स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून रिक्त पदे भरण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २२ :- महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच चौथ्या महिला धोरणाची राज्यात अंमलबजावणी होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले असून त्यांची झालेली नियुक्ती म्हणजे एक सेवेची संधी आहे. या कामाच्या माध्यमातून  राज्यातील बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी आणि महिलांचे आरोग्य सुधारणेच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत भरती प्रक्रियेद्वारे नवनियुक्त झालेल्या १९ हजार ५७७ अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यापैकी मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील ५८ अंगणवाडी कर्मचारी यांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीपत्र प्रदान करण्याच्या  कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ.अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. इंदू जाखड, स्माईल फाऊंडेशनच्या संचालक उमा आहुजा व धीरज आहुजा, मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील ५८ नवनियुक्त अंगणवाडी कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आज नियुक्ती पत्र देण्यात आलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा. सुमारे २० हजार १८६ पदे रिक्त होती. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आपण रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले आहे. आज आपण राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमातून आतापर्यंत १३ जिल्ह्यांत आपण पोहोचलो असून, राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यांपर्यंत पोहोचत आहोत. सुमारे एक कोटीहून अधिक नागरिकांना लाभ पोहोचवता आल्याचे समाधान आहे.

मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले की, राज्यातील भावी पिढी ही सशक्त आणि सदृढ असेल तर राज्याचे भवितव्यही तितकेच चांगले राहील. यासाठी माता, बालकांचे आरोग्य आणि त्यांचा सर्वांगीण विकास महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्र हा आरोग्य क्षेत्रातही अग्रेसर आहे. त्याचप्रमाणे महिला धोरणांची अंमलबजावणीतही अग्रेसर आहे. महिलांचा राज्याची वाटचाल, उभारणीत बरोबरीचा वाटा आहे, हे नाकारता येणार नाही. म्हणून आपण राज्यात महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांचा विकास, शिक्षण, रोजगार आणि उद्योग अशा सर्वच क्षेत्रात प्रोत्साहन आणि बळ मिळेल यासाठी धोरण ठरविले आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा निर्णय घेतला असून सेविकांना 10 हजार तर मिनी अंगणवाडी सेविकांना 7,200 आणि मदतनीस यांना पाच हजार रूपयांपर्यंतचे मानधन वाढवले आहे. अंगणवाड्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारामध्ये संख्यात्मकता आणि गुणात्मकता यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही.

महिलांच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, ताराबाई मोडक यांनी अंगणवाडी सेवेचा पाया घातला. त्यांचे कार्य पाहूनच तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी संपूर्ण देशभरात अंगणवाडी संकल्पना सुरू केली. बालकांना शिक्षण देणे व त्यांचे योग्य पोषण करून त्यांचा मानसिक विकास करणे यामध्ये मोलाची कामगिरी अंगणवाडी कर्मचारी बजावत असतात. त्यांच्या हातून एक प्रकारे राष्ट्र उभारण्याचे कामच होत असते. धारावी येथे स्माईल फाऊंडेशनचे संस्थापक धीरज अहुजा व उमा आहुजा यांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवले असून विविध महिला विकासाच्या योजना शासन राबवत आहे. महिला विकास धोरण महिलांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अंगणवाडीच्या माध्यमातून सुदृढ बालक, सक्षम पिढी घडविण्याचे काम – आदिती तटकरे

महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, अंगणवाडी कर्मचारी हे फक्त पोषण आहार देणे व बालकांचे संगोपन करणे एवढेच काम करीत नसून सुदृढ बालक आणि सक्षम पिढी घडविण्याचे काम करीत असतात. यावर्षी स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ. आनंदीबाई जोशी आरोग्य शिबिरांचे आयोजन केले होते. यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. यापुढे होणाऱ्या शिबिरांमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांचाही समावेश केला जाईल. राज्यातील प्रत्येक बालक सुदृढ होण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात त्यांना पाठबळ देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी प्रास्ताविक केले. सचिव डॉ. यादव यांनी विभागाविषयी माहिती दिली. स्माईल फाऊंडेशनच्या संचालक उमा आहुजा, धीरज आहुजा यांनी धारावी येथे बायजुस (BYJUS Education) तर्फे डिजिटल लर्निंग संदर्भात केलेल्या कामाचा गौरव करण्यात आला. यावेळी अंगणवाडी कर्मचारी यांच्या पाल्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

०००००

संध्या गरवारे/विसंअ