मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव लोकोत्सव व्हावा – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

औरंगाबाद, दि.31(जिमाका)- मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवी सांगता सोहळ्याच्या निमित्ताने मुक्तिसंग्रामाचा इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा. त्याग आणि बलिदान केलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण व्हावे. समाजाच्या सर्व स्तरातील व्यक्तींना या सोहळ्यात सहभागी करुन हा उत्सव ‘लोकोत्सव’ करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष सांगता सोहळ्यासंदर्भात आज स्मार्ट सिटी कार्यालयात श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, विधानसभा सदस्य आ. हरिभाऊ बागडे,  आ. प्रदीप जयस्वाल, आ. बबनराव लोणीकर, आ. नारायण कुचे, आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे तसेच प्रधान सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, पोलीस महानिरीक्षक औरंगाबाद परिक्षेत्र डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, जिल्हाधिकारी औरंगाबाद आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी जालना डॉ. कृष्णा पांचाळ, परभणी रघुनाथ तावडे, नांदेड डॉ. अभिजीत राऊत, बीड श्रीमती दीपा मुधोळ, लातूर श्रीमती वर्षा ठाकुर, उस्मानाबाद डॉ. सचिन ओम्बासे, हिंगोली जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, तसेच सर्व संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.

प्रधान सचिव  विकास खारगे यांनी प्रस्तावनेत, मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा हा दि. 15 ते 17 सप्टेंबर या दरम्यान होत आहे. यानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शासनामार्फत करण्यात आलेल्या तरतुदींची माहिती त्यांनी दिली.

विभागीय आयुक्त आर्दड यांनी विभागात व्हावयाच्या तीन दिवसीय कार्यक्रमाचे नियोजन सादर केले. दरम्यान दि.16 रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक नियोजित आहे.

बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, दि.15 रोजी सकाळी या सांगता सोहळ्यास सकाळी 7 वा. प्रभात फेरीने प्रारंभ होईल. शालेय विद्यार्थी त्यात सहभागी होतील. क्रांती चौक ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ अशी ही प्रभातफेरी असेल. दुपारी 12 ते 4 यावेळात  वंदेमातरम सभागृहात मराठवाडा मुक्तिसंग्रामाची गाथा सांगणारी व्याख्याने मान्यवर व्याख्याते देतील. सायं. 7 वा. ‘मराठवाड्याची लोकधारा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर होईल.

दि.16 रोजी सकाळी साडेसात वा विभागीय क्रीडा संकुल ते क्रांती चौक मिनी मॅरेथॉन स्पर्धा होईल. सकाळी साडेनऊ वाजता नवीन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीचा भूमिपूजन सोहळा, तसेच सातारा व देवळाई मलनिःसारण व हरसूल घनकचरा प्रक्रिया केंद्राचे ई- लोकार्पण, दुपारी 12 वा. मंत्रिमंडळ बैठक व त्यानंतर पत्रकार परिषद, दुपारी 4 वा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सांगता समारंभ होईल. हा कार्यक्रम अयोध्या नगरी मैदानावर होणार आहे. रात्री क्रांती चौकात सांस्कृतिक कार्यक्रम, लेजर शो, आतषबाजी, ड्रोन शो असे कार्यक्रम होतील.

दि.17 रोजी सकाळी पावणे नऊ वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ  सिद्धार्थ उद्यानात होईल. त्यानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम शपथ, त्यानंतर चित्ररथास हिरवी झेंडी दाखवणे व चित्रप्रदर्शनास भेट, सकाळी 10 वा. ‘मंथन’ बैठक यात विभागातील जिल्ह्यांची वाटचाल, प्रगतीबाबत चर्चा, मराठवाडा मुक्तिसंग्रामावर आधारित नाट्यरुपांतरित माहितीपटाचे (डॉक्युड्रामा) प्रदर्शन, कॉफी टेबल बुक प्रकाशन आदी कार्यक्रम होणार आहेत.

त्यानंतर सर्व जिल्ह्यांनी आपापले नियोजन सादर केले. याच बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भात करावयाच्या नियोजनाबाबत चर्चा झाली.

बैठकीनंतर श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळ्यानिमित्त मुक्तिसंग्रामाचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवावा. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी महनीय व्यक्तींचे योगदान, त्याग, बलिदान याबाबत माहिती द्यावी. या सांगता समारंभात सर्वस्तरातील लोकांना सहभागी करुन घ्यावे. सगळ्यांच्या समावेशाने हा सोहळा लोकोत्सव व्हावा, असे निर्देश त्यांनी दिले. श्री. मुनगंटीवार म्हणाले की, यानिमित्ताने मराठवाडा मुक्तिसंग्रामाबाबत शासनामार्फत प्रकाशित गॅझेटियर केले जाईल. यानिमित्ताने देशी खेळांच्या स्पर्धा आयोजित कराव्या. मराठवाड्याचा गौरव वाढविणाऱ्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करावे, आदी सूचना त्यांनी केल्या.