राज्यात फुटबॉल खेळाच्या विकासासाठी जर्मनीतील ‘बुंदेसलिगा’ लीग सोबत महत्त्वाचा सामंजस्य करार

0
6

पुणे दि.२८: राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत  महाराष्ट्र शासन आणि जर्मनी येथील ‘बुंदेसलिगा’ या सर्वात मोठ्या व्यावसायिक फुटबॉल लीगमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्राच्यावतीने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल  आणि क्रीडा व युवक सेवा आयुक्त सुहास दिवसे, तर  बुंदेसलिगाचे प्रतिनिधी श्रीमती ज्युलीया फार, पीटर लीबल, कौशिक मौलिक यांच्यात कराराचे आदानप्रदान करण्यात आले.

या कराराबाबत समाधान व्यक्त करताना राज्यपाल श्री.बैस म्हणाले,  राज्यातील अनेक जिल्ह्यात फुटबॉल लोकप्रिय आहे. राज्यात फुटबॉलसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे अधिक प्रयत्न होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने या कराराद्वारे राज्याने घेतलेल्या पुढाकाराचे राज्यपालांनी स्वागत केले.

बुंदेसलिगा ही जर्मनीची प्रमुख व्यावसायिक फुटबॉल लीग आहे. रोमांचक फुटबॉल स्पर्धांचा अनुभव आणि समृद्ध इतिहासासाठी लीग प्रसिद्ध आहे. ही युरोपमधील अग्रणी फुटबॉल लीगपैकी असून फुटबॉलमधील सर्वोत्तम खेळाडू आणि संघ  लीगशी संबंधित आहेत. १९६३ ची स्थापना असलेल्या बुंदेसलिगा लीगमध्ये प्रत्येक हंगामात १८ क्लब प्रतिष्ठित विजेतेपदासाठी झुंजतात.

बुंदेसलिगा ही रोमहर्षक सामन्यांच्या शिवाय फुटबॉल प्रतिभेला जोपासण्यात आणि खेळाच्या विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारे कुशल खेळाडू घडविण्याचे कार्यही लीग करते. महाराष्ट्राशी झालेल्या करारामुळे राज्यांतर्गत फुटबॉलच्या विकासासाठी लीगकडील कौशल्य आणि संसाधनांचा लाभ होणार आहे.  या भागीदारीमुळे महाराष्ट्र क्रीडा विकास आणि यशाच्या एका नव्या पर्वाचा साक्षीदार होणार आहे.  १४ वर्षाखालील वयोगटातील स्पर्धा, प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान केंद्र आदी क्षेत्रात यामुळे सहकार्य होणार आहे.

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here