सामाजिक वनीकरण विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

सातारा दि.21 (जिमाका) :   शेतकऱ्यांचे आर्थिक हित डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  बांबू लागवड मिशन   सुरु केले आहे. या योजनेनुसार  सामाजिक वनीकरण विभागाला  दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, असे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, सातारा कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सर्वश्री शशिकांत शिंदे, अरुण लाड, महादेव जानकर, मकरंद पाटील, प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनीता सिंग, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, पोलीस अधीक्षक समिर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, विभागीय वन अधिकारी एच.एस. वाघमोडे, सहायक वनसंरक्षक टि.एल. लंगडे आदी उपस्थित होते.
लोकांचा सभाग घेवून जिल्ह्यातील वनसंपदा वाढविण्याचे काम सामाजिक वनीकरण विभागाने करावे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले,  बांबु लागवडीतून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार आहे. या विषयावर वनीकरण विभागाशी लवकरच बैठक घेण्यात येईल. बांबु लागवड योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वकांक्षी योजना आहे. बांबु लागवडी मुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात, गावाच्या सौंदर्यात वाढ होणार आहे.  सामाजिक वनीकरण विभागाकडे असणाऱ्या विविध योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ द्यावा. सामाजिक वनीकरणाच्या ज्या चांगल्या संकल्पाना आहेत त्याला पालकमंत्री म्हणून सहकार्य राहील, अशी ग्वाहीही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिली.
खासदार श्री. पाटील म्हणाले, प्रत्येक व्यक्तीने एक आपल्यासाठी व एक कुटुंबासाठी झाड लावावे. सातारा जिल्हात अनेक किल्ले आहेत.  या किल्ल्यांवर सामाजिक वनीकरण विभागाने वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करावे व जिल्ह्यातील वनसंपदा वाढवावी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय वन अधिकारी श्री. वाघमोरे यांनी केले. या कार्यक्रमास सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


0000