बाल स्वास्थ्य योजना ठरली संजीवनी, श्रवणशक्ती मिळाल्यानं आयुष्य पालटलं!

0
10

साडेपाच वर्षाच्या रूदुराज गांगुर्डेला जन्मत: दोन्ही कानांनी ऐकू येत नव्हते. खासगी रुग्णालयात त्याच्या कानाच्या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे सहा लाखापर्यंत होता. त्याच्या उपचाराची आम्हाला चिंता सतत सतावत होती. मात्र आमच्या मदतीला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाची योजना देवदूतासारखी धावून आली. या योजनेच्या माध्यमातून पुण्याच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये काँक्रिलियर इम्प्लांटची अवघड शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. यामुळे माझ्या रुदुराजला आता चांगलं ऐकू येत आहे. तो हसतखेळत जगत आहे. त्याचं आयुष्य  पालटून गेलं आहे. अशी भावना रुदुराजचे वडील वसंत गांगुर्डे, आई सरिता गांगुर्डे यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात जन्मतःच व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासास विलंब व इतर आजार यांचे निदान व उपचार केले जातात. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत येत असलेल्या या योजनेत रूदूराज गांगुर्डेची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर पुण्याच्या खासगी रूग्णालयात कॉक्रिलियर इम्प्लांटची अवघड शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याने ही योजना रूदूराजसाठी नवसंजीवनीच ठरली आहे.

जामनेर तालुक्यातील नांद्रा या गावातील वसंत व सरिता गांगुर्डे हे दाम्पत्याला दोन मुलींच्या पाठीवर रूदूराज या मुलाचा जन्म झाला. तो एक वर्षाचा झाल्यानंतर त्याला बोलता ही येत नाही, तसेच त्याला ऐकायला ही येत नसल्याचे त्याच्या आई-वडीलांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांच्या चिंतेत भर पडली. त्याच्या उपचारासाठी त्यांनी जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई याठिकाणाच्या विविध खासगी रूग्णालयात तपासण्या केल्या. या तपासण्यातून त्यांना काँक्रिलियर इम्प्लांटची अवघड शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. या शस्त्रक्रियेसाठी येणारा आठ ते दहा लाख रूपयांच्या खर्च त्यांच्या आर्थ‍िक परिस्थ‍ितीला परवडणारा नव्हता. त्यामुळे रूदूराजच्या पालकांनी शासकीय योजनेचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्यांना राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाच्या वर्षा वाघमारे यांनी आरोग्य तपासणी व काँक्रिलियर इम्प्लांट शस्त्रक्रियेच्या पूर्ततसाठी असलेल्या असलेल्या कागदपत्रांची पूर्ततेसाठी सर्वतोपरी मदत केली. त्यामुळे त्यांना या योजनेतून पाच लाख पर्यंतचा संपूर्ण शासकीय खर्चातून मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.

अशी होते अंमलबजावणी –

प्रत्येक शैक्षणिक वर्षात अंगणवाडी बालकांसाठी दोनदा तर शालेय विद्यार्थ्यांसाठी एकदा आरोग्य तपासणीचे आयोजन केले जाते. यातील किरकोळ आजाराचे निदान झालेल्या बालकांवर शाळेतच उपचार केले जातात तर गंभीर आजाराचे निदान झालेल्या बालकांवर जिल्हा रुग्णालय अथवा महात्मा फुले जीवनदायी योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांत पुढील उपचार करून त्यांचा पाठपुरावा केला जातो.

जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जिल्ह्यात राबविला जातो. ज्या बालकांमध्ये आजारांचे निदान होते त्यांच्यावर पालकांच्या परवानगीने मोफत वैद्यकीय उपचार केले जातात. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here