अमृत काळातील स्वातंत्र्य दिन सन्मानाची, अभिमानाची भावना निर्माण करणारा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
5

नागपूर, दि. १५ : अमृत काळातील स्वातंत्र्य दिन हा सन्मानाची व अभिमानाची भावना निर्माण करणारा आहे. भारतीय स्वातंत्र्यांसाठी स्वातंत्र्य सैनिकांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य सैनिकांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन विशेष गौरव केला.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिन सोहळ्यात नागपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार, अमृत महाआवास अभियान पुरस्कार, सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तसेच मध्यवर्ती कारागृहातील उत्कृष्ट सेवा बजावलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतुलनीय योगदानाबद्दल स्वातंत्र्यसंग्राम सेनानी यादवराव देवगडे, भारत छोडो आंदोलनात सहभागाबद्दल बसंतकुमार चौरसिया, महादेव कामडी, नारायण मेश्राम,  काशिनाथ विठोबा डेकाटे आदी स्वातंत्र्यसंग्राम सेनानींचा उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विशेष गौरव करून त्यांच्यासोबत संवाद साधला.

अहिल्याबाई होळकर गौरव पुरस्कार

महिला व बालकल्याण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार दिल्या जातो.  जिल्ह्यातील महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या डॅा. रेखा बाराहाते (२०१५-१६), प्रा.डॅा.प्रेमा चोपडे-लेकुरवाडे (२०१६-१७), डॅा. नंदा भुरे (२०१७-२०१८), ॲड सुरेखा बोरकुटे (२०१८-१९), ॲड स्मिता सरोदे –सिंगलकर (२०१९-२०), डॅा. लता देशमुख (सन २०१३-१४), जयश्री पेंढारकर (२०१४-१५) यांना सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अमृत महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल पंचायत समिती सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत तसेच क्लस्टरमधील सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

सर्वोत्कृष्ट पंचायत समितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणमध्ये प्रथम आलेल्या पंचायत समिती रामटेक, द्वितीय पंचायत समिती पारशिवनी.  राज्य पुरस्कृत योजनेमध्ये प्रथम आलेल्या पंचायत समिती कळमेश्वर, द्वितीय आलेल्या पंचायत समिती कुही येथील गटविकास अधिकारी तसेच पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या घटकांतर्गत बोथीयापालोरा ता. रामटेक या ग्रामपंचायतीला प्रथम तर द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत कोलीतमारा ता.पारशिवनी.  राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत बोरी ता. रामटेक, द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत निमजी ता. कळमेश्वर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सर्वोत्कृष्ट क्लस्टरमध्ये अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) प्रथम पुरस्कार सागर वानखेडे ता. रामटेक यांना तर राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत प्रथम पुरस्कार मनोहर जाधव ता. पारशिवनी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

मध्यवर्ती कारागृहातील उत्कृष्ट सेवा बजावलेल्या सुभेदार किशोरीलाल सुकराम रहांगडाले आणि किशोर पडाळ यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

इस्त्रोच्या ‘स्पेस ऑन व्हिल्स’चे उद्घाटन

भारतीय अंतराळ प्रवासाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी स्पेस ऑन व्हिल्स ही बस असून या बसचे उद्धाटन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

विदर्भाच्या विविध भागात ही बस जाणार असून विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या मोहिमांची व आतापर्यंतच्या  अंतराळ प्रवासाची माहिती  देणार आहे. नागपुरातून निघून ही बस वर्धा येथे पोहोचेल. या बसमध्ये चांद्रयान-1 मोहीम, मंगलयान मोहीम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसेच इस्त्रोचा एकूणच आतापर्यंतचा अंतराळ प्रवास पहायला मिळणार आहे.

000000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here