आरोग्यदायी रानभाज्यांचा नागरिकांनी वापर करावा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.15 (जिमाका) : नैसर्गिकरित्या उत्पादित होणाऱ्या रानभाज्यांचे अनन्य साधारण महत्त्व असून आरोग्यासाठी महत्त्वाच्या आहेत. नागरिकांनी रानभाज्यांचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यावतीने येथील वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्रात आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री.राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक डॅा.पवन बनसोड, उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डाबरे, कृषी विज्ञान केंद्रांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ सुरेश नेमाडे आदी उपस्थित होते.

रानभाज्यांचे महत्त्व समजून घेतले पाहिजेत. रानभाज्या लुप्त न होता त्या टिकल्या पाहिजे यासाठी शासनस्तरावर विशेष कार्यक्रम राबविण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. रानभाज्या बाजारात उपलब्ध असून नागरिकांनी खरेदी करुन भाज्यांचा आस्वाद घ्यावा. या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक गाडा चालण्यास मदत होईल, असे आवाहनही पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी केले.

यावेळी सेंद्रिय शेतमाल विक्री केंद्राचे उद्घाटन आणि रानभाज्यांचे महत्त्व व उपयोग या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. विविध रानभाज्यांच्या स्टॅालला भेटी देऊन त्यांनी भाज्यांच्या उपयोगितेबाबतची माहिती जाणून घेतली. तसेच पालकमंत्र्यांसमवेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकत्रित सेल्फी काढून रानभाजी महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.

००००