अतिवृष्टीग्रस्तांना ५ कोटी ६८ लाख रुपयांचे वितरण – पालकमंत्री संजय राठोड

बाधितांना पुन्हा ५ कोटी ५० लाख अनुदान देणार

यवतमाळ, दि.15 (जिमाका) : जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत 3 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या 11 हजार 374 कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे 5 कोटी 68 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. शासनाच्या नवीन निकषाप्रमाणे या बाधितांना पुन्हा प्रत्येकी 5 हजार या प्रमाणे 5 कोटी 50 लाख वितरित केले जाणार आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमात शुभेच्छा देताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

देशासाठी लढतांना अनेक शुरविरांना आपल्या प्राणांची बाजी द्यावी लागली. अशा सर्व शुरविरांना, शहीदांना पालकमंत्र्यांनी अभिवादन केले. खरीप हंगामासाठी आतापर्यंत 1 लाख 75 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 755 कोटी रुपयांच्या पिककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 92 हजार शेतकऱ्यांना 676 कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे. कर्जमाफीसह पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 67 हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी 50 हजार याप्रमाणे 254 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्यात आले.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत 3 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. कमी कालावधीत यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे केले. नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या 10 व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाख याप्रमाणे 40 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. पूर, अतिवृष्टीमुळे दगावलेल्या 94 जनावरांच्या मालकांना 18 लाख रुपयांचे सहाय्य वितरित करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण करतो आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. केवळ एक रुपयात भरून त्यांच्या पिकांना यावर्षापासून संरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्ह्यातील 3 लाख 54 शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिकविमा योजनेंतर्गत नोंदणी केली असून त्यांच्या 7 लाख हेक्टरला संरक्षण प्राप्त झाले आहे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

विविध लोककल्याणकारी योजनांची आपण जिल्ह्यात चांगली अंमलबजावणी करतो आहे. अनुसूचित जातीतील भूमिहीन मजूरांसाठी राबविण्यात येत असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेतेून 1 हजार 557 कुटुंबांना 6 हजार 100 एकर शेतजमीनीचे वितरण करण्यात आले आहे. जल जीवन मिशन योजनेतून 1 हजार 777 योजनांची कामे केली जात आहे. मातोश्री ग्रामसमृध्दी शेत, पाणंद रस्ते योजनेतून 818 रस्त्याची कामे मंजूर करण्यात आली.

जलयुक्त शिवार ही योजना पुन्हा नव्याने आपण राबवितो आहे. जिल्ह्यातील 312 गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. 303 कोटींचा आराखडा आपण करतो आहे. या योजनेत समावेश झालेल्या गावात साधारणपणे 16 हजारावर कामे केली जाणार आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील 4 लाख 52 हजार कुटुंबांना आपण आतापर्यंत वैयक्तिक शौचालये बांधून दिली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 740 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. राज्य शासनाने देखील पुन्हा 6 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार इतके अनुदान मिळतील.

यशवंत पंचायत राज अभियानात यवतमाळ जिल्हा परिषदेने गेल्या वर्षी राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारामध्ये दिग्रस तालुक्यातील कळसा ग्रामपंचायतीने देखील बालस्नेही संकल्पनेमध्ये प्रथम पुरस्कार प्राप्त केला. प्रत्येक विभागाने आपल्या योजनांमध्ये आपण राज्यात पहिल्या क्रमांकावर कसे राहू याचा विचार करून कामे केली पाहिजे. स्वातंत्र्याच्या या 75 व्या वर्षात गरजू, गरीब व्यक्तींना दिलासा देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांना पोलिस दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमास स्वातंत्र्य संग्राम सैनिक, त्यांचे कुटुंबिय, अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

या ध्वजारोहण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रबोधी धायवट आणि शुभांगी वानखेडे यांनी केले.

 

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा पालकमंत्र्यांकडून सत्कार

यवतमाळ, दि.15 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्त जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, खेळाडू, ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद गट आणि रुग्णालयांचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यलयातील बळीराजा चेतना भवनात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यामध्ये सुरुवातीला उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलिस अधीक्षक डॅा. पवन बनसोड यांचा सत्कार करण्यात आला. तसेच देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शुरविरांच्या वीरमाता व वीरनारींचा सत्कार करण्यात आला. यात वीरनारी मंगला देवचंद सोनवणे, नंदाबाई दादाराव पुराम, सुनिता प्रकाश विहिरे, वीरमाता लक्ष्मीबाई यशवंत थोरात यांचा समावेश आहे. जुलै महिन्यात जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसिलदार डॅा. योगेश देशमुख, जिल्हा शोध व बचाव पथक प्रमुख किशोर भगत, विनोद खरात, मंडळ अधिकारी विनोद पंचबुद्धे, अव्वल कारकुन गंगाधर सुर्यवंशी, महसूल सहायक किशोर येंडे, राजेंद्र ढोपरे, ललिता इवनाते, विजय गावंडे, वाहनचालक आशिष मासाळ यांचा सत्कार करण्यात आला.

एसटी महामंडळाचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या जिल्ह्यातील 11 महिला वाहनचालकांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सुवर्णा कुंभरे, अंजुता भोसले, राधा दाबेकर, सुवर्णा नागमोते, सिमा गवळी, महानंदा ठाकरे, गायत्री होलगरे, पुजा नैताम, हर्षा लडके, रंजना शेळके आणि सुना कुरसंगे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यासह दिग्रस येथील निवृत्त मंडळ कृषी अधिकारी चारुदत्त गोविंदराव गावंडे यांनी निवृत्ती वेतन लाभातून एक लाख रुपये सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस दान केल्याबद्दल त्यांचा पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या पोर्टलवर जिल्ह्याचे उपक्रम अपलोड करण्यात यवतमाळ जिल्हा प्रथम क्रमांकावर आला. याचे कामकाज करणाऱ्या अर्चना प्रविण कुऱ्हे (हिवराळे) यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

आवास योजनेतील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतींना पुरस्कार

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य आवास योजना ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील तीन तालुके, तीन जिल्हा परिषद गट व तीन ग्राम पंचायतींना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचा प्रथम पुरस्कार कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा, द्वितीय पुरस्कार यवतमाळ तालुक्यातील आकपुरी तर तृतीय पुरस्कार उमरखेड तालुक्यातील निंगनूर या ग्रामपंचायतीला देण्यात आला. राज्य आवास योजना ग्रामीण अंतर्गत प्रथम पुरस्कार उमरखेड तालुक्यातील टाकळी, द्वितीय पुरस्कार उमरखेड तालुक्यातील वाणेगाव तर तृतीय पुरस्कार दारव्हा तालुक्यातील चोरखोपडी या ग्रामपंचायतीला देण्यात आला.

सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद गटांना पुरस्कार

राज्य आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद गटासाठी प्रथम पुरस्कार कळंब तालुक्यातील डोंगरखर्डा, द्वितीय पुरस्कार आर्णी तालुक्यातील लोनबेहळ तर तृतीय पुरस्कार महागाव तालुक्यातील काळी दौलत या गटांना प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद गटासाठी प्रथम पुरस्कार उमरखेड तालुक्यातील दराटी, द्वितीय पुरस्कार दारव्हा तालुक्यातील लोही तर तृतीय पुरस्कार उमरखेड तालुक्यातील दराटी या गटांना प्रदान करण्यात आला.

पंचायत समित्यांना पुरस्कार

राज्य आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट पंचायत समितीसाठी प्रथम पुरस्कार पंचायत समिती दिग्रस, द्वितीय पुरस्कार पंचायत समिती बाभुळगाव तर तृतीय पुरस्कार पंचायत समिती यवतमाळ यांना प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट पंचायत समितीसाठी प्रथम पुरस्कार पंचायत समिती उमरखेड, द्वितीय पुरस्कार पंचायत समिती दिग्रस तर तृतीय पुरस्कार पंचायत समिती नेर यांना प्रदान करण्यात आला.

क्रीडा पुरस्काराचे वितरण

सन 2019-20 मधील जिल्हास्तरावरील क्रीडा पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात कार्तिक हलमारे, काजल राजु दोनोडे, छगन गुरनुले, अमोल बोदोडे आणि अमोल जयसिंगपुरे या खेळाडूंना क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

रुग्णालयांचा सन्मान

जिल्ह्यामध्ये एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये कामगिरी करणाऱ्या वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ या शासकीय व वडते बाल रुग्णालय, पुसद या खाजगी रुग्णालयांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा समन्वयक सुरेद्र नरसिंगराव इरपनवार यांचा गौरव करण्यात आला. शेवटी यवतमाळ तालुक्यातील एक शासकीय धान्य गोदाम व सहा रास्त भाव दुकानांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले. शासकीय धान्य गोदाम व रास्त भाव दुकानदारांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

००००