मृद व जलसंधारणाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत – मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. २९ :- मृद व जलसंधारण विभागामार्फत प्रदान केलेल्या प्रशासकीय मान्यता दिलेली मात्र प्रलंबित कामे त्वरित पूर्ण करण्याचे व उर्वरित कामांचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील राज्यातील 600 हेक्टरपर्यंतच्या सिंचन मर्यादेतील लघु पाटबंधारे योजनांच्या प्रगतीपथावरील कामांची आढावा बैठक मंत्री श्री. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. त्यावेळी मंत्री श्री. राठोड बोलत होते. यावेळी जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे, नागपूर प्रादेशिक मंडळाचे अपर आयुक्त तथा मुख्य अभियंता  विजय देवराज, सहसचिव व ठाणे मंडळाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी सुनील काळे उपस्थित होते.

मंत्री श्री. राठोड यांनी क्षेत्रीयस्तरावर शासन निधीतून व जलसंधारण महामंडळ निधीतून सुरु असलेल्या जलसंधारण कामांचा आढावा घेतला. राज्यातील पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नाशिक मंडळांतर्गत जलयुक्त शिवार योजनेची प्रगती, माजी मालगुजारी तलाव दुरूस्ती कार्यक्रम, वाल्मी प्रशिक्षण संस्थेची नूतनीकरणाची कामे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

यावेळी नागपूर मंडळाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी नितीन दुसाने, पुणे मंडळाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी  दयासागर दामा, नाशिक मंडळाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, औरंगाबाद मंडळातील जिल्हा जलसंधारण अधिकारी सूरज शिंदे, अमरावती मंडळाचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी दिलीप निपाणे, विभागाच्या उपसचिव मृदुला देशपांडे, अवर सचिव  प्रकाश पाटील, अवर सचिव  राजेश बागडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/