मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम विहित वेळेत पूर्ण करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0
7

सांगलीदि. 21 (जि. मा. का.) : मिरज शहरातील वाहतुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता महत्त्वाचा आहे. या रस्त्याचे काम ऑक्टोबरपूर्वी होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महानगरपालिका, महावितरण, राज्य परिवहन विभाग यासह संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने व सहकार्याने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज दिले.

मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ते कामाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महापालिका आयुक्त सुनील पवार, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, महावितरणचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर, उपायुक्त स्मृती पाटील, कार्यकारी अभियंता आप्पासो खांडेकर, नगर भूमापन अधिकारी ज्योती पाटील, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचे सुशांत पाटील आदी उपस्थित होते.

या रस्त्याच्या बांधकामात अडथळे ठरणाऱ्या 193 विजेच्या खांबांचे स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरू असून आठवडाभरात सर्व खांबांचे स्थलांतर करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी यावेळी दिल्या. त्यासाठी महावितरणने विशेष लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराकडून वेळेत खांबांचे स्थलांतर होईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

या रस्त्याच्या कामामध्ये एस. टी. महामंडळाकडील रस्त्यालगतची भिंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची भिंत अडथळा ठरत असल्याने हा अडथळा यंत्रणांनी त्वरित दूर करावा, असेही त्यांनी यावेळी सूचित केले. बैठकीमध्ये रस्ते कामामध्ये बाधित होणाऱ्या खाजगी मालमत्तांसंदर्भात चर्चा करण्यात आली.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here