मुंबई, दि. १७ : मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र राज्य हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. राज्य देशात औद्योगिक विकासात आघाडीवरील राज्य आहे. राज्यात उद्योगांसाठी शाश्वत पायाभूत सोयीसुविधा, दळण-वळणाची अद्ययावत साधने उपलब्ध असून येथे उपस्थित विविध देशांच्या वाणिज्यदुतांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज सायंकाळी हॉटेल ताज लॅण्डस एण्डस येथे राज्य शासनाच्या राजशिष्टाचार विभागातर्फे विविध देशांचे राजदूत, वाणिज्यदुतांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मुख्य सचिव मनोज सौनिक, राजशिष्टाचार विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, ब्रिजेश सिंह, मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल, वाणिज्य दूतावासाच्या डीन श्रीमती अंड्रिया आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देत म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. अशा या शूरवीरांना अभिवादन करतो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा जलदगतीने विकास होत आहे. जी २० परिषदेनिमित्त भारताला जागतिक पातळीवर नेतृत्वाची संधी मिळाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताचे विविध देशांशी सौहार्दपूर्ण संबंध वृद्धिंगत होत आहेत. देशाच्या जीडीपीत महाराष्ट्राचा १५ टक्के वाटा असून ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद आहे. त्याबरोबरच देशात होणाऱ्या परकीय गुंतवणुकीपैकी ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे.
आमचे सरकार विकासाभिमुख असून राज्यात शाश्वत पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत. तसेच या सरकारने कृषी, शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, पर्यटन विकासासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, ‘वसुधैव कुटुंबकम‘ हीच भारताची भूमिका असून आपण या कुटुंबाचे सदस्य आहात. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाली असून भारताचा अमृतकाळ सुरू आहे. आगामी २५ वर्षात भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल. सन २०२८ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर होईल. त्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे राहील. आगामी काळात भारतीय लोकशाही अधिकधिक मजबूत होईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी श्रीमती आंद्रिया यांनी मनोगत व्यक्त केले. अपर मुख्य सचिव श्री. देवरा यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध देशांचे भारतातील राजदूत, वाणिज्यदूत, वरिष्ठ सनदी अधिकारी, सामाजिक, कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
००००