गणेशोत्सव कालावधीत पोलीस विभागाने चोख  बंदोबस्त ठेवावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

0
7

सातारा दि.26 (जिमाका) :  जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस  विभागाने या कालावधीत चोख बंदोबस्त ठेवावा. तसेच जे गुन्हेगार सतत गुन्हे करत आहेत, अशांवर  मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

सातारा पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी  येथील शिवतेज हॉल येथे घेतला. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पोलीस अधीक्षक समीर शेख, सहायक पोलीस अधीक्षक मिना यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.

गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी आत्तापासून  बैठका घ्या, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी सायबर सेल अत्याधुनिकरणासाठी  जिल्हा वार्षिक योजनेतून निधी दिला जाईल. त्याचबरोबर सायबर सेल हाताळण्यासाठी पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण द्यावे. जिल्हा वार्षिक योजनेमधून पोलीस दलाला नवीन वाहने दिली आहे. आणखी वाहनांची आवश्यकता असल्यास त्याचाही प्रस्ताव सादर करावा.

नवीन पोलीस स्टेशन,  निवासस्थान  इमारती बांधकामांचे प्रस्ताव द्यावेत त्यांचाही मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करुन प्रश्न मार्गी लावले जातील. जिल्ह्याला मोठी पंरपरा आहे. या परंपरेला साजेल असे काम करुन जिल्ह्याचा   नावलौकीक वाढवा. पोलीस दलाच्या कामाजाचा आढवा घेतल्यानंतर कामकाजावर समाधन व्यक्त करुन पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोलीस विभागाचे अभिनंदन केले.

बैठकीमध्ये पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पोलीस विभागाच्या कामकाजाची माहिती दिली.

00000

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here