कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य दिले जाते. या अनुषंगाने शासनस्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. या योजना अव्याहतपणे राबविण्यात येतात. मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन जमा करणे, त्यातील त्रुटी दूर करणे, योजनेचा लाभ मिळवणे अशी विविध कार्ये पार पाडावी लागतात. काही वेळा नागरिकांना योजनांची माहिती नसते आणि माहितीअभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यत पोहोचत नाही. पर्यायाने योजनांचा उद्देश सफल होत नाही.
हे टाळण्यासाठी आणि नागरिकांना मोठया प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘शासन आपल्या दारी दारी’ हा लोकाभिमूख उपक्रम शासनाने हाती घेतला आहे. या उपक्रमाची ही थोडक्यात माहिती.
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या आपल्या भारत देशाने लोककल्याणकारी शासन व्यवस्था स्विकारली आहे. लोकशाहीत शासन हे जनतेला जबाबदार असते आणि त्याच दिशेने राज्यशासन कार्य करत असते. नागरिकांना केंद्रबिंदू मानून योजनांची आखणी करायची आणि शासन व्यवस्थेमार्फत त्याची अंमलबजावणी करायची अशी सर्वसाधारण व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. विकासाभिमूख आणि नागरिकांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना शासन राबवित असते. सर्व योजनांचा लाभ नागरिकांना एकाच छताखाली मिळावा, त्यांच्या शासकीय कार्यालयातील कमी करणे व त्यांना सहज योजनेचा लाभ मिळावा तसेच योजनांचा लाभ सुलभपणे जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी शासन आपल्या दारी हा लोकाभिमूख उपक्रम महाराष्ट्रात सर्व जिल्हयात राबविण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती देणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन घेणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे व प्रत्यक्ष लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी हे या उपक्रमाचे जिल्हा प्रमुख आहेत. त्यांच्याशी इतर सर्व विभाग समन्वय ठेवतात. उपक्रमाद्वारे प्रत्येक जिल्हयामध्ये किमान पंच्याहत्तर हजार लाभार्थ्यांना एकाच छताखाली थेट लाभ देण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. जनतेला २०० हून अधिक योजनांचा लाभ देतानाच कमीतकमी कागदगपत्रे आणि लाभास जलद मंजुरी दिली जाते. शासकीय योजनांची माहिती पहिल्यांदाच ‘हर घर दस्तक’ च्या माध्यमातून दिली जात आहे. प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनकल्याण कक्षामार्फत या उपक्रमाचे राज्यस्तरीय समन्वयन केले जाते. मंत्रालयस्तरावर सर्व प्रशासकीय विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना यामध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरील मुख्य कार्यक्रमापूर्वी तालुकास्तरावरही विविध मेळावे घेऊन नागरिकांना योजनांचा लाभ देण्यास सुरुवात झाली आहे. या उपक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील दौलत नगर (मरळी) येथे स्वत: मुख्यमंत्री यांच्या हस्ते 13 मे रोजी झाला.
महासंकल्प राज्य शासनाचा
विविध शासकीय विभागांच्या योजना, रोजगार मेळावा, महाआरोग्य शिबीर, रक्तदान व अवयवदान शिबीर, चष्मे वाटप, दिव्यांगांना साहित्य वाटप, शिक्षण हक्क कायद्यांगतर्गत २५ टक्के विद्यार्थ्यांना देण्यात येणारे प्रवेश, कृषी प्रदर्शन, महिलांना ‘सखी किट’ वाटप, स्वयं रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, ‘शेतकरी ते ग्राहक’ थेट बाजार आणि बचतगटांचे स्टॉल, विविध सरकारी विभाग व महामंडळांच्या योजनांच्या माहितीचे स्टॉल, सामाजिक उत्तरदायित्व योजनेंतर्गत गरजूंना वैयक्तिक लाभ देणे, नवमतदार नोंदणी करणे व इतर लोकाभिमूख योजनांचा लाभ या उपक्रमाच्या माध्यमातून गरजू लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू
शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सहज उपलब्ध झाल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर एका प्रकारे हसू फुलले आहे. नागरिकांना लाभ देण्यापूर्वी गावपातळीवर शासन आपल्या दारी अभियानाची माहिती देऊन गावातच नागरिकांकडून लाभासाठीचे अर्ज भरुन घेण्यात येतात. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देवून त्याची पुर्तताही करुन घेण्यात येते. स्थानिकरित्या आयोजित मेळाव्याच्या ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या विविध दालनाद्वारे लाभाचे वाटप करण्यात आले. योजनेचा लाभ घेण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व व्यवस्था असल्याने प्रशासनाच्या पुढाकाराबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यत पोहोचवून त्याचे जीवन सुखकर करण्याचे शासनाचे ध्येय आहे. अशा उपक्रमांमुळे नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होत असून, हा उपक्रम यापुढेही सुरु ठेवावा, अशी प्रतिक्रया लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. आणि शासनाला धन्यवादही दिले आहेत. विविध ठिकाणी आयोजित या उपक्रमात लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आलाच परंतु, राज्याच्या प्रमुखांबरोबर मंचावर बसण्याचा मिळालेला मानही त्यांना सुखावून गेल्याचे पुणे जिल्हयातील जेजुरी येथे पार पडलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्यावेळी दिसून आले.
हा उपक्रम सुरु झाल्यापासून शासकीय यंत्रणा सक्रिय झाली असून योजनांचा लाभ नागरिकांपर्यत पोहोचत असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
जयंत कर्पे,
सहायक संचालक (माहिती),
विभागीय माहिती कार्यालय, पुणे