बीड, दि. 15 (जि.मा.का.) : बीड जिल्हा येत्या काळात कृषी क्षेत्रात संपन्न औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर ठरावा यासाठी आपण संकल्प करु या असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सोहळ्यात संदेशाव्दारे नागरिकांना केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता सोहळ्यात आज मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा श्री. मुंडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाले. यावेळी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक आणि पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या दिमाखदार सोहळ्यात ध्वजारोहणानंतर पोलिस बॅन्ड पथकाव्दारे वाजविण्यात आलेल्य राष्ट्रगीतावर सर्वानी ध्वजाला सलामी दिली. यावेळी महाराष्ट्र गीत देखील सादर करण्यात आले.
यावेळी आपल्या संदेशात ते म्हणाले की, स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आपण विविध उपक्रमांनी साजरे करीत आहोत. या लोकशाहीत प्राधान्य असलेल्या प्रत्येक सामान्य माणसापर्यंत या स्वातंत्र्याचा व त्यानंतर लाभलेल्या विकासाच्या प्रक्रियेचा लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हे राज्य सरकार कटीबध्द आहे.
नागरिकांना आपल्या कामासाठी वारंवार सरकारी कार्यालयात यावे लागू नये यासाठी ‘शासन आपल्या दारी’ सारख्या मोहिमेतून लोकांची कामे गतीमान पध्दतीने शासन आता करत आहे.
विकासाची ही गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत लाभाच्या रुपाने पोहचली पाहिजे व जनसामान्यांना हे सरकार ‘आपले सरकार’ वाटले पाहिजे याच भूमिकेतून मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांनी योजनांची आखणी केलेली आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी व इतरांना लाभ मिळवून द्यावेत अशा पध्दतीने कामकाज सुरु केले आहे. त्याबाबत त्यांनी आभार व्यक्त केले.
जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. काही भागात गोगलगायीचा चा प्रादूर्भाव देखील जिल्ह्यातील काही भागातील पिकांवर झाला आहे. शासन या सर्वच बाबतीत उपाय योजना करीत आहे. शेतकऱ्यांना त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच पाहिजे, तसेच नुकसान झाल्यावर शासनाचा आधारही मिळाला पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. अशा प्रत्येक प्रसंगात शासन खंबीरपणे आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी आपल्या भाषणात दिली..
शेतक-यांना त्यांच्या खात्यात दर 4 महिन्याला 2000 हजार रुपये लाभ थेट देण्यात यावा अशी केंद्र सरकारची पीएम किसान सन्मान योजना सुरु आहे. त्यात राज्य शासन दर 4 महिन्याला 2000 रुपये नमो किसान महासन्मान योजने अंतर्गत थेट पध्दतीने लाभाच्या स्वरुपात देणार आहे.असे सांगून श्री मुंडे म्हणाले की,या योजनांचा थेट लाभ देण्यासाठी राज्यात 97 लाख शेतकरी पात्र आहेत. मात्र संगणक प्रणालीबाबत माहिती नसणे, भूमिअभिलेख अद्ययावत नसणे, तसेच ई- केवायसी पूर्ण नसणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे, यांसारख्या कारणांनी राज्यातले 12 लाख लाभार्थी या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्वांना या योजनांचा लाभ मिळण्यासाठी बँक खात्यांची आधार संलग्नता, ई – केवायसी, भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे यासाठी कृषी विभागाच्या पुढाकारातून गावपातळीवर कृषी सेवक, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मार्फत त्वरित पूर्ण करुन घ्यावीत अशी विशेष मोहीम आपण सुरू केली होती, पात्र लाभार्थी शेतक-यांनी तसेच गावातील लोकप्रतिनिधीनी यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे आवाहन मी या प्रसंगी करतो. राज्यात आगामी काळात एकही पात्र लाभार्थी शेतकरी यापासून वंचित राहणार नाही.यासाठी या मोहिमेला मुदतवाढ देखील देण्यात येणार असल्याचे सूचित केले.
लहरी हवामानचा फटका शेतक-यांना बसू नये यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना आपण राबवतोय. शेतकऱ्यांना आता पीक विम्याच्या हप्त्यापोटी केवळ 1 रुपया भरावा लागतो. राज्यात यावर्षीच्या खरीप हंगामात सुमारे 1 कोटी 69 लाख शेतकऱ्यांनी यंदा एक रुपया पीकविमा योजनेत सहभाग घेतला आहे व याद्वारे महाराष्ट्र राज्य पीकविमा भरणाऱ्यांच्या संख्येत देशात प्रथम स्थानी आहे!असेही सांगून त्यांनी सर्व यंत्रणांचे अभिनंदन यावेळी केले.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत जिल्ह्यात गेल्या 4 वर्षात 95 हजार 197 लाभार्थी मातांना 40 कोटी 46 लाख रुपयांचा लाभ प्रदान करण्यात आला. याचं पुढचं पाऊल म्हणून हिंदू-हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात आले आहेत. जिल्हयातील 11 तालुक्यात असा प्रत्येकी 1 दवाखाना कार्यान्वित आहे, याचाही 4 हजारांहून अधिक रुग्णांना लाभ झाला आहे, तसेच दुर्बल घटकातील जनतेसाठी 27 ठिकाणी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरु करण्यात आली आहेत.असेही कृषी मंत्री यावेळी म्हणाले.
जिल्हा विकासाठीच्या निधीतून ग्रामीण भागात रस्ते मजबूत करण्यासाठी 39 कोटी 70 लाख रुपये तरतुद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत करण्यात आली आहे. ऐतिहासिक व धार्मिक दृष्टीने महत्व असलेल्या आपल्या जिल्ह्यात स्मारके संवर्धन व संरक्षणासाठी 11 कोटी 85 लाख रुपये खर्च केले जातील. इतकीच तरतूद महिला व बालविकास तसेच गृहविभाग यांच्यासाठी स्वतंत्रपणे करण्यात आली असल्याचे त्यांनी सागितले.
महिला व बाल विकास विभागा अंतर्गत बीड येथे महिला भवन उभारण्यासाठी यात 2 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच याच्या उभारणीचे काम होईल असे श्री मुंडे म्हणाले.
महिलांच्या सवलतीबाबत बोलताना जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नाकडेही लक्ष दिले पाहिजे. जिल्ह्यातील मुलींचे होणारे बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरु आहे. पालकांनी यात आपली भूमिका समजून घ्यावी व बालविवाह थांबवावेत आणि मुलींना त्यांचा जगण्याचा व शिक्षणाचा हक्क मिळवून द्यावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केले.
जिल्ह्यात गतिमान विकासाला तंत्रज्ञानाचीही जोड देणे आवश्यक आहे. महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या माध्यमातून या शेतकरी बहूल जिल्हयात ई-पीक पाहणी, ई- हक्क पोर्टल, आपले सरकार पोर्टल आदी माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिले जात आहे. या सर्व प्रयत्नांबद्दल महसूल प्रशासनाचे अभिनंदन मंत्री महोदयांनी केले.
स्वातंत्र्य दिन साजरा करतानाच आपण मराठवाड्याचा मुक्ती संग्राम देखील डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. मराठवाडा मुक्ती दिनाचा अमृत महोत्सव देखील 17 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. या मुक्ती संग्रामात आपल्या जिल्ह्याचे योगदान खूप मोठे आहे. त्यातील प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाच्या योगदानाचे स्मरण आपण आजच्या प्रसंगी करुया व त्यातील हुतात्म्यांना देखील आजच्या दिवशी वंदन करुया.असेही कृषी मंत्री आपल्या संदेशात म्हणाले.
यावेळी ध्वजारोहणानंतर जिल्हयातील मुंलींचा बालविाह रोखण्यासाठी सुरु असलेल्या एका बोधचिन्हाचे अनावरण कृषीमंत्री मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमात के.एस.के महाविद्यालयाच्या संगीत विभागाच्या विद्यार्थिनींनी मराठवाडा मुक्ती संग्रमावर एक पोवाडा सादर केला.प्रा. संजय पाटील देवळाणकर यांनी हा पोवाडा लिहीला आहे. मुक्ती संग्राम लढयाची आठवण देणारा हा कार्यक्रम गावागावात सादर व्हावा असे मंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.ध्वजारोहण सोहळयानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर विविध प्रश्नांवर आंदोलन करणा-या नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या समजावून घेतल्या.
*****