अठराशे सत्तावन्नचा उठाव

भारतीयांनी 1857 मध्ये इंग्रजी सत्तेविरुद्ध केलेला उठाव. काही इतिहासकार या उठावास बंड म्हणतात, तर काही त्यास स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवितात. 1857 च्या उठावामागे राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक व लष्करी अशी अनेकविध कारणे होती.

1857 पूर्वी डलहौसी या गव्हर्नर जनरलने आसाम, कूर्ग, सिंध, पंजाब व ब्रह्मदेशातील पेगू हे प्रांत हस्तगत केले होते; गादीचे दत्तक वारस नामंजूर करून सातारा, झाशी, नागपूर, ओर्च्छा, जैतपूर, संबळपूर अशी संस्थाने खालसा केली; त्याच मुद्द्यावर दुसऱ्या बाजीरावाचा दत्तक मुलगा नानासाहेब याचा तनखा बंद केला; अव्यवस्थित कारभाराच्या निमित्ताने डलहौसीने अयोध्येचे राज्य व निजामाचा वऱ्हाड प्रदेश ताब्यात घेतला. त्यामुळे लहानमोठ्या सर्व संस्थानांत असंतोष निर्माण झाला होता.

संस्थाने खालसा झाल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले लोक व सैनिक बेकार झाले. 1833 पासून 1857 पर्यंत इंग्रजांनी साम्राज्य-विस्तारासाठी अनेक युद्धे केली. या युद्धांचा खर्च हिंदी जनतेवर डोईजड कर बसवून वसूल केला होता. पाश्चात्त्य वस्तूंवरील आयात कर माफ केल्यामुळे इंग्रजी मालाला उठाव मिळाला व देशी उद्योगधंदे बंद पडले. हिंदुस्थानचे दारिद्र्य वाढले. इंग्रजी अंमलात जमीनदार, वतनदार, शेतकरी यांचे हाल झाले. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्‍यांनी दुष्काळ, अवर्षण यांचा विचार न करता जमिनीची पहाणी करून जमीनमहसुलाचे कमाल आकार ठरवून दिले. जमिनीच्या मालकाकडे सरकारी देणे राहिल्यास कंपनीचे अधिकारी जमिनी जप्त करीत किंवा विकून टाकीत. यामुळे शेतकरी व जमीनदार यांचे हाल झाले. जमिनीच्या साऱ्‍यासंबंधीच्या नवीन नियमांनुसार सरकार व शेतकरी यांच्यामधील मध्यस्थ काढून टाकल्यामुळे तालुकदारांना काम उरले नाही. 1852 मध्ये डलहौसीने सरदार, इनामदार यांचे हक्क तपासण्यासाठी नेमलेल्या इनाम आयोगाने बत्तीस हजार इनामांची चौकशी केली. मालकीचा पुरावा नसलेल्या एकवीस हजार वतनदारांची वतने जप्त केली. वारस नाही म्हणून आंग्रे यांचे संस्थान खालसा केले.

कंपनी सरकार व हिंदी सैनिक यांत बरेच दिवस तेढ निर्माण झाली होती. या उठावापूर्वी हिंदी सैनिकांनी 1806 पासून 1850 पर्यंत वेलोर, बरेली, बराकपूर, जबलपूर, फिरोझपूर इ. ठिकाणी बंडे केली होती. हिंदी सैन्याच्या बळावर इंग्रजांनी आपली सत्ता बळकट करून साम्राज्यविस्तार केला होता. परंतु पदव्या व बक्षिसे मात्र इंग्रज अधिकाऱ्‍यांनाच दिली जात. हिंदी सैनिकांना दूरवरच्या आघाड्यांवर जाण्यासाठी दिलेला जादा भत्ता बंद केला होता. 1857 च्या सुमारास ब्रिटिशांचे हात यूरोप, चीन आणि इराण येथील युद्धांत गुंतले असल्यामुळे कलकत्ता ते अलाहाबाद या प्रदेशात फक्त एकच यूरोपीय पलटण होती. मुख्य लष्करी ठाणी हिंदी सैन्याच्या हातात होती. कंपनी सरकारचे राज्य हिंदी सैन्यावर अवलंबून आहे, अशी समजूत लष्करात पसरली. यातच 1856 मध्ये कॅनिंगने सैन्यातील शिपायांनी हिंदुस्थानच्या बाहेर गेले पाहिजे, असा हुकूम काढला. या असंतोषातच काडतूस-प्रकरणाने प्रक्षोभ निर्माण केला. हिंदूंना पवित्र असलेल्या गायीची किंवा मुसलमानांना निषिद्ध असलेल्या डुकराची चरबी काडतुसांना लावलेली असल्यामुळे हिंदू व मुसलमान यांच्या भावना दुखावल्या गेल्या.

अठराशे सत्तावनच्या जानेवारी—फेब्रुवारी महिन्यांत डमडम व बराकपूर येथे काडतूस-प्रकरणावरून गडबड झाली. मीरत येथील शिपायांनी नवी काडतुसे वापरण्याचे नाकारल्यामुळे त्यांना कैद केले गेले. शिपायांनी सरकारी इमारती जाळण्यास सुरुवात केली. 29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे व इंग्रज अधिकारी ह्यांच्यात चकमक झाली. मंगल पांडे यास पकडून 8 एप्रिल 1857 रोजी फाशी देण्यात आले. येथूनच उठावास सुरुवात झाली. हा उठाव सप्टेंबर 1858 पर्यंत चालू राहिला. या काळात बराकपूर, लखनौ, मीरत, दिल्ली, लाहोर, फिरोझपूर, अलीगढ, पेशावर, मथुरा, झाशी, आग्रा, बरेली, कानपूर, अलाहाबाद इ. ठिकाणी लहानमोठ्या प्रमाणात गडबडी झाल्या. या उठावाचे महाराष्ट्रातही पडसाद उठले. इंग्रजी सत्ता खिळखिळी करण्यासाठी व सातारच्या गादीचे पुनरुत्थान करण्यासाठी सातारकरांचा वकील रंगो बापूजी याने सातारा, पुणे, कोल्हापूर येथे गुप्त कारस्थाने सुरू केली. नानासाहेब पेशव्याचे दूत ग्वाल्हेरचे ज्योतिराव घाटगे व निंबाळकर यांनी कोल्हापूरात उठाव केला. इंग्रजांनी हा उठाव मोडून काढला. उत्तरेत उठावातील लोकांनी प्रथम दि. 11-5-1857 रोजी दिल्ली ताब्यात घेतली. बहादुरशाहाला हिंदुस्थानचा बादशहा म्हणून जाहीर केले. परंतु थोड्याच दिवसांत लॉरेन्सने दिल्ली पुन्हा सोडवून घेतली. ऊट्रम व हॅवलॉक यांनी लखनौ येथील उठाव मोडले. ड्यूरंडने माळव्यातील उठावाचा बंदोबस्त केला. मार्च 1858 मध्ये इंग्रजांनी झाशीला वेढा दिला. ह्यू रोझ व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यात लढाई होऊन इंग्रजांनी झाशीचा कबजा घेतला. पुढे राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे दोघे ग्वाल्हेर येथे इंग्रजांविरुद्ध लढले.

लढाईत लक्ष्मीबाई मरण पावली. दि. 21-1-1859 रोजी राजपुतान्यात सीकार येथे तात्या टोपे व इंग्रज यांच्यात झालेल्या लढाईत तात्या टोपेचा पराभव झाला, तो पकडला गेला. दि. 18-4-1859 ला त्यास इंग्रजांनी फाशी दिले. नानासाहेब व इंग्रज यांच्यात कानपूर येथे लढाई झाली. नानासाहेब रोहिलखंडाच्या बाजूस गेला असता इंग्रजांनी त्याचा पाठलाग केला. कँबेल याने रोहिलखंडातील उठाव मोडला. नानासाहेबास पकडण्यासाठी इंग्रजांनी 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले. नानासाहेब व हजरत बेगम हे नेपाळात निघून गेले असावेत. बहादुरशाहास इंग्रजांनी कैद करून रंगूनला पाठविले. या उठावात शिंदे, निजाम, भोपाळच्या बेगमा, नेपाळचा राणा जंग बहादूर यांनी इंग्रजांना मदत केली. पंजाबमधील शीख, काश्मीरचा राजा व कित्येक जमीनदार इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले.

इंग्रजाच्या ताब्यात आलेल्या वऱ्हाड प्रांतात या बंडाच्या काळात पूर्ण शांतता होती. 1857 उठावाचा वीर सेनानी तात्या टोपे हा 1858 मध्ये मध्य भारतातून मेळघाट विभागात आला व त्याने तेथील भिल्ल, कोरकु, गोंड या लोकांना इंग्रजाविरुध्द चिथावले. कॅप्टन मेडोज टेलर हा त्यावेळी या विभागाचा डेप्युटी कमिशनर होता. त्याने मेळघाटच्या राजाच्या इंग्रज भक्तीबद्दल प्रशंसा केली आहे. पुढे अमरावतीला एकत्र झालेली इंग्रजांची फौज घेऊन ब्रिगेडीयर हील हा गाविलगडला गेला आणि कॅप्टन स्कॉटला त्याने  वरुडच्या दिशेने पाठविले. बंडवाल्यापासून अमरावतीचे संरक्षण करावे म्हणून इंग्रजांनी अमरावतीचे सभोवार प्रचंड फौज आणि तोफा उभ्या केल्या होत्या. 1857 च्या बंडानंतर सर्वत्र धरपकड सुरु झाली. बंडवाल्या लोकांबरोबर साधु. वैरागी, सन्याशी अशाही लोकांना संशयित म्हणून कंपनी सरकारने पकडल्याचा सपाटा सुरु केला. त्याला कारणही तसेच होते. बंडात भाग घेणारे कित्येकजन आपण पकडले जाऊ नये म्हणून वेश बदलून साधु-सन्यासी बनले होते. 1857 चा उठाव फसल्यानंतर वेश पालटून अनेक संबंधित व्यक्ती देशभराच्या कानाकोपऱ्यात निघून गेल्या होत्या.

हा उठाव यशस्वी होऊ शकला नाही; कारण उठावातील लोकांच्या पुढे निश्चित ध्येय नव्हते. त्यांच्यात एकजूट नव्हती. बरेचसे भारतीय इंग्रजांना फितूर झाले होते. सर्व संस्थानिक उठावात सामील झाले नव्हते.

या उठावाने भारतीय इतिहासाला कलाटणी मिळाली. हिंदुस्थानचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून इंग्लंडच्या संसदेकडे सोपविण्यात आला. इंग्लंडचा राजा हिंदुस्थानचा बादशहा झाला. कंपनीचे ‘बोर्ड ऑफ कंट्रोलʼ रद्द करून ‘इंडिया कौन्सिलʼ नेमण्यात आले. सैन्याची पुनर्रचना करण्यात आली. संस्थानिक व सरकार ह्यांच्यातील संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. उठाव शमल्यानंतर कॅनिंगने शांतता प्रस्थापित केली. गव्हर्नर जनरल कॅनिंग हा पहिला व्हाइसरॉय झाला.

पुढील काळातील भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात या उठावाची पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून स्मृती जागी ठेवण्यात आली. 1957 मध्ये भारतभर 1857 च्या उठावाचा शतसांवत्सरिक उत्सव साजरा करण्यात आला.

विभागीय माहिती कार्यालय,

अमरावती