्यक्रमास विविध मान्यवर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पत्रकार आदि उपस्थित होते.
00000