‘चांद्रयान-३’ मोहिमेतलं महाराष्ट्राचं योगदान कायम लक्षात ठेवलं जाईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
4

मुंबई, दि. 23 :- ‘चांद्रयान-3’नं चंद्रावर केलेल्या यशस्वी लॅन्डींगमुळे अमेरिका, रशिया, चीननंतर भारत जगातील चौथी अंतराळशक्ती ठरला आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशानं जगात भारताची मान उंचावली असून प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल, अशी ही ऐतिहासिक घटना आहे. देशातील शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संशोधकांच्या, देशवासियांच्या अथक परिश्रमांचं हे फळ आहे. ‘चांद्रयान-3’च्या मोहिमेत राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, जळगाव, बुलडाणा, वालचंदनगर, जुन्नर आदी शहरांनीही महत्वाची भूमिका बजावली. समस्त देशवासियांच्या एकजुटीतून मिळालेलं हे यश असल्याचे सांगत ‘चांद्रयान-3’ मोहिमेत योगदान दिलेल्या इस्त्रोचे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, अधिकाऱ्यांसह देशवासीयांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळात देश यशाची नवनवीन शिखरं पादाक्रांत करेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

‘चांद्रयान-3’ची मोहिम यशस्वी झाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, भारत गेल्या अनेक दशकांपासून अंतराळ क्षेत्रातील महाशक्ती म्हणून कार्यरत होता. आजच्या चांद्रमोहिमेच्या यशान त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. अत्यंत कमी खर्चात नियोजनबद्ध पद्धतीनं ही मोहिम राबवण्यात आली. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी त्यासाठी अपार कष्ट घेतले. महाराष्ट्रानंही आपलं योगदान दिलं. मुंबईतील गोदरेज एरोस्पेसमध्ये यानाचे काही भाग बनवण्यात आले. सांगलीत रॉकेटच्या पार्टना कोटींग करण्यात आलं. पुण्यातील कंपनीत फ्लेक्स नोझल आणि बुस्टर, तर, जळगावात एचडी नोझल्स तयार करण्यात आले. बुलडाण्यातील खामगावाची चांदी आणि थर्मल फॅब्रिक चांद्रयानासाठी वापरण्यात आले. पुण्यातील जून्नरच्या दोन शास्त्रज्ञांनी मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला.  इंदापूरची वालचंद इंडस्ट्री गेली पन्नास वर्षे इस्त्रोच्या प्रत्येक मोहिमेत योगदान देत आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशस्वी मोहिमेत महाराष्ट्राचंही मोठं योगदान असून तेही कायम लक्षात ठेवलं जाईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

०००००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here