व्यावसायिकांनी व्यापक समाज हितासाठी कार्य करावे : राज्यपाल रमेश बैस

???????????????????????????????

मुंबई दि.26: जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांनी आपल्या समाजातील युवकांच्या उन्नतीसाठी स्थापन केलेले आयएएस स्पर्धा प्रशिक्षण वर्ग तसेच इतर उपक्रमांचा लाभ सर्वच समाजांमधील युवकांना करुन द्यावा असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. व्यापक समाज हितासाठी कार्य केल्यास ते ‘लघुतेकडून प्रभुतेकडे’ नेणारे मोठे पाऊल ठरेल, असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.

जैन तेरापंथ समाजातील व्यावसायिकांच्या  ‘तेरापंथ प्रोफेशनल फोरम’ या संस्थेतर्फे ‘लघुतेकडून प्रभुतेकडे’ या विषयावरील दोन दिवसांच्या 16 व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या मुख्य उपस्थितीत नंदनवन परिसर, ठाणे येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते.

उदघाटनाला  जैन तेरापंथ समाजाचे अध्यात्मिक प्रमुख आचार्य महाश्रमण, साध्वी प्रमुखा विश्रुत विभा, मुनी महावीर कुमार, तेरापंथ प्रोफेशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज ओस्तवाल, विश्वस्त चंद्रेश बाफना, रायपूरचे माजी महापौर गजराज पगारिया, मदन तातेड तसेच फोरमचे सदस्य व भाविक उपस्थित होते.

पशुपक्ष्यांना संकटात सापडलेल्या आपल्या इतर बांधवांना फारशी मदत करता येत नाही. मात्र, संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना तसेच मूक प्राण्यांना मदत करण्याची क्षमता ईश्वराने केवळ मनुष्याला दिली आहे असे सांगून यशस्वी व्यावसायिकांनी आपली शक्ती व क्षमतेचा वापर करून, ग्रामीण, आदिवासी भागातील गरीब, दिव्यांग, अनाथ लोकांना तसेच कैदी बांधवांना मदत करावी असे राज्यपालांनी सांगितले.

भगवान महावीरांच्या अध्यात्मिक शिकवणीला अनुसरुन जैन आचार्य तुलसी यांनी अणुव्रत आंदोलन सुरु केले व त्या माध्यमातून महिलांचे शोषण, हुंडा प्रथा, अस्पृश्यता इत्यादी सामाजिक कुप्रथांविरुद्ध आवाज उठवला याचे स्मरण राज्यपालांनी दिले. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी मोठे अभियान सुरु करुन हजारो लोकांना व्यसनांपासून सोडवले.  त्यांच्या शिकवणीप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने छोटे-छोटे संकल्प करुन आत्मविकास, समाज विकास व राष्ट्र विकासाच्या कार्यात योगदान द्यावे, असे राज्यपालांनी सांगितले.

अहिंसा यात्रे’च्या माध्यमातून व्यसनमुक्ती, नैतिकता व सद्भावना निर्माण करण्याच्या आचार्य महाश्रमण यांच्या कार्याचा राज्यपालांनीगौरव केला.

सद्गुणांचा विकास केल्यास मनुष्याची देवत्वाकडे वाटचाल शक्य – आचार्य महाश्रमण

यावेळी सर्व उपस्थित भाविक व व्यावसायिकांना संबोधित करताना आचार्य महाश्रमण यांनी दुर्गुणांचा त्याग व सद्गुणांचा विकास केल्यास मनुष्य देवत्वाकडे वाटचाल करतो, असे सांगितले. आचार्य तुलसी यांनी प्रतिपादन केलेल्या अणुव्रतांचा अंगीकार करुन तसेच आचार्य महाप्रज्ञ यांनी सांगितलेल्या प्रेक्षाध्यानाच्या माध्यमातून सद्भावना व नैतिकता वृद्धिंगत होते, असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीलातेरापंथ प्रोफेशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज ओस्तवाल यांनी फोरमच्या राष्ट्रव्यापी सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली.  आचार्य महाश्रमण प्रवास समितीचे प्रमुख मदन तातेड यांनी स्वागतपर भाषण केले.

0000