मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

धुळे : दिनांक 21 ऑगस्ट, 2023 (जिमाका वृत्त); प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून केंद्रस्तरावर प्रधानमंत्री मत्स्यसंवर्धन योजना राबविण्यात येत आहे. पारंपरिकरित्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना प्रशिक्षण देत आधुनिक पद्धतीने मत्स्य व्यवसाय करण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून या व्यवसायिकांना उभारी देण्याचा प्रयत्न शासनामार्फत केला जात असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी शिरपूर येथे केले.

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ तसेच प्रधानमंत्री मत्स्यसंवर्धन योजना, मत्स्य व्यवसाय नाशिक विभाग व आवलामाता प्राथमिक भूजलाशयीन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मत्स्य व्यवसाय साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, राहुल रंधे, जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, मत्स्य व्यवसाय विभागाचे उपायुक्त एस पी वाटेगावकर, धुळे जिल्हा मत्स्यव्यवसाय अधिकारी अविनाश गायकवाड तसेच अवलामाता प्राथमिक भूजलाशयीन मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण शिरसाट, मार्केट कमिटीचे मिलिंद पाटील, सरपंच दिगंबर पाटील,उपसरपंच राहुल रंधे, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना मंत्री डॉ. गावित म्हणाले की, संपूर्ण देशात मत्स्य व्यवसायात मोठी संधी उपलब्ध आहे. आधुनिक पद्धतीने मोठ्या संख्येने यात व्यवसाय वृद्धी करणे शक्य आहे.  आदिवासी बांधव मोठ्या संख्येने पारंपारिकरित्या मत्स्य व्यवसाय करीत असतात. या पारंपरिकरित्या मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांचे जीवनमान, आर्थिकस्तर उंचावण्यासाठी व त्यांच्या व्यवसायाला पाठबळ देण्याचे धोरण महाराष्ट्र शासन राबवित आहे. यासाठी प्रशिक्षणासह आधुनिक पद्धतीचे व्यवसाय साहित्य देखील उपलब्ध करून दिले जात आहे. यातून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचे डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी शेतकरी व कष्टकरी बांधवांच्या उत्पन्न वाढीसाठी, ज्या आदिवासी व्यक्तीकडे जमिन आहे, त्यांना कृषि साहित्य, बि-बियाणे उपलब्ध करुन देणे, त्यांच्या शेतात विहिर बांधण्यासाठी अर्थसहाय्य करणे अशा योजना राबविण्यात येत असून ज्या आदिवासी व्यक्तींना प्रामुख्याने मच्छिमारी व्यवसाय करावयाचा असेल त्यांना केज फिशिंग सुविधा देखील उपलब्ध करून दिली जात आहे. शासनाचे विविध विभाग व आदिवासी विभागामार्फत अनेक योजना सुरू असून याद्वारे आदिवासी बांधवांचे उत्पन्न वाढविणे हा त्यामागचा हेतू आहे. यासोबतच आदिवासी बांधवांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न शबरी घरकुल योजना तसेच इतर योजनांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचेही डॉ. गावित म्हणाले.

खासदार डॉ. हिना गावित यांनी संवाद साधताना सांगितले की, केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या सहकार्यातून मत्स्य प्रक्रिया उद्योगाला चालना देणार असून भारतात मोठ्या प्रमाणावर मत्स्य व्यवसाय वाढीसाठी संधी उपलब्ध आहे, पारंपरिक पद्धतीने वाढीस लागलेल्या या समृद्ध व्यवसायात आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्यातीलाही सुरूवात झाली आहे. येणाऱ्या काळात मत्स्य प्रक्रिया उद्योगाला मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याने त्याला प्रोत्साहन व चालना देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे खासदार डॉ. हिना गावित यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनी विविध योजनांची माहिती देत उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांना धनादेश, पारंपरिक मच्छीमार व्यवसाय करणाऱ्यांना लाईव्ह जॅकेटसह, जाळी बॉक्स  किट ,मत्स्य व्यवसायासाठी चार पिकअप व्हॅन व एक तीन चाकी अँपे रिक्षा लाभार्थ्यांना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवलामाता प्राथमिक भूजलशायीन मत्स्य सहकारी  संस्थेचे अध्यक्ष प्रवीण शिरसाठ यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, लाभार्थी उपस्थित होते.

00000